तरुण भारत

भयंकर वणवे, प्रलयंकारी महापूर, उपाय काय?

गेल्या महिन्याच्या दुसऱया पंधरवडय़ात कोसळलेल्या अति पावसाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शहरे आणि कित्येक हेक्टर शेती पाण्याखाली गेली. हे केवळ महाराष्ट्रातच घडले असे नाही तर जगातील अनेक देशांमध्ये असे, किंबहुना याहून भयंकर महापूर आले. त्यात मोठय़ा प्रमाणावर जीवितहानी झाली आणि अनेक लोक बेपत्ता झाले. अपरिमित वित्तहानी झाली. चीनमध्ये तीनशेहून अधिक तर जर्मनी आणि बेल्जियममध्ये दोनशेच्या आसपास माणसे पुरात बळी गेली. नवलाईची गोष्ट अशी की एकीकडे नद्यांना महापूर येत असताना दुसरीकडे काही देशांमध्ये एकामागोमाग एक वणवे भडकत होते. कॅनडासारख्या थंड हवामानाच्या देशात उष्णतेच्या लाटांनी लोक बेजार झाले, कित्येक प्राणाला मुकले. युरोप हा थंड हवामानाचाच खंड, त्यातल्या तुर्कस्तान आणि ग्रीस या देशात उच्चांक मोडणारा उष्मा आणि प्रलयंकारी पूर यांनी थैमान घातले. युगांडा आणि भारतात नद्यांनी यापूर्वीच्या धोक्मयाच्या पातळय़ा कितीतरी खाली ढकलल्या. सगळीकडे हाहाकार उडाला.

ग्रीसमध्ये पात्रास प्रांतात ऑगस्ट महिना उजाडला तोच मुळी अतिभयंकर वणव्यांना सोबत घेऊन. 2 ऑगस्ट रोजी तिथे अक्षरशः होरपळ सुरू झाली. एकापाठोपाठ एक करत अवघ्या 24 तासात 65 वणवे लागले. तज्ञांच्या मते अत्यंत कोरडे हवामान, उष्णतेच्या लाटा आणि जोरदार वारे ही यामागची कारणे होती. याच काळात वणव्यांनी भाजून काढलेला दुसरा देश म्हणजे तुर्कस्तान. या वषी त्यांची व्याप्ती प्रचंड होती. 2008 आणि 2020 मध्ये त्यांनी 13,516 हेक्टर व्यापले होते, यंदा 95 हजार जमीन त्यांनी भाजून काढली. कॅनडा आणि अमेरिका या एरवी आल्हाददायक शीत हवामानाच्या प्रदेशात उष्माघाताने शेकडो माणसे मृत्युमुखी पडली. सिएटल या शहराने कधी नव्हे ते 42 अंश सेल्सिअस तापमान पाहिले, ‘लिटन कॅनडा’मध्ये तर तापमापकाचा पारा 49.6 अंशांवर पोहोचला. हे तर आखाती देशांनाही लाजवणारे तापमान! युरोपात महापुराने थैमान घातले. जर्मनी, बेल्जियम आणि नेदरलँड यांना पुरांनी अक्षरशः धुवून काढले. गेल्या 50 वर्षात पाहिली नव्हती अशी आपत्ती जर्मन लोकांनी अनुभवली. जर्मनीमधील ऱहाईनलॅण्ड पॅलाशिनेट आणि उत्तर ऱहाईन-वेस्टफॅलिया भागात सलग 48 तास पाऊस पडत राहिला आणि आपल्याकडच्या चिपळूण-महाड आणि सांगलीसारखी अवस्था झाली. या दोन दिवसात दर चौ.मी.मध्ये 148 लीटर या प्रमाणात अतिवृष्टी झाली. तिकडे पावसाची नेहमीची सरासरी दर चौ.मी.मागे 82 लीटर एवढीच आहे. जर्मनीत 136 माणसे बळी गेली, बेल्जियममध्ये 36. आपल्या देशातील पूरग्रस्त भागाला भेट देणाऱया जर्मनीच्या चँसेलर अँजेला मर्केल उद्गारल्या, ‘हे  भयानक आहे, या उत्पाताचे वर्णन करण्यास जर्मन भाषेत शब्द नाहीत!’ याचा अर्थ त्या देशाने असला विध्वंसक प्रलय यापूर्वी पाहिलाच नव्हता!

Advertisements

अशीच अभूतपूर्व परिस्थिती चीनमध्ये उद्भवली. तिथल्या हेनान प्रांतात जुलै महिन्याचा मध्य महापुराचा आठवडा ठरला. तिथली पावसाची वार्षिक सरासरी 641 मिमी आहे, पण दोनच दिवसात ती सरासरी मोडून पर्जन्यमान 720 मिमीवर पोहोचले. या पुराच्या तडाख्याने रस्त्यांची वाट लावली, धरणे आणि बंधारे उडवून दिले आणि रुग्णालयांचा वीजपुरवठा तोडून टाकला.

