तरुण भारत

गोगावलेवाडी ग्रामपंचायत सदस्याचा निर्घृण खून

खुनाचे कारण अस्पष्ट; पोलिसांची तपास पथके रवाना

वार्ताहर /एकंबे

Advertisements

गोगावलेवाडी (ता. कोरेगाव) येथील ग्रामपंचायत सदस्य व कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयातील शालेय आरोग्य तपासणी मोहिमेच्या खाजगी वाहनावरील चालक मंगेश गणपत जाधव (वय 35) याचा कुमठे गावच्या हद्दीत धोम डाव्या कालव्यानजिक शिवार रस्त्यावर निर्घृणपणे खून करण्यात आला. दोन दिवसांपूर्वी खून झाल्याचा कयास पोलिसांचा असून, त्याचदृष्टीने तपासाची यंत्रणा गतिमान करण्यात आली आहे. घटनास्थळी उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱयांनी भेट देऊन तपासकामी मार्गदर्शन केले.

याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळावरुन व पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, मंगेश जाधव हा गोगावलेवाडी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा प्रमुख कार्यकर्ता असून, सातारा जिल्हा नाथ समाजाचा पदाधिकारी होता. ग्रामपंचायत निवडणुकीत तो विजयी झाला होता. सक्रीय सदस्य म्हणून तो ग्रामपंचायतीत दैनंदिन कामकाज पाहत होता.

उदरनिर्वाहासाठी तो कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयामार्फत संपूर्ण तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व लसीकरण मोहीम राबविणाऱया पथकाच्या खाजगी टाटा सुमो वाहनावर चालक म्हणून काम गेल्या एक वर्षापासून काम करत होता.

बुधवार दि. 4 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास तो कोरेगाव येथे कामावर जाण्यासाठी गोगावलेवाडी येथून निघाला. तसे तो घरात सांगून गेला होता. सायंकाळी तो घरी परत आला नाही, म्हणून आई व पत्नी काळजीत होत्या. नेहमी वेळेत घरी परतणारा, आज उशिरापर्यंत घरी कसा आला नाही, ही बाब खटकली. त्यामुळे त्यांनी मंगेश याच्या दोन्ही मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही क्रमांक स्वीच ऑफ येत होते. त्यांनी नातेवाईकांकडे चौकशी केली, मात्र त्यांनी देखील मंगेश आमच्याकडे आला नाही, असे सांगितले. त्यामुळे घरातील लोकांमध्ये काळजी वाढली.

गुरुवार दि. 5 ऑगस्ट रोजी आई शोभा हा गावातील शेजारीच असलेल्या यश बेबले याला बरोबर घेऊन सकाळी 7.30 च्या सुमारास कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयात गेल्या, तेथे सुमो वाहनाचे मालक व अन्य कर्मचाऱयांकडे चौकशी केली असता, त्यांनी 5 वाजेपर्यंत मंगेश हा रुग्णालयातच होता, तेथून तो कोठे गेला, हे माहीत नाही, असे सांगितले. त्यानंतर त्या कोरेगाव पोलीस ठाण्यात आपला मुलगा बेपत्ता झाला असल्याची तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडील माहिती जाणून घेतल्यानंतर त्यांना धोम डाव्या कालव्यानजिक शिवाराच्या रस्त्यावर नेले. तेथे रस्त्याकडेला रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला युवकाची माहिती दिली व त्याचा चेहरा दाखविला, तो मंगेश असल्याचे आई शोभा जाधव यांनी ओळखले.

अज्ञात व्यक्तीने मंगेश याचा खून केला असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यानंतर शोभा गणपत जाधव यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे व पोलीस नाईक अमोल सपकाळ तपास करत आहेत.

पोलिसांची तपास पथके

मंगेश जाधव याचा खून हा वादातून झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्यानंतर पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांनी तत्काळ पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना शिंदे, संतोष साळुंखे, उपनिरीक्षक विशाल कदम व रहिमतपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड, उपनिरीक्षक प्रमोद सावंत यांना तपासकामी मार्गदर्शन केले. पोलिसांनी चारही बाजूने तपास करण्यास वेगवेगळ्या पथकांद्वारे सुरुवात केली आहे. मंगेश याच्याशी ज्यांचे वाद होते, त्यांची चौकशी देखील केली जात आहे.

Related Stories

जनावरांच्या लसीकरणाची मोहीम अंतिम टप्प्यात

datta jadhav

महाबळेश्वर येथे युवकाची आत्महत्या

datta jadhav

सोशल मीडिया सेलच्या जिल्हा सरचिटणीसपदी तन्मय देशमुख

Patil_p

जरंडेश्वर कारखान्यात स्फोट; एकाचा मृत्यू

Patil_p

जिल्ह्यात पहिल्यांदाच निळ्या भाताची लागवड

datta jadhav

अजिंक्यतारा साखर कारखान्याकडून हॅन्ड सॅनिटायझरची निर्मिती

Abhijeet Shinde
error: Content is protected !!