तरुण भारत

पूर, कोरोना नियंत्रण : जबाबदारी मंत्र्यांवर

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय : गोविंद कारजोळ यांच्यावर बेळगाव जिल्हय़ाची जबाबदारी

प्रतिनिधी /बेंगळूर

Advertisements

नवे मंत्रिमंडळ अस्तित्वात येताच मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी बुधवारी सायंकाळी मंत्र्यांसमवेत पहिलीच मंत्रिमंडळ बैठक घेतली. यावेळी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सर्व मंत्र्यांना त्यांना ठरवून देण्यात आलेल्या जिल्हय़ांमधील कोरोना परिस्थिती आणि पूर नियंत्रण कामे हाती घेण्यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार गोविंद कारजोळ यांच्यावर बेळगाव जिल्हय़ाची तर शशिकला जोल्ले यांच्यावर विजापूर आणि उमेश कत्ती यांच्यावर बागलकोट जिल्हय़ाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

बुधवारी सायंकाळी बोम्माई यांच्या नेतृत्त्वाखाली विधानसौध येथे मंत्रिमंडळ बैठक झाली. सर्व मंत्र्यांना विविध जिल्हय़ांमध्ये पूर नियंत्रण आणि कोरोना परिस्थिती हाताळण्याची सूचना यावेळी देण्यात आली. त्याचप्रमाणे राज्यात सध्या असणाऱया कोविड टास्क फोर्सची पुनर्रचना करण्याचाही निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

अनुसूचित जमातीची अनेक दिवसांपासून असणारी एसटीपी योजनेची परिणामकारक अंमलबजावणीची मागणी पूर्ण करण्यास संमती दर्शविण्यात आली आहे. त्याकरिता स्वतंत्रपणे अनुसूचित जमाती कल्याण सचिवालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2021-22 सालातील राज्य अर्थसंकल्पात घोषित करण्यात आल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या देखरेखीखालील महिला संरक्षण आणि सबलीकरण योजनेच्या अंमलबजावणीचाही यावेळी निर्णय घेण्यात आला.

पूर आणि कोरोना नियंत्रणासंबंधी मंत्री गोविंद कारजोळ यांच्यावर बेळगाव जिल्हय़ाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर शशिकला जोल्ले यांच्यावर विजापूर जिल्हय़ाची तर उमेश कत्ती यांच्यावर बागलकोट जिल्हय़ाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बुधवारी रात्री यासंबंधीचे आदेशपत्रक जारी करण्यात आले आहे.

प्रत्येक मंत्र्यावर वेगवेगळय़ा जिल्हय़ाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मंत्री सी. सी. पाटील यांच्यावर गदग जिल्हय़ाची तर प्रभू चौहान यांना बिदर जिल्हय़ाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवराम हेब्बार यांना कारवार, शंकर पाटील मुनेनकोप्प यांच्यावर धारवाड जिल्हय़ातील पूर आणि कोरोना नियंत्रणासंबंधी जबाबदारी सोपविण्यात आली असून संबंधित मंत्र्यांनी त्वरित आपापल्या जिल्हय़ांमध्ये जाऊन कोरोना नियंत्रण आणि पूरग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना बोम्माई यांनी दिल्या आहेत.

Related Stories

अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून

Amit Kulkarni

मंत्री ईश्वरप्पा यांना मानहानी प्रकरणात कोर्टाकडून समन्स

triratna

कर्नाटकने ओलांडला एकूण ४ लाख कोरोना रुग्णांचा टप्पा

triratna

सीमाभाग महाराष्ट्राचाच; मुख्यमंत्री ठाकरेंनी दिला पुरावा

triratna

आमदार बसनगौडा पाटील – यत्नाळ यांनी दिले राजकीय भूकंपाचे संकेत

Rohan_P

मंगळूर विमानतळावर 1.23 किलो सोने जप्त

Amit Kulkarni
error: Content is protected !!