तरुण भारत

राज्यातील ग्रंथालयांसमोर डिजिटलाईज होण्याचे आव्हान

लॉकडाऊनने दिले नवीन व्यवस्थेचे संकेत: राष्ट्रीय ग्रंथपालन दिन विशेष

प्रतिनिधी /फोंडा

Advertisements

ग्रंथ हे उपयोगासाठी आहेत. प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे आणि प्रत्येक ग्रंथास त्याचा वाचक…! भारतीय ग्रंथालय शास्त्राचे पितामह म्हणून ओळखल्या जाणाऱया डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या पाच सिद्धांतापैकी हे सिद्धांत आहेत. कोरोना महामारीच्या लॉकडाऊमुळे वाचक आणि ग्रंथालयांमध्ये एक मोठे अंतर निर्माण झाले. त्यातून ग्रंथालयांपुढे डिजिटल सेवा व ई पुस्तकांची पर्यायी व्यवस्था उभारण्याचे आव्हान उभे राहिले आहे. गोव्यातील सेंट्रल लायब्ररीसह अन्य सरकारी सार्वजिनक वाचनालयांना या संक्रमण काळाने बदलाचे हे संकेत दिले आहेत.

नवीन बदल स्वीकारावे लागतील

12 ऑगस्ट हा डॉ. रंगनाथन यांचा जयंतीदिन राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय ग्रंथालयांना शास्त्रीय बैठक प्राप्त करुन देणाऱया रंगनाथन यांनी आपल्या शेवटच्या सिद्धांतामध्ये ग्रंथालय ही सतत वाढणारी व विकसित होणारी वर्धिष्णू संस्था आहे. त्यामुळे त्यात सतत बदल आवश्यक असल्याचे सांगितले आहे. शिक्षण व्यवस्थेबरोबरच त्याला पुरक असलेल्या ग्रंथालय व्यवस्थेलाही आता नवीन बदलांचा विचार करावा लागेल.

 डॉ. रंगनाथन यांचे विचार कालातीत असून त्यांच्या सिद्धांतावरच भारतातील ग्रंथालय व्यवस्था उभी आहे. सार्वजनिक ग्रंथालयांची उपयुक्तता सांगताना ती माणसाला आयुष्यभर ज्ञान देतात हा विचार त्यांनी मांडला. ग्रंथालयाचे शास्त्र, व्यवस्थापन, कायदे, यापासून विकसित तंत्रज्ञान व बदलत्या काळाची गरज या सर्व गोष्टी त्यांनी आपल्या पंचसुत्रीत सांगून ठेवल्या आहेत. ग्रंथालयाचे प्रशासन, त्यात सेवक किती असावेत यापासून ग्रंथपालाची भुमिका व त्याचे कर्तव्य इथपर्यंत ग्रंथालयाच्या विकासासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट त्यांनी शास्त्रोक्त अभ्यास करून मांडली आहे.

कोरोना काळात 60 टक्के वाचकांचा संपर्क तुटला

गोव्यासारख्या छोटय़ा राज्याला सार्वजनिक ग्रंथालयांची खूप जुनी परंपरा आहे. मात्र इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यात ग्रंथालय कायदा खूप उशिरा म्हणजे 1995 साली अस्तित्वात आला. पणजी येथील मध्य ग्रंथालय म्हणजेच सेंट्रल लायब्ररी सन् 1832 साली सुरु झाली. आशिया खंडातील ते सर्वांत जुने ग्रंथालय आहे. सध्या कृष्णदास श्यामा मध्य ग्रंथालय असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. अंत्यत सुसज्ज अशा या ग्रंथालयात 3 लाख 80 हजार ग्रंथसंग्रह आहे. कोरोनापूर्व काळात याठिकाणी दिवसाकाठी हजारहून अधिक वाचक भेट द्यायचे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर 60 टक्के वाचकांची संख्या घटली आहे. लॉकडाऊनच्या काळात वाचकांपर्यंत पोचण्यासाठी डिजिटल व ई माध्यमांचा वापर करावा लागला. मात्र त्यात विद्यार्थी व संदर्भ सूचिंसाठी येणारे लोकच अधिक होते. सेंट्रल लायब्ररीची सदस्यसंख्या साधारण 30 हजार ऐवढी असून या ग्रंथालयाच्या थेट संपर्कात असणारा एक मोठा वाचकवर्ग अजूनही दूर राहिला आहे.

