तरुण भारत

श्रावणरंग

फुलाफळांनी नटलेल्या सृष्टीच्या रंगांच्या सोहळय़ाचं कौतुक कोणत्याही प्रदेशात होतंच. कडाक्मयाची थंडी आणि सततची बर्फवृष्टी याने विटून गेलेल्या युरोपीय देशांमध्ये वसंतऋतूचं खरंखुरं प्रेम पहायला मिळतं. आनंद उधळणाऱया कित्येक कविता जन्माला येतात त्या sज्rग्हु sाasदह ला साक्षी ठेवूनच! पण आपल्या भारतात जर का रंगांचा गंधांचा खराखुरा महोत्सव पहायचा असेल तर तो श्रावणातच पहायला मिळतो. पावसाचा भयानक जोर थोडा ओसरलेला असतो. ऊन पावसाची कथा आकार घेत असते. रुजवणाची प्रक्रिया पूर्ण होऊन धरतीच्या बहरण्याचा उत्सव साजरा होत असतो. आखाजीला (अक्षयतृतीया) केलेली आळी श्रावणात फळांवर येऊ लागतात. माळावर लाखेंच्या संख्येने फुललेली हरणाची, तुंब्याची फुलं डोळय़ांनाच काय पण पावलांनाही मखमली स्पर्शाची भाषा शिकवायला लागतात. साऱया वर्षांतील सत्त्व या महिन्यात जणु एकवटलेलं असतं. आणि मग बोरकर गाऊ लागतात,

समुद्र बिलोरी ऐना

Advertisements

सृष्टीला पाचवा म्हैना

खरोखरच एखाद्या गर्भवतीच्या पाचव्या महिन्यात तिचं सोज्ज्वळ सौंदर्य कसं प्रसन्न दिसत असेल ते डोळय़ांसमोर उभं राहतं. अभिषेकी बुवांनी ऐकणाऱयांच्या रंध्रांत पेरलेली आषाढदर्द गाणी एव्हाना रुजून फुलवलेली असतात. भराभर परिपक्वतेकडे चाललेल्या नवकिशोर पिकांचे धुंद गंध, रानफुले रानफळं आणि रानभाज्यांचा न्यारा थाट, आणि दररोज एकेका देवाची मनोभावे करायची आराधना यात श्रावण म्हणजे मनात पेरलेला सूर होऊन जातो. अशात जर कुणी बालिका नवयौवनास प्राप्त झाली असेल तर मग काय विचारावं?

 एकलीच मी उभी अंगणी

उगिच कुणाला आणित स्मरणी

 चार दिशांनी जमल्या तोवर

गगनी घनमाला

श्रावण आला गं वनी श्रावण आला.

अशी बिचारीची अवस्था झालेली असते. त्यातून सावरते की काय ती नुकत्याच सुरू झालेल्या कथाकीर्तनात मन रमवण्याचा प्रयत्न करते तर तिथेही

मनभावन हा श्रावण

प्रियसाजण हा श्रावण

भिजवी तन भिजवी मन श्रावण

थरथरत्या अधरावर प्रणयी संकेत नवा

ऋतु हिरवा ऋतु बरवा….. या ओळी संतूरच्या रिमझिम नादात आणि आशाताईंच्या मधुमादक आवाजात नुसता छळ करतात. हे म्हणजे अगदी पाठलाग आरंभल्यासारखंच नाही का? आणि लग्नकार्य झालेल्या आणि पंचमीला माहेरवासासाठी आलेल्या, सुखाने ओसंडून वाहणाऱया विवाहितांना काय कळावी या अनिश्चिततेमागची, अस्वस्थतेमागची तगमग? फार तर ती तगमग एखादीलाच कळेल कारण तिचीही अवस्था

श्रावणाच्या शिरव्यांनी आनंदली धराराणी

माझे पण प्राणनाथ घरी नाही आले

आरशात माझी मला पाहू बाई किती वेळा

वळचणीची पाल काही भलेबुरे बोले…

अशीच असते. दोघींच्या तळमळीत फरक असतो. एक प्रेम दिवानी आणि एक दरस दिवानी असते पण श्रावण दोघींनाही जाळत असतो‌ हे मात्र नक्की.

