तरुण भारत

रवि दहिया आज सुवर्णपदकासाठी लढणार!

57 किलोग्रॅम फ्री स्टाईल इव्हेंटमध्ये अंतिम फेरीत धडक, ऑलिम्पिक कुस्ती फायनलसाठी पात्र ठरणारा केवळ दुसरा भारतीय

टोकियो / वृत्तसंस्था

Advertisements

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाच्या लढतीसाठी अंतिम फेरीत धडक मारणारा रवि दहिया हा भारताचा केवळ दुसरा भारतीय मल्ल ठरला. त्याने 57 किलोग्रॅम वजनगटात कझाकस्तानच्या नुरिस्लाम सॅनायेव्हविरुद्ध सनसनाटी विजय संपादन करत एकच खळबळ उडवून दिली. राष्ट्रीय सहकारी दीपक पुनियाला मात्र उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला असून आता तो कांस्यपदकाच्या लढतीत खेळणार आहे.

हरियाणातील शेतकऱयाचा सुपुत्र असलेल्या रवि दहियापूर्वी केवळ सुशील कुमारलाच 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये आपल्या इव्हेंटमध्ये अंतिम फेरीपर्यंत धडक मारता आली होती. सुशील त्यावेळी रौप्यपदकाचा मानकरी ठरला होता. आता सोने पे सुहागा ठरत सुवर्ण जिंकण्याचा रवि दहियाचा मानस असणार आहे.

रवि दहिया हरियाणातील नहरी खेडय़ातील असून ऑलिम्पिकच्या व्यासपीठावर त्याने आपली गुणवत्ता बुधवारी नव्याने अधोरेखित केली. ‘मी सॅनाएव्हला यापूर्वी दोनवेळा पराभूत केले आहे. त्यामुळे, मोठय़ा फरकाने त्याचा कसा धोबीपछाड करायचा, याचे माझ्याकडे आडाखे होते. मी  लढतीत उतरण्यापूर्वी आश्वासक होतो. विजयाची मला खात्री होती. मात्र, प्रत्यक्षात मला बरेच झगडावे लागले. शेवटच्या क्षणापर्यंत झुंजावे लागले. प्रतिस्पर्ध्याचा इतका दबदबा अजिबात अपेक्षित नव्हता’, असे रवि या लढतीबद्दल बोलताना म्हणाला.

‘मी ज्या उद्देशाने येथे आलो, ते अद्याप साध्य व्हायचे आहे’, अशा शब्दात त्याने सुवर्णपदकाच्या आशाअपेक्षा व्यक्त केल्या. आज (गुरुवार दि. 5) सायंकाळी 4 वाजता होणाऱया अंतिम लढतीत दहियाची लढत रशियाचा विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन झॅव्हूर यूगुएव्हविरुद्ध होत आहे. यापूर्वी, 2019 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दोन्ही प्रतिस्पर्धी आमनेसामने भिडले, त्यावेळी दहियाला पराभव पत्करावा लागला होता. आज त्या पराभवाचा वचपा काढण्याचे देखील दहियाचे लक्ष्य असणार आहे.

पहिल्या दोन्ही लढतीत एकतर्फी विजय

उपांत्य फेरीत नुरिस्लामला धूळ चारण्यापूर्वी दहियाने सलामीच्या लढतीत कोलंबियाचा टायग्रेरस उरबॅनोचा (13-2) असा धुव्वा उडवला आणि त्यानंतर बल्गेरियाच्या जॉर्जि व्हॅलेन्टिनोव्ह व्हँगेलोव्हला 14-4 असे लोळवले.

2-9 फरकाची पिछाडी भरुन काढत मिळवला स्पृहणीय विजय!

चौथा मानांकित दहिया या लढतीत एकवेळ 2-9 अशा एकतर्फी फरकाने पिछाडीवर होता. वेळ संपत आली असताना केवळ चमत्कारावर अवलंबून रहावे लागेल, अशीच एकंदर स्थिती होती. मात्र, दहियाने याचवेळी अनुभव पणाला लावत फिटलेचा डाव टाकला आणि प्रतिस्पर्ध्याला चारीमुंडय़ा चीत करत विजयश्री खेचून आणली. अर्थात, या धडाकेबाज विजयानंतर देखील दहिया अजिबात खुश दिसून आला नाही. नुरिस्लामविरुद्ध इतक्या पिछाडीवर फेकले जाणे अपेक्षित नव्हते, असे तो येथे म्हणाला.

दीपक पुनिया आता कांस्यपदकासाठी लढणार, अंशूची रेपेचेजवर भिस्त

उत्तम ड्रॉचा लाभ घेत दीपक पुनियाने 86 किलोग्रॅम वजनगटात उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती. मात्र, उपांत्य फेरीत त्याला अमेरिकेच्या डेव्हिड मॉरिस टेलरविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. आज (गुरुवार दि. 5) दीपक पुनिया कांस्यपदकासाठी रेपेचेज राऊंडमधील माईलस ऍमिने-अली शबानाऊ यांच्यातील विजेत्याशी लढेल.

दीपक पुनियासाठी 2018 वर्ल्ड चॅम्पियन व विद्यमान पॅन-अमेरिकन चॅम्पियन डेव्हिडविरुद्ध लढणे आव्हानात्मक होते आणि प्रत्यक्ष लढतीत तेच स्पष्ट झाले. दीपक काऊंटर ऍटॅकवर केवळ एकच आक्रमण करु शकला. अमेरिकेच्या डेव्हिडने पूर्ण लढतीत दीपकला फारशी संधी दिली नाही. 22 वर्षीय दीपकने या उपांत्य लढतीपूर्वी नायजेरियाच्या ऍगिओमॉरला तांत्रिकदृष्टय़ा सरस खेळाच्या बळावर नमवले व त्यानंतर उपांत्यपूर्व लढतीत चीनच्या झुशेन लिनविरुद्ध 6-3 अशी बाजी मारली होती.

दुसरीकडे, अंशू मलिक 57 किलोग्रॅम वजनगटात पहिल्याच लढतीत युरोपियन चॅम्पियन इरिना कुराशिकिनाविरुद्ध पराभूत झाली. मात्र, बेलारुसची ही प्रतिस्पर्धी नंतर फायनलमध्ये पोहोचल्याने 19 वर्षीय अंशूला पदकाच्या फेरीत दुसरी संधी मिळणार आहे. ती आता प्रथम रिपेचेज राऊंडमध्ये खेळेल व तेथे जिंकल्यास कांस्यपदकाच्या लढतीसाठी पात्र ठरणार आहे.

Related Stories

अरुंधती चौधरी उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

राणी रामपालकडे महिला हॉकी संघाचे नेतृत्व

Patil_p

सांबा : लष्कराच्या छावणीजवळ 4 संशयित ड्रोनचा वावर

datta jadhav

अमेरिकन सैन्याकडून 3200 नागरिकांची सुटका

datta jadhav

पहिला सामना जिंकून न्यूझीलंडची मालिकेत आघाडी

Patil_p

गुन्हेगारांची संपत्ती गरीबांमध्ये वाटणार; लवकरच कायदा

datta jadhav
error: Content is protected !!