तरुण भारत

येत्या पाच वर्षांत सांगेवासियांच्या सर्व समस्या सुटतील

सांगे दौऱयात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आश्वासन

प्रतिनिधी/ सांगे

Advertisements

नेत्रावळी असो किंवा उर्वरित सांगे मतदारसंघ असो, या भागाचा विकास केवळ भाजप सरकारने केला आहे. सांगे हा आदिवासी लोकांचा जास्त भरणा असलेला मतदारसंघ असल्याने वननिवासी दावे निकालात काढणे यासह आदिवासांचा विकास व कल्याणासाठी आपले सरकार कार्य करत आहे. त्यासाठी सांगे पालिका क्षेत्रात ‘आदिवासी संशोधन केंद्रा’ची उभारणी करण्यात येणार आहे. सांगेवासीय आपल्या ह्रदयात असून सांगेतील विकासाचे प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावले जातील. पुढील पाच वर्षांत सांगेवासियांची एकही समस्या सुटल्याशिवाय राहणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नेत्रावळी-बांदवाडा, सांगे येथे बोलताना दिली.

मुख्यमंत्री सावंत हे शनिवारी सांगे मतदारसंघाच्या दौऱयावर आले होते. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या दूरदृष्टीतून ग्रामीण भागांच्या विकासासाठी अटल ग्राम योजना उदयास आली. गोवा मुक्तीची साठ वर्षे साजरी करत असताना कोणीही मूलभूत सुविधांपासून वंचित राहता कामा नये. पूर्वी दिवसाला वनहक्क दाव्याचे एक प्रकरण निकाली निघत होते. आता आठ ते दहा प्रकरणे हातावेगळी होतात. खासगी सर्व्हेअरची नेमणूक केली आहे. लोकांना पिण्याचे पाणी, शौचालय मिळण्याची गरज आहे. गोवा दूध, भाजी, फुले, मासळी आदींबाबत स्वयंपूर्ण होण्याची गरज आहे. त्यांदृष्टीने सरकार आपले कार्य करत आहे. शनिवारी स्वयंपूर्ण मित्र पंचायत कार्यालयांत जाऊन जनतेशी संवाद साधतात. त्याचा उत्तम परिणाम दिसून आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आदिवासी संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी अंजली पुराणिक या काम करत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यावेळी सुरुवातीच्या काळात अटल ग्राम योजनेसाठी माजी आमदार सुभाष फळदेसाई, माजी सरपंच शशिकांत गावकर व प्रसाद तिळवे यांनी केलेल्या कार्याची त्यांनी आठवण करून दिली व प्रशंसा केली. सांगेचा विकास निधीच्या अभावी मागे पडणार नाही असे सांगून त्यांनी अटल ग्राम यंत्रणेच्या कार्याचे कौतुक केले.

आमदारांनी मांडली कामांची यादी

सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांनी मुख्यमंत्र्यांसमोर विकासकामांची जंत्री ठेवली व  ती कामे मार्गी लावण्याची मागणी केली. बॉटनिकल गार्डनमध्ये 60 कोटींचा प्रकल्प तयार असल्याचे त्यांनी सांगितले. नेत्रावळी अभयारण्य क्षेत्रातील लोकांच्या जमिनी बाहेर काढण्याचा प्रश्न, वनहक्क दावे, साळावली धरणग्रस्तांच्या जमिनीचा दर्जा दोनवरून एक करणे इत्यादी समस्या सोडविण्याच्या प्रक्रियेला गती देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आपण सरकारात जरी नसलो, तरी जनतेची कामे घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जाणे हे आपले कर्तव्य आहे आणि सरकारने ती कामे करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

अटल ग्राम यंत्रणेचे अध्यक्ष सुभाष वेळीप यांनी स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर आमदार गावकर, माजी आमदार वासुदेव गावकर, सुभाष फळदेसाई, रिवण जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर, सदस्य नवनाथ नाईक, सतीश गावकर, सरपंच अर्चना गावकर, अटल ग्रामविकास एजन्सी, गोवा या संस्थेचे प्रकल्प संचालक व सदस्य सचिव विजय सक्सेना इत्यादी हजर होते.

विविध कामांचा प्रारंभ

अटल ग्रामविकास एजन्सीतर्फे नव्यानेच मार्गवाडा येथे बांधण्यात आलेल्या अंगणवाडी केंद्राला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. तसेच गवळीवाडा येथील अवर लेडी ऑफ पिलार कपेल येथे सुशोभिकरण प्रकल्पाचे भूमिपूजन केले. त्यानंतर बांदवाडा येथे अंगणवाडी प्रकल्पाचे भूमिपूजन केले. तसेच मार्गवाडा, नेत्रावळी येथील अंगणवाडीतील मुलांना शैक्षणिक साहित्य व खेळण्यांचे वाटप करण्यात आले. याचवेळी नेत्रावळी पंचायत कार्यालयाला संगणक व संबंधित साहित्य तसेच नेत्रावळी ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी शाळांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वॉटर प्युरिफायर्स प्रदान करण्यात आले. सक्सेना यांनी आभार मानले. यानंतर मुख्यमंत्री सावंत यांनी स्वयंपूर्ण मित्र, विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, पंच यांची बैठक घेऊन आढावा घेतला. तसेच विविध घटकांशी संवाद साधला. वाडे येथील पॉवरलूम सेंटरलाही मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. तसेच भाजप बूथ कार्यकर्त्यांच्या बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

Related Stories

स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना टिकून राहण्यासाठी शिक्षण महत्वाचे

Patil_p

संजीवनीच्या कंत्राटी कामगारांची धरणे

Patil_p

सरकारी कर्मचाऱयांसाठी कामकाज सूचना जारी

tarunbharat

गणादीप शेल्डेकर यांना पितृशोक

Amit Kulkarni

अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी हरमल येथे दोघांना अटक

Patil_p

कर्नाटकातील कोरोना उद्रेकाचा परिणाम मुरगाव बंदरावर

Patil_p
error: Content is protected !!