येणाऱया गणपतीच्या सणाची हलकी हलकी चाहूल श्रावणातच मिळायला लागते. तबले, मृदुंग, पखवाज दुरुस्ती सुरू असते. अडगळीतले झांजा, टाळ श्रावणातच बाहेर आलेले‌ असतात. ग्रंथपारायणं, भजनं यांनी वाडय़ा वस्त्या सुरेल होत असतात. ढोलांच्या पॅक्टिसची घनगर्जना झाडावरच्या पक्ष्यांना हादरवून सोडत असते. आणि श्रावण पौर्णिमा येते. हा महिना प्रत्येक जातीजमातीसाठी त्यांच्या त्यांच्या जीवनमानाप्रमाणे सण घेऊन येतो. तसाच दर्यावरच्या कोळी समाजासाठी तो जीवन घेऊन येतो. गेले दोन ते तीन महिने समुद्रात मासेमारी करायला बंदी असते. आणि नारळी पौर्णिमेला सागराला नारळ अर्पण करून नवे मत्स्य संवत्सर सुरू केले जाते. त्यावेळचा त्यांचा आनंद काय वर्णावा?

सन आयलाय गो आयलाय गो नारलीपुनवेचा

मनी आनंद माईना कोल्यांच्या दुनयेचा

किंवा

नारलीपुनवेला नारल सोन्याचा

सगले मिलुन मान द्येतांव दर्याचा

अशी गाणी म्हणत फेर धरून नाचतात ते. साहजिकच आहे की हा त्यांचा सर्वात मोठा सण असतो. त्यांचं जीवनच या दर्यावर अवलंबून असतं. त्यामुळे सोनंनाणं, झगमगाट, पक्वान्नांची लयलूट आणि नाचगाण्यांची बहार! अशी साजरी होते त्यांची श्रावण पौर्णिमा!

श्रावण म्हणजे विविधांगी आनंदरूपक. आणि ‘हिरवळ आणिक पाणी तेथे सुचती मजला गाणी’ असं कवींनी म्हटल्याप्रमाणे जिथे आनंदाची अभिव्यक्ती तिथे गाण्याचे सूर हे असतातच. कधी ते खास श्रावणाची गाणी म्हणत येतात. वेगवेगळय़ा कवितांमधून येतात.

बांगडय़ा बघा या

श्रावण लावण्यराज लागला फुलाया

 मधून हे सूर वाहतात.

झिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात

प्रियाविण उदास वाटे रात

म्हणणाऱया विरहिणीच्या उदासीमध्येही हे सूर दिसतात. रुद्राच्या अनु÷ानाच्या जयघोषातही यातलेच सूर नेमस्त होऊन निनादतात. कोळीगीतातून येतात. ओव्या अभंगातून येतात. श्रावण लहरत राहतो. श्रावण बहरत राहतो. आणि

श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा

उलगडला झाडातून अवचित हिरवा मोरपिसारा

असं गाणारी पाडगांवकरांची कविता गुंजत रहावी तसाच अगदी!

– अपर्णा प्रभु-परांजपे

Related Stories

भाषेच्या अंगाखांद्यांवर

Patil_p

कौटुंबिक हिंसाचाराचा व्हायरस

Patil_p

ऑनलाईन सेफ्टी : शाळा व शिक्षक-विद्यार्थी

Patil_p

श्रीमद् भागवतमधील शिवशंकर

Patil_p

संकटकाळ आणि जागतिक साहित्य

Patil_p

कोरोनाचे थैमान, वादळाचे तांडव

Patil_p
error: Content is protected !!