तरुण भारत

सुवर्णपदकाचे कौतुक अन् अप्रूपही !

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने सुवर्णपदक प्राप्त करून भारतीयांच्या आनंदाला उधाण आणले आहे. दर चार वर्षांनी होणाऱया या जगातील सर्वात मोठय़ा आणि सर्वात महत्त्वाच्या क्रीडा महोत्सवातील अति तीव्र स्पर्धात्मकता लक्षात घेता सुवर्णपदकाची प्राप्ती हा निश्चितच अभिमानाचा, गौरवाचा आणि समाधानाचा मानबिंदू आहे. या स्पर्धेत दशकानुदशके खोऱयाने सुवर्णपदके ओढणाऱया अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन आदी ‘दादा’ देशांसमोर भारत अद्य ापही अक्षरशः लिंबूटिंबूच म्हणावा लागेल. नीरजने मिळविलेले हे सुवर्णपदक ऑलिम्पिकमधील ‘ऍथलेटिक्स’ क्रीडा प्रकारातील भारताने आतापर्यंतच्या इतिहासात पटकावलेले प्रथम सुवर्णपदक आहे, हे लक्षात घेता त्याचे अनन्यसाधारण महत्त्व कळते. हॉकी या खेळाचा, (8 सुवर्णपदके) अपवाद वगळता इतर क्रीडा प्रकारांमध्ये आतापर्यंत अवघी दोन सुवर्णपदके भारताच्या पदरात पडली आहेत. त्यांच्यात नीरजचे हे एक आहे. असे असले तरी या सुवर्णपदकाचे महत्त्व तीळमात्रही कमी होत नाही. या सर्वोच्च यशाचा धनी होण्यासाठी त्याने गेले दशकभर केलेले सातत्यपूर्ण कष्ट, दाखविलेला दृढ निर्धार आणि सकारात्मक मनोभावना यांचे अनुकरण प्रत्येकाने केवळ क्रीडा क्षेत्रातच नव्हे, तर सर्वच क्षेत्रांमध्ये करणे आवश्यक आहे. ज्या देशात क्रिकेट आणि काही प्रमाणात हॉकी हे खेळ सोडले तर इतर असंख्य क्रीडाप्रकारांची साधी नावे सुशिक्षितांनाही माहीत नसतात, आणि ज्या देशात अन्य क्रीडाप्रकारांमध्ये जागतिक स्तरावर नाव मिळविण्याची ‘पहाट’ आता कुठे उगवू लागली आहे, अशा देशाच्या नागरिकाने भालाफेकीसारख्या क्षेत्रात जगाला थक्क करून सोडणारी सर्वोत्तम कामगिरी करावी, हा अधिकच प्रशंसेचा विषय आहे. अशीच कामगिरी अभिनव बिंद्रा याने नेमबाजीत 2008 मध्ये, करून दाखविलेली होती. त्यानंतर या पदकाने भारताला हुलकावणीच दिली होती. यंदाच्या ऑलिम्पिक पदकतालिकेतही भारताच्या नावासमोरची पहिली संख्या शून्यच राहणार की काय, अशी चिंता लागून राहिलेल्या क्रीडाप्रेमींना नीरजच्या सुवर्णपदकाने भगभगणाऱया जखमेवर थंडगार फुंकर घातल्यासारखा दिलासा दिला. या सुवर्णपदकाने भारत पदक तालिकेत पहिल्या 50 देशांच्या आत आला आहे. याच सुवर्णपदकाने भारताला कोणत्याही ऑलिम्पिक स्पर्धेतील सर्वाधिक पदकेही मिळवून दिली आहेत. भारताचा या स्पर्धेतील आतापर्यंतचा उच्चांक 2012 मध्ये 6 पदकांचा होता. नीरजने हे सुवर्ण मिळवेपर्यंत आपली पदक संख्या नेमकी सहाच होती. त्यावर सोन्याचा कळस चढविण्याचे काम या सुवर्णपदकाने केले. एकंदरच, या स्पर्धेत भारताचा उत्साह वाढावा, अशा काही सकारात्मक घटना घडल्या आहेत. कोरोनाच्या उद्रेकाशी देश झुंजत असताना झालेली ही कामगिरी स्पृहणीय आहे. कोरोनामुळे ही स्पर्धा वर्षभर पुढे ढकलण्यात आली. हा विलंब जणू खेळाडूंच्या संयमाच्या आणि परिश्रमांच्या परीक्षेसारखाच होता. पी. व्ही. सिंधू