या भयकारी नैसर्गिक आपत्तीने शास्त्रज्ञही भयचकित झाले. ‘युरोपसारख्या जगातील अतिश्रीमंत आणि तंत्रज्ञानात पुढारलेल्या राष्ट्रांमध्ये हे कसे काय घडू शकले’ हा प्रश्न त्यांना पडल्याचे निरीक्षण ‘सायन्स’ या जगविख्यात विज्ञान मासिकाने नोंदविले. युनायटेड किंगडम (इंग्लंड) मधील स्त्राचेलाइड विद्यापीठाच्या ख्रिस्तोफर व्हाइट या प्राध्यापकांनी म्हटले की महापूर आणि वणवे या परस्परविरोधी घटना वाटल्या तरी त्यांच्यात आंतरिक संबंध आहे. इंग्लंडमधल्या हवामान विभागाने स्पष्टपणे सांगून टाकले की आत्यंतिक पावसाचा माणसाच्या वातावरणविषयक चुकांशी संबंध जोडणारे निष्कर्ष 1980 पासूनच निघू लागले आहेत. प्रलयंकारी पूर आणि वणवे यांची समस्या काही आत्ताच उद्भवलेली नाही. गेल्या 50 वर्षात (1970-2019) कोरडय़ा दुष्काळात साडेसहा लाख माणसे बळी गेली, तुफान आणि वादळांनी पावणेसहा लाखाहून जास्त जीव घेतले, महापुरांनी 58,700 आणि आत्यंतिक उष्णतेने 55,736 माणसांचे प्राण घेतले अशी आकडेवारी जागतिक हवामान संघटनेकडून मिळते. आर्थिक नुकसान किती झाले ते मोजण्यापलीकडचे आहे.

जुलै महिन्यात झालेल्या या भयंकर उत्पातामध्ये नेदरलँडमध्ये कमी हानी झाली, असे आढळले. ‘पुरापासून बचाव करण्याचे अनेक दशकांपासून चालू असलेले प्रयत्न त्या देशात फळाला आले,’ असे वैज्ञानिकांना वाटते. तिथल्या म्यूज नदीच्या महापुराने फारशी हानी केली नाही. वाल्कनबर्ग शहरातून वाहणाऱया म्यूजच्या एका उपनदीचे पात्र ओसंडून पाणी शहराच्या मध्यभागी पसरले, पण एकही मनुष्य मृत्यू पावला नाही. नद्यांच्या प्रवाहांना जागा करून देण्याच्या नेदरलँडच्या धोरणाचा हा सकारात्मक परिणाम आहे. त्या देशाने नदीपात्रांची खोली आणि रुंदी वाढवली. त्याबरोबरच पाण्याचा प्रवाह पात्राबाहेर पडल्यास पाणी ओढ घेईल त्या भागाकडे शक्मय तेवढी मोकळी जमीन उपलब्ध करण्याचे तंत्र अवलंबिले. परिणामी म्यूज नदीला पूर आल्यास पाण्याच्या पातळीची वाढ पूर्वीपेक्षा एक मीटरने कमी करण्यात यश आले. नेदरलँडच्या पश्चिम-वायव्येस म्यूज, ऱहाईन, स्केल्ट, वॉल आणि आयजेल या नद्यांची जवळजवळ वाहणारी पात्रे नूर्डझ समुद्राला मिळतात तेथे आपल्याकडच्या ‘सुंदरबन’सारखा त्रिभुज प्रदेश (डेल्टा) तयार झाला आहे. तेथे महापूर येणे आणि समुद्राचे पाणी किनाऱयावरून आत पसरणे या समस्यांवर तोडगे काढण्यासाठी प्राचीन काळापासून प्रयत्न होत आहेत. रुंद पाया असलेले कित्येक कि.मी. लांबीचे नदीकिनाऱयाने जाणारे वाळूचे बंधारे, मध्यम आणि जास्त उंचीच्या पात्राला समांतर भिंती आणि गरजेनुसार प्रवाह थोपविणे आणि वळवणे यासाठी प्रचंड आकाराचे दरवाजे त्या देशात सर्वत्र आढळतात. आकाराने लहान असणाऱया त्या देशाची 60… जमीन त्या पाणथळ त्रिभुज प्रदेशाने व्यापली आहे. नेदरलँडची 70… जनता त्याच प्रदेशात राहते आणि एकूण राष्ट्रीय उत्पादनापैकी 70… म्हणजे सरासरी 650 अब्ज युरो मूल्याचा हिस्सा हाच प्रदेश उभा करतो. पुरापासून बचाव करण्यासाठी त्या देशाने योजलेल्या उपायांचा अन्य पूरग्रस्त प्रदेशांनीही विचार करणे हिताचे ठरेल. ‘डच फ्लड प्रोटेक्शन प्रोग्राम’ आखून 2050 पर्यंत या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न आहे. यात (1) पूरस्थिती टाळणे, (2) स्थानिक परिस्थितीप्रमाणे उपाय करून पुराच्या परिणामातून मार्ग काढणे आणि (3) आणीबाणीच्या प्रसंगी योजावयाचे उपाय अवलंबिणे अशी त्रिस्तरीय कार्यपद्धती आहे. नदीपात्रात कोणत्याही प्रकारची बांधकामे होऊ न देणे हा त्यातील सर्वात प्रभावी उपाय. पूरस्थितीचे मॉडेल आणि पूर कुठपर्यंत पसरू शकतो त्याचे नकाशे बनवून लोकशिक्षण करणे हा उपायही प्रभावी ठरला आहे. वातावरणातील अनपेक्षित बदलांची परिस्थिती विचारात घेता, जगातील सर्वच देशांना आता अशा उपायांचे प्रकल्प हाती घेऊन कार्यक्षमतेने राबवावे लागतील.

राजेंद्रप्रसाद मसुरकर,  9960245601

Related Stories

गोष्टी : कालच्या आणि आजच्या

Patil_p

लसीकरणः न्यायालयाच्या पिंजऱयात सरकार आरोपी

Patil_p

विनाशकाले क्रिकेट बुद्धी

Patil_p

कोरोनाधीन आहे जगती मानवी समाज

Patil_p

केरळमध्ये माकपसमोर नवी आव्हाने

Patil_p

भारत व ऑस्ट्रेलिया संबंध

Patil_p
error: Content is protected !!