तरुण भारत

भारत-पाकिस्तान 24 ऑक्टोबरला आमनेसामने

आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेची रुपरेषा जाहीर, पात्रता फेरीचे सामने 17 ऑक्टोबरपासून, 14 नोव्हेंबर रोजी होणार जेतेपदाचा फैसला

वृत्तसंस्था /दुबई

Advertisements

आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताची सलामीची लढत पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध रंगणार आहे. दि. 24 ऑक्टोबर रोजी हे दोन्ही संघ आमनेसामने भिडतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने मंगळवारी या स्पर्धेची रुपरेषा जाहीर केली.

आयसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, सलामी लढतीनंतर भारताचा दुसरा प्रतिस्पर्धी न्यूझीलंड असेल. दि. 31 ऑक्टोबर रोजी हा सामना होईल. त्यानंतर दि. 3 नोव्हेंबर रोजी अबु धाबी येथे अफगाणिस्तानविरुद्ध साखळी सामना रंगेल.

सुपर 12 फेरीतील भारताचे आणखी 2 सामने अनुक्रमे दि. 5 व 8 नोव्हेंबर रोजी होणार आहेत. दि. 5 रोजी ब गटातील अव्वल संघाविरुद्ध तर दि. 8 रोजी अ गटातील दुसऱया क्रमांकाच्या संघाविरुद्ध भारत खेळणार आहे.

तत्पूर्वी, स्पर्धेतील पहिल्या फेरीतील सामने दि. 17 ऑक्टोबरपासून होतील. त्यात यजमान ओमानचा संघ पापुआ न्यू गिनियाविरुद्ध (पीएनजी) लढेल तर आणखी एका लढतीत बांगलादेश-स्कॉटलंड संघ आमनेसामने भिडतील. प्रत्यक्ष स्पर्धेतील पहिली लढत दि. 23 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया-द. आफ्रिका यांच्यात होणार आहे.

पहिले दोन संघ पात्र ठरणार

अ गटात 2014 चॅम्पियन्स श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, नामिबिया तर ब गटात बांगलादेश, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनिया व ओमान यांचा समावेश आहे. सुपर 12 फेरीकरिता दोन्ही गटातील पहिले दोन अव्वल संघ पात्र ठरतील. सुपर 12 फेरीत देखील 2 गट असतील. ही फेरी दि. 23 ऑक्टोबरपासून खेळवली जाणार आहे. यात ऑस्ट्रेलिया-द. आफ्रिका यांच्यात अबु धाबी येथे सलामीचा सामना होईल. याच दिवशी इंग्लंडचा संघ विद्यमान विजेते व दोनवेळचे चॅम्पियन्स विंडीजविरुद्ध खेळणार आहे.

या स्पर्धेतील पहिली सेमी-फायनल दि. 10 नोव्हेंबर रोजी अबु धाबी तर तर दुसरी सेमी फायनल दि. 11 नोव्हेंबर रोजी दुबई येथे होईल. त्यानंतर दि. 14 नोव्हेंबर रोजी स्पर्धेतील जेतेपदाचा फैसला होणार आहे. दि. 15 नोव्हेंबर हा फायनलसाठी राखीव दिवस असेल.

ही यंदाची आयसीसी टी-20 स्पर्धा भारताच्या वतीने संयुक्त अरब अमिरात व ओमानमध्ये खेळवली जाणार आहे. कोव्हिड-19 च्या तिसऱया लाटेचा इशारा असल्याने हा बदल केला गेला.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने टी-20 विश्वचषक मोहिमेची विजयी सुरुवात करणे, हे आपले लक्ष्य असेल, असे याप्रसंगी नमूद केले. ‘आम्ही मागील दशकभरापासून सातत्याने संयुक्त अरब अमिरातच्या भूमीत खेळत आलो आहोत. त्यामुळे, आमच्यासाठी ही घरच्या मैदानातील स्पर्धा आहे. आयसीसी टी-20 मानांकन यादीत अव्वलस्थानी झेपावताना आम्ही युएईमध्येच अनेक दिग्गज संघांना यापूर्वी चीत केले आहे. वैयक्तिक स्तरावर विचार करता, पाकिस्तानचा कर्णधार या नात्याने माझ्यासाठी ही आयसीसीची पहिलीच महत्त्वाची स्पर्धा असेल’, असे आझम पुढे म्हणाला.

इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने ही स्पर्धा नेहमीपेक्षा अधिक चुरशीची असेल, असे यावेळी सांगितले. जागतिक स्तरावर टी-20 क्रिकेटचा दर्जा उंचावत राहिला आहे आणि आता जवळपास प्रत्येक संघाला जेतेपदाची संधी असेल, असे तो म्हणाला.

जेतेपद कायम राखण्याचा विंडीजचा प्रयत्न

वेस्ट इंडीजचा कर्णधार केरॉन पोलार्डने 2016 मधील जेतेपद कायम राखण्याची महत्त्वाकांक्षा यावेळी नमूद केली. 5 वर्षांपूर्वी ईडन गार्डन्सवर रंगलेल्या अंतिम लढतीत विंडीजने बलाढय़ इंग्लिश संघाला धूळ चारत जेतेपदावर आपले नाव कोरले होते. कार्लोस ब्रेथवेटने शेवटच्या षटकात सलग 4 षटकार खेचत त्यावेळी विंडीजला सनसनाटी विजय संपादन करुन दिला होता.

पात्रता फेरीतील गटनिहाय संघ

  • ए ग्रूप :  श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, नामिबिया
  • बी ग्रूप :  बांगलादेश, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनिया, ओमान

सुपर-12 फेरीतील संघ

  • ए ग्रूप : इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका, विंडीज, ए-1, बी-2
  • बी ग्रूप : भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाण, बी-2, ए-1.

Related Stories

ऑलिम्पिक स्पर्धा पुढील वर्षी 23 जुलैपासून

tarunbharat

टोकियो ऑलिंपिक स्पर्धेतील पाच ‘स्टार’ खेळाडूंना साईकडून बढती

Patil_p

लि निंग कराराबाबत फेरविचार

Patil_p

नीरज चोप्राला चेन्नई सुपरकिंग्सतर्फे 1 कोटींचे इनाम

Patil_p

चार दिवसांच्या कसोटीवर मार्चमध्ये चर्चा

Patil_p

अंकिता रैना प्रमुख ड्रॉमध्ये खेळणार

Patil_p
error: Content is protected !!