तरुण भारत

उगे येथे तीन म्हशींची गोळय़ा झाडून हत्या

एक म्हैस जखमी, धनगर समाजातील गरीब व्यक्तीचा आधार हिरावला, गावात संताप

प्रतिनिधी /सांगे

Advertisements

सांगेतील बोंबड-उगे येथे धनगर समाजातील जानू यमकर याच्या चार दुभत्या म्हशींवर अज्ञात इसमाने बंदुकीने गोळय़ा झाडण्याचा प्रकार घडला असून यात तीन म्हशींची हत्या झाली आहे, तर एक म्हैस जखमी झाली आहे. या प्रकारावर गावात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शनिवारी जखमी म्हैस आढळली आणि रविवारी ही संपूर्ण घटना उघडकीस आली. शुक्रवारपासून म्हशी बेपत्ता होत्या. त्यांचा शोध घेताना हा प्रकार दिसून आला. यमकर या धनगर समाजातील गरीब व्यक्तीने आपल्या कुटुंबाचा चारितार्थ चालवण्यासाठी कशीबशी पुंजी गोळा करून या म्हशी घेतल्या होत्या. म्हशींचे दूध विकून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याला पाच लहान मुले आहेत. या प्रकाराने आपला आधारच हिरावून घेतला आहे, असे तो म्हणाला.

या घटनेची कल्पना सांगेचे पोलीस निरीक्षक सचिन पन्हाळकर यांना दिल्यानंतर साहा. उपनिरीक्षक प्रल्हाद मिराशी यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृत म्हशींची छायाचित्रे घेतली व माहिती गोळा केली. पुढील तपास करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. यावेळी पोलिसांना मृत म्हशींवर बंदुकीच्या गोळय़ा झाडल्याचे निशाणही दिसून आले.

गावच्या पंच माया जांगली यांनी म्हशीच्या मालकाला धीर दिला असून या घटनेच्या खोलात पोलिसांनी जाऊन म्हशींवर गोळय़ा झाडणाऱया नराधमाला तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच गरीब जानू यमकर याला सरकारने आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे. प्रत्येक म्हशीपोटी पन्नास हजार याप्रमाणे दोन लाख रुपयांचे त्याला नुकसान झाले आहे.

अशा प्रकारे जनावरांची हत्या करणे हा घोर अपराध असून बोंबड येथील एका फार्ममध्ये त्या मृतावस्थेत आढळून आल्या आहेत. तेथे कोणतेही पीक खराब करण्यासारखे नाही. तेथेच राहणाऱया एका महिलेने रात्रीच्या वेळी बंदुकीच्या गोळय़ांचा आवाज ऐकला होता. म्हशी गतप्राण झाल्याने वासरे एकाकी पडली आहेत. गावचे नागरिक यमा जांगली यांनी या कृत्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. या म्हशींच्या अंगावर बंदुकीने गोळय़ा झाडल्याचे स्पष्टपणे दिसत असून पोलिसांनी हा अपराध करणाऱयास शोधून कडक शासन केले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. जानो यमकर याला नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणात लक्ष घालून पोलिसांना सखोल तपास करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी पंच माया जांगली यांनी केली आहे. त्याचबरोबर समाजाचे नेते व उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर आणि आमदार प्रसाद गावकर यांनी या प्रकरणात लक्ष घालून यमकर याला न्याय देण्याची मागणी केली आहे.

Related Stories

आजपासून 7 दिवस कुडतरी बाजार बंद ठेवण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

Omkar B

हेडगेवारची सलग 14 व्या वर्षी 100 टक्के निकालाची परंपरा

Omkar B

मोरजी सरपंच, उपसरपंच यांचा पंचायत मंडळासह भाजपात प्रवेश

Amit Kulkarni

कोरोनाचे बळी ठरलेल्यांना होते जुने आजार

Omkar B

ऊस उत्पादकांचे धरणे आंदोलन अखेर समाप्त

Omkar B

12 लाखाचे बक्षिस लागल्याचे सांगून ऑनलाईन फसविले

Patil_p
error: Content is protected !!