तरुण भारत

कल्याणसिंह काळाआड

नव्वदच्या दशकात ‘मंदिर वही बनायेंगे’ अशा दुमदुमणाऱया घोषणांचे आणि रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाचे नेतृत्व करणारे एक नेते उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व राजस्थानचे एकेकाळचे राज्यपाल कल्याणसिंग यांचे शुक्रवारी निधन झाले आणि दीर्घकाळ राजकारण, समाजकारण, आंदोलन करणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व विसावले. तसे गेली काही वर्षे ते सक्रीय नव्हते आणि त्यांना रक्तदाब व किडनीचा विकार होता. गेले दोन महिने तर ते रुग्णालयात दाखल होते. शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मावळली आणि रामजन्मभूमी आंदोलनाचा एक बिनीचा शिलेदार काळाआड गेला. अयोध्येत राममंदिराची भव्य-दिव्य व वेगाने उभारणी सुरू असताना कल्याणसिंह यांचे निधन मनाला रुखरुख लावणारे आहे. राममंदिराचा उद्घाटन सोहळा त्यांनी पाहिला असता तर बरे झाले असते असे अनेकांना वाटल्यावाचून राहिले नसेल. रामजन्मभूमी मुक्ती आंदोलन, कारसेवा, रथयात्रा या भाजपाच्या सर्व उपक्रमात कल्याणसिंह यांचा सिंहाचा वाटा होता. कार सेवा व 6 डिसेंबर रोजी उद्ध्वस्त झालेला वादग्रस्त ढाचा, देशभर उमटलेल्या प्रतिक्रिया, सुरू झालेल्या दंगली या सर्वांच्या टीका-टिप्पणीला तोंड देत कल्याणसिंह यांनी तो काळ गाजवला होता. कल्याणसिंह हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ व भाजपाच्या मुशीत तयार झालेले नेते होते. काही वेळा त्यांचा भाजपात वाद झाला. अटलजांसोबत त्यांनी वाद घालून भाजपाचा त्याग केला होता. पण पुन्हा त्यांची घरवापसी झाली आणि भाजपा आणि हिंदुत्व यांचे प्रतिनिधी म्हणूनच त्यांनी अखेरपर्यंत काम केले. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत वादग्रस्त ढाच्या कारसेवकांनी उद्ध्वस्त केला. तेव्हा कारसेवकांवर गोळीबार करण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला होता. न्यायालयाला त्यांनी प्रतिज्ञापत्र दिले होते. त्यावेळी शंकरराव चव्हाण केंद्रीय गृहमंत्री होते. अयोध्येत कारसेवक आक्रमक होत असताना चव्हाणांनी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांना फोन केला होता. तेव्हा कल्याणसिंह यांना हवं तर मला शिक्षा करा, माझ्यावर खटला भरा, चौकशी आयोग नेमा पण मी कारसेवकांवर गोळी चालवणार नाही असे म्हटले होते. तर ढाचा उद्ध्वस्त झाला म्हणून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही दिला होता. कारसेवकांवर गोळीबार केला नाही म्हणून त्यांच्यावर टीका झाली पण या आंदोलनानंतर भाजपाची सत्ता सोपानाकडची वाट सोपी झाली. उत्तर प्रदेशात पुन्हा कल्याणसिंह विजयी झाले आणि भाजपही दिल्लीच्या सिंहासनावर विराजमान झाला. खरे तर कल्याणसिंह हे कुणी धनदांडगे वा मोठा राजकीय वारसा वा गॉडफादर लाभलेले नेते नव्हते. भाजपाने जाणीवपूर्वक त्यांचा शोध घेऊन वाढवलेले, विकसित केलेले ते नेते होते. अलीगड जिह्यात मढौली गावी त्यांचा जन्म झाला. उत्तर प्रदेशात यादव समाज मोठय़ा संख्येने आहे. त्या खालोखाल लोधी समाज संख्येने मोठा आहे. या समाजातील एक तरुण जनसंघाच्या तालमीत तयार करायचा अशी योजना करून कल्याणसिंह यांना जनसंघाने प्रस्थापित केले आणि संघर्ष, सामाजिक बांधीलकी, तळमळ आणि ध्येयवाद असलेले कल्याणसिंह जनसंघ, भाजपा असा प्रवास करत 1991 ला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. अयोध्येतील वादग्रस्त ढाचा उद्ध्वस्त झाला. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला व एक दिवसाची शिक्षाही भोगली. पुन्हा 1997 साली ते मुख्यमंत्री झाले व 1999 पर्यंत त्यांनी हे पद भूषविले ते आठ वेळा उत्तर प्रदेश विधानसभेवर निवडून आले होते व एकदा लोकसभा सदस्य म्हणून विजयी झाले होते. त्यांनी भाजपाचा त्याग करून मुलायमसिंग यांच्याशी हातमिळवणी केली होती. पण त्यांचा हा पक्षत्याग फार काळ टिकला नाही. त्यांनी स्वतःचा ‘लोकतांत्रिक काँग्रेस पक्ष’ स्थापन केला होता. पण हा पक्ष गुंडाळून 2009 मध्ये पुन्हा भाजपात प्रवेश केला व ते लोकसभेचे खासदार झाले. राजस्थानचे राज्यपाल म्हणूनही 2014 मध्ये जबाबदारी पार पाडली होती. प्रमोद महाजन यांच्या मध्यस्थीने त्यांचा भाजपात पुन्हा प्रवेश झाला आणि भाजपा नेता, रामजन्मभूमी आंदोलनाचे शिलेदार अशी त्यांची ओळख दृढ झाली. मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी उत्तम कारभार केला. शेतकरी,  कामगार आणि मागास लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी विशेष काम केले होते. प्रारंभी जनसंघ व नंतर भारतीय जनता पक्ष उत्तर प्रदेशमध्ये तळागाळापर्यंत पोचवण्यात त्यांनी मोठी भूमिका निभावली होती व अथक कष्ट घेतले होते. मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी, उमा भारती यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध होते. उत्तर प्रदेशमधील स्थानिक भाजपा संघर्षातून त्यांचा अटलजीबरोबर वाद झाला होता. पण कल्याणसिंह यांचा आवडता नेता अटलबिहारी वाजपेयी हेच होते. कल्याणसिंह हे दीर्घ काळ भारतीय राजकारणात होते. राममंदिराची पायाभरणीही त्यांना पाहता आली. आणीबाणीत त्यांना 20 महिने कारावास भोगावा लागला. आणीबाणीनंतर जनता पक्षाची राजवट आली तेव्हा उत्तर प्रदेशमध्ये राम नरेश यादव यांच्या मंत्रिमंडळात ते आरोग्यमंत्री झाले. अधिकाऱयांना जनहिताचे काम करण्यासाठी मोकळीक आणि शक्ती देणारा नेता अशीही त्यांची प्रशासनात ओळख होती. जबाबदारी घेणारा, निभावणारा आणि प्रसंगी त्यासाठी किंमत मोजणारा नेता असाही त्यांचा परिचय राजकीय वाटचालीत नमूद झाला आहे. नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधानपदासाठी नाव सुचवण्यात कल्याणसिंह यांचा पुढाकार होता. केंदात मोदी सरकार स्थापन झाल्यावर कल्याणसिंह यांना राज्यपालपदाची संधी मिळाली. सक्रीय राजकारणातून थांबल्यावर त्यांनी योगी आदित्यनाथ, राजनाथसिंह वगैरे नव्या दमाच्या नेत्यांशी चांगले संबंध ठेवले हेते. त्यांचे पुत्र खासदार आहेत तर नातू उत्तर प्रदेशचे आरोग्य मंत्री आहेत.  एक बहुचर्चित, तगडे, फायरब्रँड नेतृत्व विसावले आहे.

Related Stories

भारतातील औषधी वनस्पती परंपरा

Patil_p

गुजरातमधील ‘ऑपरेशन विजय’

Patil_p

‘शक्ती’ मिळाली तरी…

Patil_p

हाऊस ऑफ बांबो

Patil_p

दोष न ठेवावा आम्हासी

Patil_p

भाजपचे लक्ष्य मुंबई महापालिका

Patil_p
error: Content is protected !!