तरुण भारत

मुक्तपुरुष गुणांच्या पलीकडे असतो

अध्याय अकरावा

ईश्वराला मुक्तपुरुष इतका प्रिय असतो की त्यानं तोंडातून एखादे आश्वासन दिले की ईश्वर ते पुरे करण्यासाठी धावून येतो. जणू तो त्याने स्वतःच दिलेला शब्द असतो. मुक्तपुरुषाच्या हातून निरनिराळय़ा लीला घडत असतात. लोकांना ते चमत्कार वाटतात पण खरं बघायला गेलं तर ती ईश्वरी इच्छा असते. मुक्तपुरुष हा ईश्वराचं सगुण रूप असल्याने ईश्वरी इच्छा त्याच्यामार्फत पूर्ण होते. अशी अलौकिक लीला चरित्रे आपल्या नित्यवाचनात असतातच आणि आपण त्याची श्रद्धेने पारायणं करतो. तो जरी देहात वावरत आहे असं दिसत असलं तरी प्रत्यक्षात त्याला देहभान नसतं. त्याने स्वतःचा देह ईश्वराच्या हवाली केलेला असतो आणि मनाने तो एका जागी स्वस्थ बसून ईश्वर चिंतन करत असतो. त्याच्या हातून अनेक प्रकारची कर्मे होतात. तथापि तो निजस्वरूपात निश्चळ असतो. पाण्यातल्या लाटा पाण्यावर अभिन्नपणाने चालत असतात त्याप्रमाणे तो आत्मस्वरूपामध्ये त्याचे अंग चालवीत असतो. अगदी पायांशिवायच वायु जसा सर्वत्र गमन करतो, त्याप्रमाणेच आत्मस्वरूपात संचार करणे हे मुक्ताचे लक्षण होय. स्त्रीपुरुषांचे विकार उत्पन्न झाले तरी त्याची आत्मस्थिती मोडत नाही आणि दैवयोगाने त्याला संतती झाली तरी तिच्या ठिकाणीही त्याला आत्मप्रचितीच येत असते. त्याला सर्वत्र सर्वव्यापी ईश्वरच दिसत असल्याने तोच माता, पिता आणि पुत्र असतो. त्याला जनात किंवा वनात ईश्वरावाचून दुसरे कोणीच दिसत नाही.

Advertisements

त्याच्या दृष्टीने जगाचे अस्तित्व नगण्य असल्याने त्याला स्त्री पुत्र हे आकाशातील ढगांप्रमाणे वाटतात. ती यथाकाली येतात आणि जातात. हा मात्र एका ठिकाणी निश्चल असतो स्त्रीसुख, धन, घरदार इत्यादि लौकिक प्रति÷sच्या गोष्टींचं त्याला काहीच आकर्षण नसतं. तो सदासर्वदा निरिच्छ असतो. ज्याला धनलोभाची आस्था असते, त्याला कल्पांतीसुद्धा मुक्तता घडत नाही. त्याचप्रमाणे स्त्रीची वासना असते त्यालाही कधी परमार्थाची किंवा आत्मज्ञानाची प्राप्ती होत नाही. मुक्तपुरुषाची महती एवढी आहे की, सासरी कामं करून दमलेली मुलगी विसाव्याकरिता जशी माहेरी येते, त्याप्रमाणे मुक्त झोपला असता समाधी त्याच्या आश्रयाला येत असते. अशा रीतीने तो आत्मस्वरूपात निजला असता खाली जमीन नाही आणि वर आकाश नाही, अशा शय्येवर तो शयन करतो. त्याचं सगळंच जगावेगळं असतं चालता बोलताना, खाताजेवतानाही त्याची झोपमोड होत नाही कारण इतरांना तो आपल्या बरोबर आहे असं वाटत असतं पण प्रत्यक्षात तो निजरूप होऊन राहिलेला असतो. त्याच्यालेखी इतरांचं अस्तित्वच नसल्याने निजविणारा व उठविणारा दोन्ही तोच असतो. तेथे जागविणार तरी कोण कोणाला? तो स्वस्थचित्ताने निजरूपात निजलेला असतो. अशा रीतीने तो जे जे कर्म करावयास जातो, तेथे तेथे परब्रह्मच प्रगट होते. मुक्ताच्या वागण्याचा अमुक एक नेम असा नसतो. इतरांचं वागणं जगाच्या वागण्याशी संबंधित असतं तर मुक्ताच्या दृष्टीने जगच अस्तित्वात नसल्याने त्याचं वागणं इतरांच्या वर्तनाशी सुसंगत असेलच असं नाही. मुक्त पुरुष कशातच गुंतून पडत नसल्याने सुखदुःख, रागलोभ आदि भावना त्याला शिवतसुद्धा नाहीत. त्यामुळे त्याच्या हातून असक्तीरहित पण प्रारब्धाप्रमाणे निरपेक्ष कर्मे होत असतात. ज्याचा अहंकार नाहीसा झाला तो निःसंशय ईश्वरस्वरूप असतो. हे वेदशास्त्रांनाही संमत आहे. याप्रमाणे जो परब्रह्मस्वरूप होऊन राहतो, त्याला धर्माधर्म हे स्वप्नवत असतात. इंद्रियांचे कर्मही त्याला बाधक होऊ शकत नाही. सर्वसामान्य लोक गुणांच्या प्रभावाखाली येऊन कर्म करतात. सात्विक लोक लोककल्याणकारी कर्मे करतात तर राजस लोक स्वतःच्या फायद्यासाठी कर्म करतात. तामसी दुसऱयाला त्रास द्यायच्या हेतूने कर्म करतात आणि त्यामुळे प्रत्येकाला त्यानुसार बरेवाईट फळ मिळते व त्याला ते भोगावे लागते पण मुक्त पुरुष गुणांच्या प्रभावाखाली कर्म करत नसल्याने तो देहात असूनही विदेही आणि नित्यमुक्तच असतो.

क्रमशः

Related Stories

तिसऱया लाटेत टाळेबंदीची भीती

Patil_p

दोन हजार रुपयाच्या नोटेची छपाई बंद करण्याचा निर्णय नाही?

Omkar B

मम चित्ता तुमचे पाय

Patil_p

पूरनियंत्रणासाठी हवेत राजकारणापलीकडचे प्रयत्न..!

Patil_p

अपघात की हल्ला ?

Amit Kulkarni

लसीकरणाची वाढती टक्केवारी आशादायी

Patil_p
error: Content is protected !!