तरुण भारत

एकाचवेळी 9 न्यायाधीशांनी घेतली शपथ

सर्वोच्च न्यायालयात पहिल्यांदाच मोठा शपथविधी – 3 महिला न्यायाधीशांचा समावेश

वृत्तसंस्था  / नवी दिल्ली

Advertisements

सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी 9 न्यायाधीशांनी एकाचवेळी शपथ घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतका मोठा शपथविधी सोहळा पार पडला आहे. तसेच या 9 न्यायाधीशांमध्ये 3 महिला न्यायाधीशांचा समावेश आहे. महिला न्यायाधीशांमध्ये नागरत्ना यांचाही समावेश असून त्या 2027 मध्ये देशाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश होण्याची शक्यता आहे.

 याचबरोबर न्यायाधीश पी.एस. नरसिंह हे बार कौन्सिलमधून थेट सर्वोच्च न्यायालयात नियुक्त होत आहेत.  ते देखील 2028 मध्ये सरन्यायाधीश होऊ शकतात. 1993 मध्ये न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी कॉलेजियम प्रणाली अस्तित्वात आल्यापासून नरसिंह हे बार कौन्सिलमधून थेट सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त होणारे सहावे वकील ठरले आहेत.

हा शपथविधी सोहळा न्यायालयाच्या अतिरिक्त भवन परिसरातील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. सरन्यायाधीश एन.व्ही. रमण यांनी 9 न्यायाधीशांना शपथ दिली. सर्वसाधारणपणे न्यायाधीशांना कोर्ट रुममध्ये शपथ दिली जाते. श्रीनिवास ओका, विक्रम नाथ, जितेंद्र कुमार माहेश्वरी, हिमा कोहली, बी.व्ही. नागरत्ना, सी.टी. रविकुमार, एम.एम. सुंदरेश, बेला एम. त्रिवेदी आणि पी.एस. नरसिंह यांनी शपथ घेतली आहे.

सर्वोच्च न्यायालयात आता सरन्यायाधीशांसह न्यायाधीशांची संख्या 33 झाली आहे. तर स्वीकृत संख्या 34 असल्याने अजूनही एक जागा रिक्त असणार आहे. सरन्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली 17 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या बैठकीत 9 नव्या न्यायाधीशांच्या नावाला मंजुरी मिळाली होती. 2019 नंतर एकाही न्यायाधीशाची नियुक्ती झाली नव्हती. 17 नोव्हेंबर 2019 रोजी माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई निवृत्त झाल्यापासून नियुक्त्या रखडल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने 9 नावांची शिफारस 22 महिन्यांनी केली होती.

Related Stories

कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी विनाअट परवानगी

datta jadhav

भारतात आकडेवारीपेक्षा दहापट अधिक मृत्यूचा दावा

Patil_p

कोरोनावर पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा

tarunbharat

पश्चिम बंगाल : ‘यास’ चक्रीवादळाने धारण केले अतितीव्र स्वरूप; मुसळधार पावसाला सुरुवात

Rohan_P

दिल्लीत दिवसभरात 1192 नवे कोरोना रुग्ण; 23 मृत्यू

Rohan_P

राज्यात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण घटले

Patil_p
error: Content is protected !!