गांव तेथे वाचनालय…

राज्यात सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या तशी मोठी आहे. पणजीच्या मध्य ग्रंथालयाबरोबरच मडगाव येथे सन 2010 साली सुरु झालेले डॉ. फ्रान्सिस्को लुईस गोम्स जिल्हा वाचनालय आहे. याठिकाणी साधारण दहा हजार वाचक सदस्य आहेत. फोंडा, कुडचडे, सांगे, काणकोण, पेडणे, डिचोली व वाळपई याठिकाणी सात तालुका सरकारी ग्रंथालये, केपे, कुंकळ्ळी व साखळी येथे नगर वाचनालये आहेत. गावडोंगरी काणकोण, बाळ्ळी व तिळामळ येथे ग्रामीण वाचनालये आहेत. याशिवाय ग्रामीण भागातील साधारण दिडशे बिगर सरकारी ग्रामीण व अन्य वाचनालये सरकारी वाचनालयाशी जोडली गेली आहेत. मडगाव येथील गोमंत विद्या निकेतनचे ग्रंथालय हे गोव्यातील एक उत्कृष्ट व सर्वात जुने ग्रंथालय आहे. मळा पणजी येथील महालक्ष्मी वाचनालय व पणजी येथील सरस्वती वाचनालय यांनाही खूप जुनी परंपरा आहे. याशिवाय नगरपालिकांची स्वतंत्र वाचनालयेही आहेत.

ई पुस्तकांची वाढती गरज

या सर्व ग्रंथालयांनी गोव्यातील वाचक संस्कृती घडवली. गोव्यात इंग्रजीबरोबरच मराठी, हिंदी व कोकणी भाषेतील वाचकवर्ग मोठा आहे. माहिती तंत्रज्ञानाने माणसाच्या दैनंदिन जीवनात प्रवेश केल्यानंतर वाचनाचे माध्यमही बदलू लागले आहे. त्यामुळे गोव्यातील ग्रंथालयांपुढेही आता डिजिटलाईज होण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोना महामारीच्या काळात गंथालयासमोर ही पर्यायी व्यवस्थेची गरज निर्माण झाली आहे. राज्यातील बहुतेक सरकारी ग्रंथालयामध्ये पुस्तक सूची ऑनलाईन उपलब्ध झाली तरी, वाचकांच्या मागणीनुसार त्याच्या हातात पुस्तक उपलब्ध करून देण्याची ई व्यवस्था किती गरजेची आहे, याची जाणिव या संक्रमण काळाने करुन दिली. लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थी व अन्य वाचकांना ई माध्यमातून आवश्यक संदर्भ व अभ्यासाचे साहित्य उपलब्ध करून दिले. काही प्रमाणात ई पुस्तकेही उपलब्ध केली. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर वाचनांना ग्रंथालयात थेट प्रवेश न देता नोंदणी कक्षात त्यांच्या मागणीनुसार पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. मात्र एक मोठा वाचक वर्ग ग्रंथालयाच्या सेवेपासून दूर राहिला. फोंडा येथील शारदा ग्रंथप्रसारकने बुक बास्केट ही शहरापुरती मर्यादित घरपोच पुस्तक सेवेचा प्रयोग केला. पण असे प्रयोग इतर वाचनालयांत झाले नाहीत.

