तरुण भारत

भारतीय महिला संघाची झुंज निष्फळ

अर्जेन्टिनाकडून 1-2 फरकाने पराभव, कांस्यपदकासाठी गेट ब्रिटनशी लढत

वृत्तसंस्था/ टोकियो

Advertisements

भारताच्या महिला हॉकी संघाने उपांत्य फेरीच्या सामन्यात झुंजार प्रदर्शन केले, पण ऑलिम्पिक हॉकीची अंतिम फेरी गाठण्यास ते पुरेसे ठरले नाही आणि जागतिक द्वितीय मानांकित अर्जेन्टिनाकडून त्यांना 1-2 अशा गोलफरकाने पराभवाला सामोरे जावे लागले. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यातील पराभवामुळे पुरुष संघाप्रमाणे त्यांचेही सुवर्ण जिंकण्याचे स्वप्न भंगले. आता कांस्यपदकासाठी त्यांची लढत शुक्रवारी ग्रेट बिटनविरुद्ध होईल. याच दिवशी अर्जेन्टिना व नेदरलँड्स यांच्यात जेतेपदाची लढतही होईल.

भारतीय महिलांनी या सामन्यात झुंजार प्रदर्शन करीत अर्जेन्टिनासमोर तगडे आव्हान उभे करताना दुसऱयाच मिनिटाला गोल नोंदवला. पेनल्टी कॉर्नरवर गुरजित कौरने हा गोल नेंदवून भारताला आघाडीवर नेले. पण अर्जेन्टिनाने जोरदार मुसंडी मारत दोन गोल नोंदवून भारतावर आघाडी मिळविली. कर्णधार मारिया नोएल बॅरिओनूवोने 18 व 36 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवरच हे गोल नोंदवत संघर्षपूर्ण विजय साकार केला.

बेधडक आणि दृढनिश्चयाने खेळणाऱया 18 सदस्यीय भारतीय संघाने या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठूनच अभूतपूर्व कामगिरी नोंदवली होती. सोमवारी उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बलाढय़ ऑस्ट्रेलियाला 1-0 असे चकित करून पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविण्याचा पराक्रम केला होता. बुधवारच्या लढतीत बलाढय़ अर्जेन्टिनाचेच पारडे जड होते. पण राणी रामपालचे नेतृत्व व मुख्य प्रशिक्षक सोएर्द मारिने यांच्या मार्गदर्शनाखाली या संघाने अपेक्षेपेक्षाही जबरदस्त खेळ करीत सर्वांना चकित केले.

भारतीय महिलांनी यापूर्वी 1980 मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सहा संघांत चौथे स्थान मिळविले होते, हीच त्यांची आजवरची सर्वोत्तम कामगिरी होती. त्याच वर्षी महिला हॉकीचा ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा समावेश करण्यात आला होता. केवळ सहा संघ असल्याने त्यावेळी राऊंड रॉबिन पद्धतीने सामने खेळविले गेले आणि पहिल्या दोन संघांत जेतेपदाची लढत खेळविण्यात आली होती. अन्य एका उपांत्य सामन्यात नेदरलँड्सने गेट ब्रिटनचा 5-1 असा धुव्वा उडवित अंतिम फेरी गाठली. शुक्रवारी कांस्य आणि सुवर्णपदकाच्या लढती होतील.

Related Stories

सलामी लढतीत ‘त्या’ खेळाडूंच्या उपलब्धतेबद्दल साशंकता कायम

Patil_p

वनडे मालिकेसाठी लंकेचे नेतृत्व शनाकाकडे

Patil_p

शेवटच्या चेंडूवर सोळंकीचा षटकार

Patil_p

विंडीजचा भरगच्च क्रिकेट कार्यक्रम जाहीर

Patil_p

पहिल्या कसोटीत लंकेची स्थिती मजबूत

Patil_p

अष्टपैलू अक्षर पटेलला कोरोना

Patil_p
error: Content is protected !!