तरुण भारत

पिरनवाडीतील कचऱयाची समस्या बनली गंभीर

ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष : नागरिकांना करावा लागतोय दुर्गंधीशी सामना : कचऱयाची विल्हेवाट लावण्यासाठी उपाययोजनांची गरज

वार्ताहर /किणये

Advertisements

पिरनवाडी येथील कचरा समस्या गंभीर बनली आहे. पिरनवाडी नाला, बेळगाव-पणजी महामार्गावरील भाजी मार्केटच्या बाजूला, तसेच हुंचेनहट्टी रोड येथील जैन कॉलेजच्या बाजूला कचऱयाचे मोठमोठे ढिगारे दिसून येत आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात दुर्गंधी पसरली असून यामुळे स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासन व ग्राम पंचायतीचे याकडे साफ दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत आहेत.

पिरनवाडी गावचा विस्तार झपाटय़ाने वाढतो आहे. पिरनवाडी हे अनेक गावांसाठी पेंद्रबिंदू बनले आहे. यामुळे येथील बाजारपेठेतही गर्दी वाढू लागली आहे. पिरनवाडी ग्रा. पं. ला नगरपंचायतीचा दर्जाही प्राप्त झाला आहे. यामुळे पिरनवाडी ग्रा. पं. ची निवडणूकही सध्या झालेली नाही. गाव विकसित होत आहे. मात्र, गावात कचऱयाची समस्या जटिल बनू लागली आहे.

बेळगाव-चोर्ला रस्त्याजवळील नाल्याजवळ भला मोठा कचऱयाचा ढिगारा साचला आहे. दुर्गंधीमुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱयांना नकोसे झाले आहे.

गेल्या पाच-सहा वर्षांपासून कचऱयाची समस्या भेडसावत आहे. टाकलेल्या कचऱयाची उचल होत नाही. काही जण मृत कुत्रीही आणून टाकत आहेत. यामुळे सदर कचऱयाच्या ठिकाणाहून ये-जा करणे साऱयांनाच अवघड बनले आहे.

प्रशासनामार्फत ‘स्वच्छ भारत अभियान योजना’ राबविण्यात येते. मात्र, ही योजना पिरनवाडी गावात लागू नाही का? असा सवाल काही स्थानिक नागरिक करीत आहेत. कारण कचऱयाची योग्य प्रकारे उचल होत नाही. ग्रा. पं. चे अधिकारी इतके सुस्त का आहेत? असे सवाल उपस्थित होऊ लागले आहेत.

पावसाळय़ाच्या दिवसात विविध साथीचे आजार डोके वर काढू लागले आहेत. हलगा, येळ्ळूर आदींसह इतर गावांमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. पिरनवाडी, मच्छे गावांमध्येही गेल्या वर्षी डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. स्वच्छतेअभावी डासांची उत्पत्ती वाढते व डेंग्यूसारख्या महाभयंकर रोगाचा सामना करावा लागतो. कारण उद्यमबाग औद्योगिक वसाहत, मच्छे औद्योगिक वसाहत, विविध कॉलेज, शाळा, कार्यालये या गावच्या अगदी जवळ आहेत. त्यामुळे बाहेरगावचे कामानिमित्त येणारे लोक या ठिकाणी स्थायिक होऊ लागले आहेत.

सध्या पिरनवाडीमध्ये किराणा दुकाने, खाद्यपदार्थ, भाजी, कपडे आदींसह विविध प्रकारची दुकाने मोठय़ा प्रमाणात वाढली आहेत. या दुकानांमधील प्लास्टिक टाकावू केरकचरा आणून टाकण्यात येत आहे.

चिकन व मटण दुकानांमधील टाकाऊ पदार्थ काही जण टाकत आहेत. खाण्यासाठी भटक्या कुत्र्यांचा वावरही वाढला आहे. ती रस्त्यावरून कधीही आडवी फिरतात. यामुळे अनेक अपघातही घडलेले आहेत, अशी माहिती स्थानिकांनी दिली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडेझुडुपे वाढल्यामुळे समोरून येणाऱया वाहनांचा अंदाज येत नाही. सदर झुडुपांची साफसफाई करण्याची मागणीही होत आहे.

अन्य समस्यांकडेही दुर्लक्ष : किरण आपटेकर

कचऱयासह गावातील अन्य प्रकारच्या समस्या सोडविण्याकडे ग्रा. पं. चे साफ दुर्लक्ष झाले आहे. ग्रा. पं. मध्ये येणारे नोडल अधिकारी व पीडीओ यांनी अशा मूलभूत समस्यांकडे जातीने लक्ष दिले पाहिजे, पण तसे होत नाही. आता आम्ही दाद मागायची कुणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दुर्गंधीमुळे नजीकच्या शेतकऱयांना शेती करणे अवघड बनले आहे.

ग्रा. पं. ने तोडगा काढावा : सुनील धामणेकर

कचऱयाच्या ढिगाऱयांमुळे तेथून कोणालाही ये-जा करणे मुश्कील बनलेले आहे. बेळगाव स्मार्ट सिटी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मग बेळगाव शहरालगतच्या उपनगरांकडे लक्ष कोण देणार? येथील समस्यांमुळे आम्ही सारेजण अक्षरशः वैतागलो आहे. ग्रा. पं. ने स्थानिकांना घेऊन याबाबत चर्चा करून तोडगा काढावा.

कचराकुंडी ठेवण्याची गरज

नागेश शहापूरकर पिरनवाडीतील कचऱयामुळे गावचे सौंदर्य धोक्यात आले आहे. कचऱयाची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य नियोजनाची गरज आहे. आवश्यक असणाऱया गल्ल्यांच्या चौकांमध्ये कचराकुंडी ठेवण्याची गरज आहे. सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने नागरिकांनाही कचराकुंडीव्यतिरिक्त कोठेही कचरा फेकू नये. पर्यावरण खात्याच्या अधिकाऱयांनी परिसराची पाहणी करणे गरजेचे आहे. 

Related Stories

जीवनात यशस्वी होण्यासाठी क्रीडा आवश्यक

Patil_p

टीईटी 4 ऑक्टोबर रोजी होणार

Patil_p

भाषिक तणावाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर-निपाणी बससेवा बंद

Abhijeet Shinde

कणकुंबीजवळ गोवा बनावटीची दारू जप्त

Patil_p

प्रियांका अक्कोळे हिचा सत्कार

Patil_p

…अन्यथा सेवा स्थगित करू

Amit Kulkarni
error: Content is protected !!