ग्रामीण ग्रंथालये तंत्रविकसित करावी लागतील

मडगाव येथील जिल्हा ग्रंथालयाचे ग्रंथपाल मोहनदास नाईक यांच्या म्हणण्यानुसार गोव्यातील ग्रंथालयांना उत्कृष्ट मॉडेल म्हणून पुढे येण्यास वाव आहे. त्यासाठी शहरी भागातील वाचकांना व विद्यार्थ्यांना ज्या सुविधा मिळतात, त्या सर्व ग्रामीण वाचनालयामध्येही उपलब्ध झाल्या पाहिजे. डिजिटल व ई तंत्रज्ञान विकसित करतानाच व्हायफायसारख्या सुविधा ग्रामीण वाचनालयामध्ये उपलब्ध करण्याची गरज आहे. ज्यामुळे ग्रामीण विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी ग्रंथालयांकडे येईल. लॉकडाऊनच्या काळात जिल्हा ग्रंथालयात वाचकांना डिजिटल साईट, वॉटस्ऍप आदी माध्यमातून संदर्भ उपलब्ध करून देण्यात आले. याशिवाय नॅशनल डिजिटल लायब्ररीच्या माध्यमातून साईटवर उपलब्ध असलेली मोफत पुस्तकेही वाचकांना पुरविण्यात आली. मात्र ज्येष्ठ नागरिकांना सेवा पुरवू शकलो नाही याची खंत वाटते.

मध्य ग्रंथालयात ई बुक दालन हवे

सेंट्रल लायब्ररीचे माजी मुख्य ग्रंथपाल डॉ. कार्लुस फर्नांडिस हे सध्या गोवा विद्यापिठात आहेत. मात्र लॉकडाऊनच्या काळात साधारण वर्षभर त्यांनी ही परिस्थिती हाताळली. लॉकडाऊनच्या काळात वाचक व ग्रंथालयामध्ये अंतर निर्माण झाल्याचे सांगितले. सेंट्रल लायब्ररीमध्ये त्या काळात चांगल्या पद्धतीने नेटवर्क विकसित करतानाच ई बुक सेवा व इतर ऑनलाईन सेवावर भर द्यावा लागला. नॅशनल डिजीटल लायब्ररीचे दालन वाचकांना खुले केले. पण यापुढे सेंट्रल लायब्ररीला स्वतःचे स्वतंत्र ई बुक दालन तयार करावे लागेल. वाचकांच्या आवडीनिवडी वेगवेगळय़ा असून यापुढे त्यानुसार डिजिटल ग्रंथालये पर्यायी सोय म्हणून अधिक सक्षम करावी लागतील. शहरी ग्रंथलयांना ग्रामीण ग्रंथालयाशी जोडून प्रत्येक वाचकाची गरज भागवावी लागेल.

पारंपकेला जोडून नव्याची सांगड घालावी लागणार

सेंट्रल लायब्ररीच्या प्रभारी ग्रंथपाल सुलक्षा कुळमुळे यांनीही लॉकडाऊनच्या काळात ग्रंथालयासमोर निर्माण झालेले प्रश्न व येणाऱया आव्हांना तोंड देण्यासाठी आत्तापासूनच तयारी करावी लागणार असल्याचे सांगितले. पणजीचे ग्रंथालय सर्व सुविधांनी सुसज्ज असले तरी येणाऱया काळात डिजिटल माध्यमावर भर देऊन इ &बूक दालन हे अधिक परिपूर्ण बनविण्याची गरज व्यक्त केली आहे. वॉटस्ऍप लिंकवर कुठलेही पुस्तक वाचकाला डाऊनलोड करता येईल अशा सुविधा निर्माण करावी लागेल. अर्थात पारंपरिक वाचन पद्धती जोपासतानाच नव्याची कास धरावी लागेल.

Related Stories

विधानसभा अधिवेशन 18, 19 ऑक्टोबर रोजी

Amit Kulkarni

विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविणार

Amit Kulkarni

…..अन् पोलिसांनी केला भर रस्त्यावरच वाढदिवस

Omkar B

काँग्रेस महिला मोर्चाकडून डीजीपीना निवेदन

Patil_p

घरासमोर ठेवलेल्या दोन वाहनांना आग, 17 लाखांचे नुकसान

Omkar B

सुमूलने दूध संकलन दर कमी केल्याने दुग्ध उत्पादक अडचणीत

Patil_p
error: Content is protected !!