तरुण भारत

हॉकीत गतवैभवाला उजाळा, कुस्तीत पुन्हा रौप्य बहार!

माजी विजेत्या जर्मनीला 5-4 गोलफरकाने हरवून मिळविले कांस्यपदक, देशभर जल्लोष, हॉकी संघावर कौतुकाचा वर्षाव

वृत्तसंस्था /टोकियो

Advertisements

पुरुष हॉकी संघाने 41 वर्षांनंतर भारताला ऑलिम्पिक पदक मिळवून देण्याचा नवा इतिहास घडविला. कांस्यपदकासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत रिओ कांस्यविजेत्या जर्मनीवर 5-4 अशा गोलफरकाने मात केली. कांस्य पटकावल्यानंतर देशभरात आनंदाची लहर उमटली असून जल्लोषासह मनदीप सिंगच्या संघावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला आहे. बेल्जियमने ऑस्ट्रेलियाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-2 असा पराभव करून सुवर्णपदक पटकावले.

आठ वेळा सुवर्णपदक जिंकलेल्या भारताला गेली चार दशके पदकासाठी संघर्ष करावा लागला होता. पण गेल्या दोन वर्षात नव्या उमेदीने, जिद्दी खेळ करीत अखेर ऑलिम्पिक पदक पटकावून त्यावर यशाचा कळस चढविला. हॉकी हा राष्ट्रीय खेळ असल्याने साऱया देशवासियांच्या भावना त्यात गुंतल्या होत्या. त्यामुळे दीर्घ प्रतीक्षेनंतर येथे मिळविलेले कांस्यपदकही या सर्वांसाठी सुवर्णपदकाच्या तोलामोलाचेच आहे. भारताचे या ऑलिम्पिकमध्ये मिळविलेले हे पाचवे पदक आहे.

या सामन्यात सिमरनजीत सिंगने (17 व 34 वे मिनिट) दोन गोल नोंदवले तर हार्दिक सिंग (27), हरमनप्रीत सिंग (29), रुपिंदर पाल सिंग (31) यांनी भारताचे एकेक गोल नोंदवले. जर्मनीचे गोल तिमुर ओरुझ (दुसरे मिनिट), निकलास वेलेन (24), बेनेडिक्ट फुर्क (25) व लुकास विंडफेडर (48) यांनी प्रत्येकी एक गोल केला.

पदक मिळवायचेच, या निर्धाराने उतरलेल्या भारतीय संघाने या सामन्यात दोनदा पिछाडीवर पडल्यानंतरही जोरदार मुसंडी मारत हॉकीच्या इतिहासातील एक संस्मरणीय विजय नोंदवला. बेल्जियमविरुद्धच्या उपांत्य फेरीतील सामन्यात केलेल्या चुकाच भारतीय खेळाडूंनी या सामन्यातही केल्या. त्यामुळे 25 व्या मिनिटापर्यंत त्यांना 1-3 अशा पिछाडीवर पडावे लागले होते. पण नंतर त्या चुकांची दुरुस्ती करीत 27 ते 34 या केवळ सात मिनिटांच्या अवधीत चार गोल नोंदवून भारताने जर्मनीवर 5-3 अशी आघाडी घेतली. 48 व्या मिनिटाला जर्मनीने गोल नोंदवत भारताची आघाडी 5-4 अशी कमी केली. पण त्यानंतर बचाव फळी व गोलरक्षक पीआर श्रीजेश यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत जर्मनीला बरोबरी साधण्यापासून रोखत अखेर विजय साकार केल्यानंतर खेळाडू व भारतीय समर्थकांच्या जल्लोषाला सुरुवात झाली. प्रत्येक खेळाडूचे डोळे आनंदाने पाणावले होते आणि एकमेकांना आलिंगन देत त्यांनी आनंद साजरा केला. प्रशिक्षक ग्रॅहॅम रीड यांनीही या ऐतिहासिक यशाचा आनंद लुटला. गोलरक्षक श्रीजेशने तर गोलपोस्टवर चढून बसत आनंद साजरा केला.

