तरुण भारत

झाराप येथे रविवारी विद्यार्थी सन्मान सोहळा

तरुण भारत, सेवा सहयोग, भगिरथ, आम्ही बॅचलरच्या समन्वयातून कार्यक्रम

दहावीच्या परीक्षेतील होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन

Advertisements

भगिरथ प्रतिष्ठानच्या प्रांगणात होणार कार्यक्रम

सेवा सहयोगचे रवींद्र कर्वेंची प्रमुख उपस्थिती

प्रतिनिधी / झाराप:

प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत व त्यातही कोरोना संकटकाळात कमालीचा संघर्ष करीत यावषी इयत्ता दहावीच्या परीक्षेत होतकरु विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठीचा सन्मान सोहळा 8 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता झाराप येथील भगिरथ प्रतिष्ठानच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.

‘तरुण भारत’, सेवा सहयोग (मुंबई), भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, आम्ही बॅचलर ग्रुप आदी सहयोगी संस्थांच्या समन्वयातून हा कार्यक्रम होत आहे. ठाणे जनता सहकारी बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी व समाजातील वंचित घटकांना शिक्षण व आरोग्य सुविधा देण्यासाठी कार्यरत असलेले सेवा सहयोगचे रवींद्र कर्वे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. ‘तरुण भारत’चे सिंधुदुर्ग आवृत्ती प्रमुख व कोकण समन्वयक शेखर सामंत, भगिरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे वामन तर्फे, आम्ही बॅचलर ग्रुपचे प्रभाकर सावंत, डॉ. रवींद्र जोशी आदी उपस्थित राहणार आहेत.

‘यांचा आनंद 100 टक्के’ या उपक्रमाचे हे तेरावे वर्ष आहे. ‘तरुण भारत’च्या चळवळीतून हा उपक्रम सुरू झाला. परिस्थितीशी संघर्ष करीत व पुढील शिक्षणाची तळमळीने आस धरून असणारे विद्यार्थी दरवषी या उपक्रमासाठी निवडले जातात. त्यांना प्रोत्साहक सन्मानपूर्वक शिष्यवृत्ती देण्यात येते. या होतकरु मुलांचीही एकप्रकारे ‘सामाजिक बुद्धिमत्ता’ असते. त्याला पोषक वातावरण निर्माण करणे, त्यासाठी समाजातील प्रोत्साहक घटकांची साखळी निर्माण करणे हाही उद्देश यामध्ये आहे. यावषी प्रति विद्यार्थी पाच हजार रु. शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम प्रातिनिधिक स्वरुपात होणार आहे.

आतापर्यंत या उपक्रमांतर्गत जिल्हय़ातील 562 विद्यार्थ्यांना ‘विकास योजनें’तर्गत शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. यावषी प्रथमच या उपक्रमात 60 माध्यमिक शाळा प्रत्यक्षरित्या विद्यार्थी निवड प्रक्रियेत सहभागी झाल्या. विशेष म्हणजे सुरुवातीला 31 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली ही योजना यावषी 103 लाभार्थी विद्यार्थी संख्येपर्यंत पोहोचली आहे.

                    ‘एकमेका सहाय्य करू..’

गेले एक तप सुरू असलेल्या ‘यांचा आनंद 100 टक्के’ उपक्रमाची यावषीची थीम ‘एकमेका सहाय्य करू, ज्ञानांकुर छान तरारु’, अशी आहे. कठीण प्रसंगातही आपल्या बुद्धीची चमक दाखविणारे, आपल्या उज्ज्वल भविष्याला तेजोमय करण्याचे स्वप्न बाळगणारे आजचे विद्यार्थी संकटातही न डगमगता पुढे जाऊ पाहत आहेत. त्यांच्या बुद्धिमत्तेचा कल्पतरू जोपासण्यासाठी सरस्वतीचे उपासक असणाऱया सर्वांनीच यासाठी भविष्यात प्रोत्साहक बळ देणे महत्त्वाचे ठरणार आहे.

                                      सेवा सहयोगची मदत

 या उपक्रमासाठी दरवषी सेवा सहयोगची आर्थिक मदत मोठी असते. यावषी साडेतीन लाख रु. एवढा निधी या उपक्रमासाठी दिला आहे. रवींद्र कर्वे यांनी समाजातील वंचितांच्या आरोग्य व उच्च शिक्षणासाठी गेल्या सात वर्षांमध्ये ठिकठिकाणी मिळून 7.5 कोटीचा निधी सेवा सहयोगच्या माध्यमातून उभा केला आहे.

Related Stories

लॉकडाऊन कालावधीतील नरडवे धरणाचे काम बंद करावे!

NIKHIL_N

दर्याराजा शांत हो…आमचे रक्षण कर!

Patil_p

जेईई, नेट परीक्षा रद्द कराव्यात!

NIKHIL_N

रत्नागिरी : हातपाटी वाळूबाबत लवकरच धोरण ठरवणार!

triratna

रत्नागिरी नगर परिषदेचे बदलते धोरण

Patil_p

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱया युवकावर गुन्हा

NIKHIL_N
error: Content is protected !!