तरुण भारत

जोल्ले, उमेश कत्ती मंत्रिपदी कायम

पहिल्या टप्प्यात 29 जण शपथबद्ध ः बागलकोटमधून कारजोळ तर कारवारमधून शिवराम हेब्बार यांना मंत्रिपद

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisements

अनुभवी आणि नव्या आमदारांना संधी देत नूतन मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. पहिल्या टप्प्यात 29 जण मंत्रिपदी शपथबद्ध झाले. बुधवारी दुपारी 2.15 वाजता राजभवन येथे पार पडलेल्या कार्यक्रमात राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी नूतन मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. बेळगाव जिल्हय़ातून निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले आणि हुक्केरीचे आमदार उमेश कत्ती यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. तसेच बागलकोट जिल्हय़ातून गोविंद कारजोळ व कारवारमधून शिवराम हेब्बार यांनाही मंत्रिपद मिळाले आहे. तर आमदार भालचंद्र जारकीहोळी, पी. राजीव यांना संधी हुकली आहे. येडियुराप्पांच्या मंत्रिमंडळातील लक्ष्मण सवदी आणि श्रीमंत पाटील यांना डावलण्यात आले आहे. आता नूतन मंत्र्यांना येत्या दोन दिवसात खातेवाटप केले जाणार असून प्रभावी खाती मिळविण्यासाठी राज्य भाजपमध्ये चढाओढ निर्माण झाली आहे.

मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी आठवडाभरापासून दिल्ली आणि बेंगळूरमध्ये घडत असलेल्या राजकीय घडामोडींमुळे निर्माण झालेले कुतूहल अखेर संपुष्टात आले. अखेर 7 जुन्या मंत्र्यांना वगळून 6 नव्या चेहऱयांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर बसवराज बोम्माई यांनी दोनवेळा हायकमांडच्या भेटीसाठी दिल्ली दौरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्य भाजप प्रभारी अरुणसिंग तसेच इतर नेत्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. बुधवारी सकाळी देखील मंत्र्यांच्या यादीला अंतिम स्वरुप देण्याची कसरत सुरू होती. दुसरीकडे येडियुराप्पा यांना आपले पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांना मंत्रिपद मिळवून देण्यात अपयश आले आहे.

विधानसौध येथे 26 जुलै रोजी बी. एस. येडियुराप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तर 27 जुलै रोजी भाजपच्या विधिमंडळ नेत्यांच्या बैठकीत हावेरी जिल्हय़ातील शिग्गावचे आमदार बसवराज बोम्माई यांना भाजपचे विधिमंडळ नेते म्हणून निवड करण्यात आली होती. तर 28 रोजी त्यांनी राज्याचे 30 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आठवडाभरानंतर त्यांच्या नेतृत्त्वाखालील मंत्रिमंडळात 29 जणांचा समावेश झाला आहे.

राज्य सरकारमध्ये एकूण 34 आमदारांना मंत्रिपदे देता येऊ शकतात. सध्या 29 जणांना मंत्रिपदे देण्यात आली असून 4 जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. मंत्रिपद न मिळाल्याने नाराजी उफाळून आल्यास आणखी काही जणांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचा विचार भाजप हायकमांडने घेतला आहे.

सहा नव्या चेहऱयांना संधी

नव्या मंत्रिमंडळात 6 नव्या चेहऱयांना संधी देण्यात आली आहे. कारकलचे आमदार सुनीलकुमार, बेंगळूरच्या आर. आर. नगरचे आमदार मुनिरत्न, यलबुर्गाचे आमदार हालप्पा आचार, नवलगुंदचे आमदार शंकर पाटील मुनेनकोप्प, तिपटूरचे बी. सी. नागेश आणि तीर्थहळ्ळी मतदारसंघातील अरग ज्ञानेंद्र यांना प्रथमच मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. तर येडियुराप्पा यांच्या मंत्रिमंडळातील 7 जणांना वगळण्यात आले आहे. त्यामध्ये जगदीश शेट्टर, अरविंद लिंबावळी, लक्ष्मण सवदी, एस. सुरेशकुमार, श्रीमंत पाटील, आर. शंकर आणि सी. पी. योगेश्वर यांचा समावेश आहे.

येडियुराप्पा विरोधकांना डावलले

माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या विरोधकांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. येडियुराप्पा यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविण्यास हायकमांडवर दबाव आणलेले आमदार बसवनगौडा पाटील यत्नाळ, अरविंद बेल्लद आणि सी. पी. योगेश्वर यांना  मंत्रिपदे देण्यात आलेली नाहीत. मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार मानले गेलेले अरविंद बेल्लद यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी दाट शक्यता होती. मात्र, त्यांना डावलण्यात आले आहे. त्यांना दुसऱया टप्प्यात मंत्रिपद दिले जाऊ शकते.

पक्षांतर करून आलेल्यांपैकी दोघे ‘आऊट’, एक ‘इन’

निजद-काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात येऊन या पक्षाला सत्तेवर आणण्यात महत्त्वाचे योगदान दिलेल्यांपैकी दोघांना डावलण्यात आले आहे. श्रीमंत पाटील आणि आर. शंकर यांना मंत्रिपदे मिळालेली नाहीत. पण, या गटातील मुनिरत्न यांचा नव्याने मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. तर येडियुराप्पा यांचे कट्टर समर्थक एम. पी. रेणुकाचार्य यांना अखेरच्या क्षणी मंत्रिपदापासून वंचित रहावे लागले आहे. त्यामुळे त्यांनी येडियुराप्पांची भेट घेऊन दुःख व्यक्त केले.

12 जिल्हय़ांना मंत्रिपद नाही

मंत्रिमंडळात प्रादेशिक समतोल साधण्यात अपयश आल्याची चर्चा होत आहे. म्हैसूर, गुलबर्गा, रामनगर, कोडगू, रायचूर, हासन, विजापूर, बळ्ळारी, दावणगेरे, कोलार, यादगीर आणि चिक्कमंगळूर या 12 जिल्हय़ांना मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्व मिळालेले नाही. तर बेंगळूर शहर जिल्हय़ातील सर्वाधिक 8 आमदारांना मंत्रिपदे देण्यात आली आहेत. बेंगळूर महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. तर बेळगावसह हावेरी, तुमकूर, मंगळूर, बागलकोट, शिमोगा या सहा जिल्हय़ांमधून प्रत्येकी दोघांना मंत्रिपद दिले आहे.

Related Stories

देशात कोरोनाबाधितांची संख्या 1 लाखांपार

datta jadhav

महाराष्ट्रापाठोपाठ ‘या’ राज्यातही 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण लांबणीवर

Rohan_P

भव्य राममंदिरासाठी 100 कोटीचे निधीसंकलन

Patil_p

राजस्थानमध्ये एका दिवसात 118 नवे कोरोना रुग्ण; तर 3 जणांचा मृत्यू

Rohan_P

जेएनपीटी बंदरात ३०० कोटींचे हेरॉईन जप्त

Patil_p

‘जय श्रीराम’ पाकिस्तानात म्हणायचे काय?

Amit Kulkarni
error: Content is protected !!