ऑलिम्पिकमधील तिसरे कांस्य

ऑलिम्पिकच्या इतिहासातील भारताचे हॉकीमधील हे तिसरे कांस्यपदक आहे. याआधी 1968 मेक्सिको सिटी आणि 1972 म्युनिच ऑलिम्पिकध्ये कांस्यपदके मिळविली होती. क्रमवारीत तिसऱया स्थानावर असणाऱया भारताची आता एकूण 12 ऑलिम्पिक पदके झाली असून त्यात 8 सुवर्णपदकांचा समावेश आहे. त्यामुळे भारत हा ऑलिम्पिक हॉकीमधील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखला जातो. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असणाऱया जर्मनीने मागील रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविले होते. पण त्याची पुनरावृत्ती त्यांना यावेळी करता आली नाही. जर्मनी हा भारतानंतरचा दुसरा सर्वात यशस्वी संघ असून त्यांनी एकूण चारवेळा सुवर्णपदक पटकावले आहे. 2008 व 2012 मध्ये त्यांनी लागोपाठ सुवर्ण मिळविले होते. त्यामुळे यावेळी त्यांना पदकाविना परतावे लागत आहे.

जर्मनीचे वर्चस्व

पूर्वार्धात भारताची संथ सुरुवात झाली होती, पण जर्मनीनेच पहिल्या सत्रात वर्चस्व राखले होते. प्रारंभापासूनच भारतीय हद्दीत खेळ करीत त्यांनी भारताच्या बचावफळीवर दडपण आणत दुसऱयाच मिनिटाला गोल नोंदवून आघाडी घेतली. पाचव्या मिनिटाला भारताने पेनल्टी कॉर्नर मिळविला, पण तो वाया गेला. पाच मिनिटानंतर अनुभवी गोलरक्षक श्रीजेश आपली जागा सोडून पुढे आला आणि मॅट्स ग्राम्बुशचा प्रयत्न फोल ठरविला. सतत हल्ले चढवित जर्मनीने या सत्रात चार पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. पण भारताने त्यावर व्यवस्थित बचाव केला.

दुसऱया सत्रात भारताने डावपेचात बदल करून वेगवान खेळ करण्याचे धोरण अवलंबले आणि त्यांची ही चाल यशस्वी ठरली. निलकांता शर्माच्या मिडफिल्डमधून मिळालेल्या पासवर सिमरनजीतने रिव्हर्स हिटवर शानदार गोल नोंदवून भारताला बरोबरी साधून दिली. दोन मिनिटानंतर फ्लोरियनचा रिव्हर्स हिट श्रीजेशने पुन्हा एकदा फोल ठरविला. मात्र बचावातील त्रुटींचा लाभ घेत जर्मनीने दोन मिनिटांच्या फरकाने दोन गोल नोंदवून भारतावर 3-1 अशी आघाडी घेतली. पिछाडीवर पडले तरी खचून न जाता भारतीयांनीही जोरदार मुसंडी मारत तीन मिनिटांत दोन गोल नोंदवत बरोबरी साधली आणि नंतर आघाडीही घेतली. 27 व्या मिनिटाला दुसऱया पेनल्टी कॉर्नरवर हार्दिकने रिबाऊंडवर गोल केल्यानंतर 29 व्या मिनिटाला हरमनप्रीतने जबरदस्त फ्लिकवर बरोबरी साधून दिली.

उत्तरार्धात भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावलेला दिसला आणि पहिल्याच मिनिटाला गोल करीत 4-3 अशी आघाडी घेतली. मनदीपला सर्कलमध्ये ढकलल्याने भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला, त्यावर रुपिंदर पाल सिंगने अचूक गोल नोंदवला. तीन मिनिटानंतर सिमरनजीतने गुर्जंत सिंगच्या पासवर वैयक्तिक दुसरा गोल नोंदवून आघाडी 5-3 अशी वाढविली. 41 व्या मिनिटाला भारताने पाठोपाठ 2 पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. पण ते वाया गेले. दोन गोलांची पिछाडी असल्याने जर्मनीने नंतर जोर वाढवला आणि शेवटच्या सत्रातील तिसऱया मिनिटाला पीसी मिळविला. यावेळी विंडफेडरने मारलेला फटका श्रीजेशच्या पायामधून गोलपोस्टमध्ये गेला. 51 व्या मिनिटाला मनदीपने आघाडी वाढविण्याची सुवर्णसंधी मिळाली होती. पण ती त्याला साधता आली नाही. जर्मनीने तीन पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. पण बचाव फळी व श्रीजेशने त्यावर उत्तम संरक्षण केले. 6 सेकंद बाकी असताना आणखी एक पेनल्टी कॉर्नर श्रीजेशने वाचवित विजयावर शिक्कामोर्तब केले.

