तरुण भारत

परिवहनची चाके हळूहळू मार्गावर

प्रवाशांच्या संख्येत वाढ : महसूल 50 लाखांवर, बसफेऱया वाढविण्याची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

अनलॉकनंतर सुरू झालेल्या जिल्हय़ांतर्गत व राज्यांतर्गत बससेवेला प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र मागील आठ दिवसांपासून प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली असून परिवहनचे उत्पन्न 50 लाखांवर आले आहे. उत्पन्नात वाढ होत असल्याने परिवहनची चाके हळूहळू मार्गावर येताना दिसत आहेत. दरम्यान सोमवारपासून 9 ते 12 पर्यंतच्या ऑफलाईन वर्गांना सुरुवात झाल्याने प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. सोमवारी मध्यवर्ती बसस्थानकात स्थानिक प्रवाशांबरोबर लांब पल्ल्याच्या प्रवाशांची संख्या वाढली होती.  

 लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्यानंतर जिल्हय़ांतर्गत व राज्यांतर्गत बससेवेस प्रारंभ झाला. मात्र प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे परिवहनची बससेवा तोटय़ातच सुरू होती. शिवाय इंधन दरवाढीचा फटकाही परिवहनला सहन करावा लागत आहे. मागील काही दिवसांपासून स्थानिक प्रवाशांबरोबर लांब पल्ल्याच्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे परिवहनच्या चाकांना गती मिळत आहे. स्थानिक प्रवाशांबरोबर कोल्हापूर, पुणे, निपाणी, चिकोडी, धारवाड, बैलहोंगल, हुबळी, गोकाक आदी ठिकाणी प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्या वाढली आहे. प्रवाशांच्या संख्येत समाधानकारक वाढ होत असल्याने महसुलातही वाढ होत आहे. उत्पन्नात वाढ होत असली तरी परिवहन अद्याप निर्धारित उत्पन्न उद्दिष्टापासून दूरच आहे.

  बेळगाव विभागातील चार आगारांसह रामदुर्ग, बैलहोंगल, खानापूर या सात आगारातील बससेवेवर परिणाम झाला होता. त्यामुळे परिवहनला प्रचंड प्रमाणात फटका बसला. त्यामुळे आर्थिक गणित कोलमडले. शिवाय तिजोरीत ठणठणात निर्माण झाल्याने या खात्यातील कर्मचाऱयांना जुलै महिन्याच्या वेतनापासून वंचित रहावे लागले आहे.

  लॉकडाऊनपूर्वी बेळगाव विभागातून दररोज 750 बसेस धावत होत्या. त्यामुळे दररोज सुमारे 75 ते 80 लाख रुपये उत्पन्न मिळत होते. मात्र मागील काही दिवसांपासून उत्पन्न खाली घसरले होते. ते आता परत वाढ होत असून सध्या दररोज 50 लाखांपर्यंत महसूल मिळत आहे. त्यामुळे परिवहनला दिलासा मिळाला आहे.

आगामी काळात परिवहनचे उत्पन्न पूर्वपदावर येईल

 -के. के. लमाणी (विभागीय संचार अधिकारी केएसआरटीसी)

कोरोनाकाळात परिवहनचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम बसव्यवस्थेवर झाला. बसस्थानकांतून जिल्हय़ांतर्गत, राज्यांतर्गत, आंतरराज्य बससेवा सुरळीत सुरू झाली आहे. प्रवाशांचा प्रतिसादही हळूहळू वाढत आहे. शिवाय शाळा-कॉलेजीस सुरू झाल्याने प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आगामी काळात परिवहनचे उत्पन्न पूर्वपदावर येईल, अशी आशा आहे.

Related Stories

जिल्हय़ात सात लाख जॉबकार्डांचे वितरण

Amit Kulkarni

‘त्या’ विद्यार्थ्यांची विनंती आम्हाला घरी पाठवा

Patil_p

कृषी उत्पादनाला वाजवी भाव देण्यासाठी प्रयत्नशील

Amit Kulkarni

निपाणी शाहूनगरात भरदिवसा चोरी

Amit Kulkarni

एफसीसी बीडी संघाकडे तालीमकट्टा चषक

Amit Kulkarni

ग्रामपंचायत ग्रंथपालांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन

Patil_p
error: Content is protected !!