या बॅडमिंटनपटूने या क्रीडाप्रकारात दोन स्पर्धेत दोन पदके मिळवून भारतापुरता महिलांचा विक्रम नोंदविला आहे. कांस्यपदकाची प्राप्ती करून हॉकीतील 41 वर्षांचा पदकांचा दुष्काळ संपवला. फार पूर्वी भारत सलग सहा सुवर्णपदके मिळविणारा दिग्गज ऑलिम्पिक संघ होता. पण 1980 च्या ऑलिम्पिक नंतर आतापर्यंत एकही पदक हॉकीत मिळविता आले नव्हते. महिला हॉकी संघ कांस्य संघर्षात अपयशी ठरला खरा पण उपांत्य फेरीत धडक देणारा तो भारताचा पहिलाच महिला संघ ठरला. कुस्तीमध्येही कामगिरी चांगल्यापैकी झाली. आपले अन्य काही खेळाडू अंतिम फेरीत पोहचूनही यशस्वी ठरले नसले, तरी त्यांनी भविष्यकाळातील आशा जागती ठेवली आहे. याचाच अर्थ असा की, भारताची क्रीडा प्रतिभा आता हळूहळू जागी होताना दिसते. माध्यान्हीचा तळपता सूर्य दिसायला अद्याप काही काळ जावा लागणार असला तरी, तोही क्षण कधी ना कधी उगवेलच, असा आत्मविश्वास निर्माण होण्याइतके हे यश निश्चितच आश्वासक आहे. मर्यादित पण महत्त्वाच्या या यशामुळे अंगभूत क्रीडाप्रतिभा असणारी सहस्रावधी मुले आणि त्यांचे पालक विविध क्रीडाक्षेत्रांमध्ये ‘करियर’ करण्याचा गांभीर्याने विचार करू लागणार आहेत. हे क्षेत्र सन्मान, समृद्धी आणि समाधान मिळवून देऊ शकते, याची शाश्वती असंख्यांच्या मनात निर्माण करण्याचे कार्य या यशाने निश्चितच केले आहे. तथापि, एवढय़ावरच कृतकृत्य झाल्याचा भाव खेळाडू कधीही त्यांच्या मनात निर्माण होऊ देणार नाहीत. आज पहिल्या 50 देशांमध्ये आलो आहोत, येत्या काही वर्षांमध्ये पहिल्या 5 देशांमध्ये येऊ अशी त्यांची महत्त्वाकांक्षा निश्चितच असेल. भारत सरकारच्या नव्या क्रीडा धोरणाचीही प्रशंसा या प्रसंगी करणे आवश्यक आहे. सरकारने क्रीडापटूंसाठी अत्याधुनिक प्रशिक्षण, आंतरराष्ट्रीय गुणवत्तेची साधनसामग्री आणि आवश्यक ते आर्थिक साहाय्य दिल्याने खेळाडूंचा उत्साह दुणावला आहे, अशी भलावण काही मान्यवर आजी-माजी खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव घेऊन केलेली आहे, ही घटनाही तितकीच महत्त्वाची आहे. आज क्रीडाक्षेत्रातील यश केवळ खेळाडूचे नैसर्गिक कौशल्य आणि परिश्रम एवढय़ावरच अवलंबून नाही. या क्षेत्राचे व्यावसायिकरण झाले आहे. त्यामुळे महागडे प्रशिक्षण, अत्याधुनिक सामग्री हाती बालपणापासून असल्याशिवाय ऑलिम्पिकच्या दारापर्यंत पोहचणेही अशक्य आहे. हा आधार केवळ सरकारसारखी संस्थाच पुरवू शकते. त्यामुळे आपले सरकारही आपले उत्तरदायित्व असेच आणि याहीपेक्षा अधिक पार पाडत राहील, असे निश्चितपणे वाटते. सर्व भारतीय खेळाडूंना भविष्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

Related Stories

पाणिग्रहण मूळमाधवो

Patil_p

पुन्हा समस्यापूर्ती

Patil_p

मंत्रिपदाच्या नाराजीने आ.दीपक केसरकरांचीच कोंडी

Patil_p

काँग्रेसची डुबती नैय्या चिदंबरम सावरणार काय?

Patil_p

कार्लोस घोसानचे पलायन

Patil_p

अभंग श्रीधर सर्वात्मा

Patil_p
error: Content is protected !!