भारताने मिळविलेली ऑलिम्पिक पदके

वर्ष      ऑलिम्पिक   पदक

1928   ऍमस्टरडॅम   सुवर्ण

1932   लॉस एंजेल्स सुवर्ण

1936   बर्लिन         सुवर्ण

1948   लंडन          सुवर्ण

1952   हेलसिंकी     सुवर्ण

1956   मेलबर्न        सुवर्ण

1960   रोम            रौप्य

1964   टोकियो       सुवर्ण

1968   मेक्सिको सिटी     कांस्य

1972   म्युनिच        कांस्य

1980   मॉस्को        सुवर्ण

2021 टोकियो  कांस्य

पुरुषांच्या फ्री स्टाईल 57 किलोग्रॅम वजनगटात रवि कुमार दहिया ऑलिम्पिकमध्ये रौप्य जिंकणारा भारताचा दुसरा मल्ल ठरला. दहियाकडून या वजनगटात सुवर्णपदकाची अपेक्षा होती. मात्र, रशियाचा वर्ल्ड चॅम्पियन झेव्हूर उगूएव्हने त्याला 7-4 फरकाने पराभूत केले आणि भारताची सुवर्णपदकाची संधी हुकली. हरियाणा सरकारने रवि दहियाला 4 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

23 वर्षीय दहिया भारताचा सर्वात तरुण ऑलिम्पिक चॅम्पियन ठरेल, अशी अपेक्षा होती. ती देखील रशियन झेव्हूरच्या जिगरबाज खेळामुळे संपुष्टात आली.

दहियाला यापूर्वी 2019 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये देखील झेव्हूरकडून पराभव पत्करावा लागला होता. त्याच निकालाची येथे पुनरावृत्ती झाली.

दोनवेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेला झेव्हूर दोन्ही सत्रात भारतीय मल्लापेक्षा सरस ठरला. प्रारंभी, झेव्हूरने दहियाला सर्कलबाहेर ढकलत पहिला गुण प्राप्त केला आणि हेच तंत्र आणखी एक अंमलात आणत आघाडी भक्कम केली. दहियाने सुपर टेकडाऊनच्या बळावर 2-2 अशी बरोबरी मिळवली. पण, उर्वरित टप्प्यात पुन्हा झेव्हूरच सरस ठरत गेला.

तीन मिनिटांच्या पहिल्या सत्राअखेर 2-4 अशा फरकाने पिछाडीवर असलेल्या दहियाने दुसऱया सत्रात आक्रमक सुरुवात केली. मात्र, या आक्रमणाचे गुणात रुपांतर करणे त्याला शक्य झाले नाही. उलटपक्षी, झेव्हूरने त्याला आणखी एकदा सर्कलबाहेर ढकलत 2 मिनिटे बाकी असताना आघाडी 5-2 अशी भक्कम केली.

रशियन झेव्हूरने टेकडाऊनवर आणखी दोन गुण घेण्यापूर्वी रेफ्रींनी दहियाला समज दिली होती. 90 सेकंद बाकी असताना दहियाने कमबॅक करण्याच्या प्रयत्नात 2 गुण मिळवले. शेवटचे 60 सेकंद असताना त्याने पिछाडी 4-7 अशी कमी केली. मात्र, अंतिमतः त्याची ही झुंज अपयशी ठरली.

अंतिम क्षणी हुकले दीपक पुनियाचे कांस्य

Related Stories

बंगाल, तामिळनाडूची विजयी सलामी

Patil_p

वनडे मालिकेत भारताची विजयी सलामी

Patil_p

AUS vs IND : भारतासमोरचे 185 धावांचे आव्हान अधिकच खडतर

tarunbharat

इंडिया लिजेंड्सला विजेतेपद

Patil_p

इंग्लंडचे द. आफ्रिकेला 259 धावांचे आव्हान

Patil_p

धोनीला इतक्यात निवृत्त करु नका

Patil_p
error: Content is protected !!