तरुण भारत

डिप्रेशनवर मात करणाऱया कमलप्रीतची फायनलमध्ये धडक

एकीकडे, बहुतांशी क्रीडा प्रकारात भारतीय ऍथलिट्सनी बरीच निराशा केली असली तरी थाळीफेकपटू कमलप्रीत कौरने मात्र धडाकेबाज प्रदर्शन साकारत अंतिम फेरीत जोरदार धडक मारली. कमलप्रीतची ही कामगिरी ऑलिम्पिकमधील भारतातर्फे काही सर्वोत्तम कामगिरीपैकी एक ठरली. या इव्हेंटमधील अंतिम लढत उद्या (दि. 2) होणार आहे.

क्वॉलिफिकेशन बी मधून सहभागी 25 वर्षीय कौर आपल्या तिसऱया व शेवटच्या प्रयत्नात 64 मीटर्सची फेक करण्यात यशस्वी ठरली. फायनलसाठी केवळ दोनच खेळाडूंची आपसूक निवड झाली. त्यात कमलप्रीतसह अमेरिकेच्या व्हॅलारी ऑलमनचा समावेश राहिला. व्हॅलारीने 66.42 मीटर्सची लक्षवेधी फेक साकारली.

Advertisements

कमलप्रीतने विद्यमान सुवर्णविजेती, क्रोएशियाची सँद्रा पेर्कोव्हिक (63.75 मी.) व क्युबाची विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन येमे पेरेझ यांच्यापेक्षा सरस कामगिरी केली, हे ठळक वैशिष्टय़ ठरले. अनुभवी सीमा पुनियाचे आव्हान मात्र संपुष्टात आले.

कमलप्रीतने 60.29 मीटर्सची फेक करत दमदार सुरुवात केली आणि त्यानंतर आपली कामगिरी 63.97 मीटर्स अशी उंचावली. नंतर तिसऱया प्रयत्नात तिने 64 मीटर्सची सरस फेक साकारली. प्रत्येक ऍथलिटला येथे 3 थ्रो मिळतात. जे ऍथलिट 64 मीटर्स थ्रो करतात, त्यांना फायनलमध्ये थेट प्रवेश मिळतो आणि अन्य स्पर्धकांमधून 12 सर्वोत्तम फेक करणारे खेळाडू फायनलसाठी निवडले जातात. कमलप्रीतने तिसऱया प्रयत्नात 64 मीटर्सची फेक केली असल्याने तिची फायनलसाठी थेट निवड झाली.

मूळ पंजाबची ऍथलिट असणारी कमलप्रीत यंदा उत्तम बहरात असून तिने यापूर्वी दोनवेळा 65 मीटर्सची फेक नोंदवली आहे. मार्चमध्ये फेडरेशन चषकात तिने 65.06 मीटर्सची फेक करत राष्ट्रीय विक्रम आपल्या खात्यावर केला होता. नंतर जूनमध्ये तिने 65.59 मीटर्सची नवी फेक करत आपलाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला.

वडिलांना अभिवचन, पदक जिंकण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेन!

दुसरे स्थान संपादन करत ऑलिम्पिक थाळीफेक फायनलमधील स्थान निश्चित करणाऱया कमलप्रीत कौरने पदक जिंकण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे तिच्या वडिलांशी बोलताना सांगितले. कौर कुटुंबिय पंजाबमधील मुक्तसर जिल्हय़ातील कबरवाला या खेडय़ातील रहिवासी आहे. कमलप्रीतने अंतिम फेरीतील स्थान निश्चित केल्यानंतर तिच्या कुटुंबियांचे देखील नातेवाईकांनी अभिनंदन केले.

सीमा पुनियाची निराशा

शेवटच्या क्षणी ऑलिम्पिक पात्रता मिळविणारी सीमा पुनिया आपल्या हंगामातील व वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीच्या आसपास देखील फिरकू शकली नाही. तिचा पहिला थ्रो फाऊल झाला. त्यानंतर उर्वरित दोन प्रयत्नात तिने 60.57 मीटर्स व 58.93 मीटर्स अशी निराशा केली. हरियाणाची 38 वर्षीय पुनिया पात्रता संपादन करण्याच्या शेवटच्या दिवशी यंदाच्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली होती. तिने पतियाळात राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये 63.72 मीटर्सची फेक करत ऑलिम्पिक पात्रता मिळवली होती. पुनियाची सर्वोत्तम फेक 64.84 मीटर्स इतकी आहे. पुनिया या ऑलिम्पिकसाठी राष्ट्रीय शिबिराच्या बाहेर सराव करत होती.

Related Stories

ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांच्या खोडसाळपणामुळे गोंधळ

Patil_p

आरआरचे दिशांत याज्ञिक दुबईत दाखल

Patil_p

न्यूझीलंड दौऱयासाठी वगळताना विश्वासात घेतले नाही : शोएब मलिक

Patil_p

घरी थांबणे हाच लढण्याचा सर्वोत्तम मार्ग

Patil_p

दमलेले बॅडमिंटनपटू

Patil_p

हॅट्ट्रिक विजयासह इंग्लंड उपांत्य फेरीसमीप

Patil_p
error: Content is protected !!