तरुण भारत

दौऱयांचे हिशेब सादर न केलेल्या माजी नगरसेवकांना पुन्हा नोटिसा

पालिकेच्या नोटिसांकडे दुर्लक्ष केल्याने यावेळी पालिका संचालकांकडून कृती

प्रतिनिधी /मडगाव

Advertisements

अजमेर, माऊंट आबू, दिल्ली तसेच अन्य ठिकाणी सेमिनारसाठी दौऱयावर गेलेल्या मागील पालिका मंडळातील नगरसेवकांनी ये-जा करण्यासाठीचे विमान तिकीट व अन्य खर्चासाठी पालिकेकडून घेतलेल्या आगावू पैशांचा हिशेब न दिल्याने काही महिन्यांपूर्वी पालिकेने सदर नगरसेवकांना हिशेब देण्यासाठी नोटीस काढली होती. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने पालिका संचालकांकडून त्यांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे.

माजी नगरसेवक केतन कुडतरकर आणि पाच माजी नगरसेवक जे माऊंट आबू येथे गेले होते त्यांना तसेच माजी नगरसेवक कुडतरकर यांच्यासह अन्य नऊ माजी नगरसेवक जे अजमेर दौऱयावर गेले होते त्यांना आणि दिल्लीला गेलेल्या माजी नगराध्यक्षा डॉ. बबिता आंगले प्रभुदेसाई यांना पालिकेचे मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांनी नोटिसा जारी केल्या होत्या व 15 दिवसांत हिशेब देण्याचे निर्देश दिले होते. सदर नोटिसांकडे दुर्लक्ष केलेल्यांना आता पालिका संचालक कार्यालयातून नोटीस काढण्यात आल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे.

अजमेर-राजस्थान दौऱयासाठी 2 लाख 72 हजार रु., तर माऊंट आबू टूरसाठी 1 लाख 25 हजार रु. आगावू देण्यात आले होते. त्यासंदर्भातील तसेच अन्य काही दौऱयांचे हिशेब माजी नगरसेवकांनी देणे बाकी असल्याचे सांगण्यात येत आहे. मडगाव पालिकेच्या मागील मंडळाने देशभरातील विविध राज्यांमध्ये केलेले सुमारे 11 दौरे वा अधिकृत भेटींवर एकूण 15 लाखांहून अधिक रक्कम खर्च करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे.

शॅडो कौन्सिलने सातत्याने लक्ष वेधले होते : कुतिन्हो

शॅडो कौन्सिल फॉर मडगावने सातत्याने या गोष्टीकडे लक्ष वेधत होते की, पालिकेच्या तिजोरीतून अशा सहलीसाठी काढलेल्या पैशांचा नगरसेवकांनी हिशेब सादर केलेले नाहीत. पालिका निवडणुकीच्या काळातही त्यांनी ही वस्तुस्थिती लपवून ठेवली आणि पालिकेकडून थकबाकीचे प्रमाणपत्र मिळवले, असा दावा निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी केला आहे. मागील मंडळाचा कार्यकाळ संपण्यापूर्वी नगरसेवकांनी बिलांचा हिशेब सादर केलेला नसल्यास तो सादर करण्यास सांगितले होते याकडे त्यांनी लक्ष वेधले. 10 वर्षांपूर्वीचे पालिका मंडळातील एका उदाहरण देताना एका नगरसेविकेला अभ्यास दौऱयासाठी तिच्या नावावर मंजूर झालेली 11000 ची रक्कम परत करण्याचे निर्देश देण्यात आले होते, याकडे कुतिन्हो यांनी लक्ष वेधले. प्रत्यक्षात सदर नगरसेविका या दौऱयावर गेली नव्हती किंवा दौऱयावर जाण्यासाठी तिने इच्छाही व्यक्त केली नव्हती. मात्र तिचे नाव पालिकेच्या मंजुरी आदेशात असल्यामुळेच तिला पैसे द्यावे लागले होते, असे त्यांनी नजरेस आणून दिले आहे.

Related Stories

डॉ. विशाल च्यारी गुढरित्या बेपत्ता कार मुळस-पारोडा येथे सापडली

Omkar B

दाबोळीत मंत्री माविन गुदिन्हो विरूध्द प्रतिस्पधी उमेदवार कोण ?

Amit Kulkarni

पर्यावरणाची हानी करणाऱया प्रकल्पांना विरोधच

Patil_p

आज ठरणार लॉकडाऊन कालावधी

Omkar B

शापोरा नदी पात्रातील पाणी वाढल्याने नदी किनाऱयावरील लोकात घबराट

Omkar B

पेडणे तालुक्याला चक्रीवादळाचा तडाखा

Omkar B
error: Content is protected !!