तरुण भारत

वांते पुलासंबंधी सरकारला नोटीस

विघ्नेश शिरगुरकर यांच्या पत्राची न्यायालयाकडून दखल

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

या पावसाळय़ात सत्तरी तालुक्यातील अधिकतर पूल वाहून गेले. वांते येथील पूल दयनीय स्थितीत आहे. पण सरकारचे त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने किमान मुंबई उच्च न्यायालयाने त्यात लक्ष घालून न्याय द्यावा, अशी मगाणी करून सुखद वांते येथील विघ्नेश शिरगुरकर यांनी पाठवलेले पत्र उच्च न्यायालयाने सुमोटो जनहित याचिका म्हणून नोंदवून घेऊन सरकारला नोटीस पाठवली आहे. या याचिकेवरील सुनावणी सोमवार दि. 9 ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे.

वांते गावातील पूल आणि सर्वे क्र. 60/1 व सर्वे क्र. 110/1 मधील रस्त्याचे व पुलाचे फोटो लावून सदर युवकाने उच्च न्यायालयाला पत्र लिहिले होते. हा पूल मोडकळीस आला असून कधीही तो कोसळला जाऊ शकतो. अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे या पुलावरून जाणारी अवजड वाहतूक थांबवावी. पुलाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. जेथे पूल कोसळले आहेत तेथे नदी ओलांडण्यासाठी व्यवस्था करण्यात यावी अशी याचना या पत्रात करण्यात आली आहे.

सोमवार 9 रोजी याचिकेवर सुनावणी

या पत्राची दखल घेऊन उच्च न्यायालयाने सुमोटो जनहित याचिका म्हणून नोंदवून घेतली आहे. राज्याचे मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उपविभाग 4 व वर्क डिव्हिजन 16 वाळपई कार्यालयाला नोटीस बजावून प्रतिवादी करून घेतले आहे. सुखद वांते येथील याचिकादार विघ्नेश शिरगुरकर यांनाही नोटीस पाठवून दि. 9 ऑगस्ट रोजी होणाऱया सुनावणीवेळी हजर राहून योग्य तो तपशील सादर करण्याची सूचना केली आहे.

नगरगांव सत्तरी पंचायतीतील माळोली पुलाचा भाग या पुरात वाहून गेला. साट्रे नानोडा, वायंगिणी, कोदाळ, बांबर मेळोली या गावांसाठी हा पूल महत्त्वाचा असून या पुलावरून शेकडो वाहने रोज जात असतात. धबधब्यावर जाण्यासाठी या पुलाचा वापर होतो. या पुलाची दखलही पुढील सुनावणीवेळी घेतली जाण्याची शक्यता आहे.

दाबोसे पुलाची दयनीय अवस्था

वाळपई शहरापासून अवघ्या 6 कि. मी. अंतरावर असलेला दाबोसे पूल अरुंद आणि दयनीय अवस्थेत आहे. हा पूल फक्त 2 मीटर रुंदीचा आणि 200 मीटर लांब आहे. या ठिकाणी रुंद आणि भक्कम नव्या पुलाची मागणी अनेक वर्षापासून होत आहे. या जनहित याचिकेच्या माध्यमातून सत्तरी तालुक्यातील दुर्लक्षित पुलांच्या समस्येला वाचा फुटण्याची शक्यता आहे.

Related Stories

साळावली धरण पर्यटकांना खुले करण्यासाठी हालचाली

Omkar B

कांद्याचा दर वाढल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबाला आर्थिक चटके

Omkar B

दुर्गा – वेळ्ळी येथे 45 वर्षांनंतर बहरली शेती

Omkar B

लोहिया मैदानावरील पुतळा, स्मारक शोधून सुरक्षित ठिकाणी ठेवावे

Amit Kulkarni

जपानमध्ये अडकलेले 50 गोवेकर भारताकडे रवाना

tarunbharat

बोरी येथे कंटेनरची दोन दुकानांना धडक

Amit Kulkarni
error: Content is protected !!