तरुण भारत

मरियप्पनला रौप्य, शरद, सिंहराज यांना कांस्यपदके

टोकियो पॅरालिम्पिक्स – भारताची 10 पदकांपर्यंत झेप, ट्रक अँड फिल्डमधील सातत्यपूर्ण कामगिरीचे फलित

टोकियो / वृत्तसंस्था

Advertisements

विद्यमान विजेते मरियप्पन थंगवेलू व शरद कुमार यांनी पुरुषांच्या उंच उडी टी-42 इव्हेंटमध्ये अनुक्रमे रौप्य व कांस्यपदके जिंकली आणि यानंतर पॅरालिम्पिक्स पदकतालिकेत भारताने एकूण 10 पदकांपर्यंत झेप घेतली. ट्रक अँड फिल्डमधील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे भारताला ही भरीव कामगिरी करता आली.

मरियप्पनने 1.86 मीटर्सची उडी नोंदवत दुसरे स्थान मिळवले तर अमेरिकेचा सुवर्णजेता सॅम ग्रेव्हे तिसऱया प्रयत्नात 1.88 मीटर्ससह अव्वलस्थानाचा मानकरी ठरला. या इव्हेंटमध्ये शरद कुमारने 1.83 मीटर्सची उडी घेत कांस्यपदकाची कमाई केली.

‘मी इथे नवा विश्वविक्रम रचत सुवर्ण जिंकू शकलो असतो. मी हाच उद्देश समोर ठेवून येथे आलो होतो. मात्र, पावसाने व्यत्यय आणल्याने माझ्या प्रयत्नांना यश लाभले नाही. प्रारंभी, थोडी सर येऊन गेली. पण, 1.80 मीटर्सच्या मार्कनंतर जोरदार पाऊस बरसला. यावेळी कृत्रिम पायातील सॉक्स ओले झाले आणि त्यानंतर पूर्ण क्षमतेने उडी घेणे अशक्य होते’, असे मरियप्पन इव्हेंटनंतर म्हणाला.

‘यापूर्वी, रिओ पॅरालिम्पिक्समध्ये उत्तम वातावरण होते आणि त्यामुळे सुवर्ण जिंकू शकलो. आता, पॅरिस 2024 मधील पुढील आवृत्तीत मी ताज्या दमाने प्रयत्न करेन’, याचा त्याने पुढे उल्लेख केला. या इव्हेंटमधील आणखी एक भारतीय स्पर्धक, 2016 रिओ पॅरालिम्पिक्स कांस्यजेता वरुण सिंग भाटी सातव्या स्थानी फेकला गेला. फायनलमध्ये 9 पॅरा ऍथलिट्सचा समावेश होता. वरुणला 1.77 मीटर्सचा मार्क ओलांडता आला नाही. पायाच्या दुखापतीमुळे पॅरालिम्पिक्समधून माघार घेण्याचा माझा विचार होता, असे तो याप्रसंगी म्हणाला.

‘मला काल गुडघ्याची दुखापत झाली होती आणि यामुळे अंतिम क्षणी माघारीचे विचार मनात घोळत होते. पण, माझ्या कुटुंबियांशी मी संवाद साधला आणि त्यांनी माझे मनोबल उंचावले. त्यांनी मला भगवद्गीता वाचण्यास सांगितली आणि ज्यावर नियंत्रण नाही, त्याचा विचार करु नये, असा सल्ला दिला’, असे वरुण तपशीलवार बोलताना म्हणाला.

टी-42 क्लासिफिकेशनमध्ये पायातील दोष, लेंग्थ डिफरन्स, इम्पेयर्ड मसल पॉवर किंवा इम्पेयर्ड पॅसिव्ह रेंज ऑफ मुव्हमेंट असणाऱया पॅरा-ऍथलिट्सचा समावेश होतो. येथे सुरु असलेल्या यंदाच्या पॅरालिम्पिक्समध्ये भारताने आतापर्यंत 2 सुवर्ण, 5 रौप्य व 3 कांस्य अशी एकूण 10 पदके जिंकली आहेत. भारतीय पथकाने ऍथलेटिक्समध्ये सर्वाधिक यश मिळवताना त्यात 1 सुवर्ण, 4 रौप्य व 2 कांस्यपदकांची कमाई केली आहे.

5 वर्षांपूर्वी रिओ स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा 26 वर्षीय मरियप्पन येथेही भरीव यश प्राप्त करेल, अशी अपेक्षा होती. तामिळनाडूच्या या ऍथलिटला वयाच्या 5 व्या वर्षी बसने चिरडल्याने उजवा पाय गमवावा लागला होता. डॉक्टरनी त्यावेळी कृत्रिम पाय बसवण्याचा सल्ला दिला होता. मात्र, त्याच्या आईने याला विरोध केला होता. वडील परागंदा झाल्यानंतर मरियप्पनचे बालपण गरिबीशी झुंजण्यातच गेले. त्याच्या आईने भाजीविक्रीचा व्यवसाय सुरु करण्यापूर्वी रोजंदारी करत घरखर्च चालवला. पॅरालिम्पिक्सपूर्वी मरियप्पन बेंगळूरमध्ये भारतीय क्रीडा प्राधिकरणात सत्यनारायण यांच्या प्रशिक्षणाखाली सराव करत होता.

शरदच्या मेहनतीला यश

शरद कुमार हा पाटणा, बिहारमधील असून केवळ दोन वर्षांचा असताना त्याला पॅरालिसिसचा झटका आला आणि यात त्याचा डावा पाय निकामी झाला होता. पॅरालिम्पिक्सला दोन वर्षांचा कालावधी असताना कुमारने विदेशी प्रशिक्षक निकिटिन येव्हेन यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सराव केला. हा सर्व खर्च केंद्र सरकारने उचलला. केंद्राने त्यानंतर युक्रेनवरुन भारतात पोहोचण्यासाठी देखील त्याची मदत केली. शरद कुमार दोनवेळचा आशियाई पॅरा सुवर्णजेता आहे.

पुरुषांच्या 10 मीटर्स एअर पिस्तोलमध्ये सिंहराज अदनाला कांस्य

भारतीय नेमबाज सिंहराज अदनाने पी 1 पुरुषांच्या 10 मीटर्स पिस्तोल एसएच 1 इव्हेंटमध्ये कांस्यपदकाची कमाई केली. अदनाने 216.8 अंक प्राप्त करत तिसरे स्थान संपादन केले. तो 8 स्पर्धकांच्या फायनलमध्ये सहावा सर्वोत्तम शूटर म्हणून पात्र ठरला होता.

क्वॉलिफिकेशनमध्ये टॉपवर राहिलेल्या मनीष नरवालला फायनलमध्ये मात्र सातव्या स्थानी समाधान मानावे लागले. अदना प्रारंभी पहिल्या तीनमध्ये कायम होता. 19 व्या शॉटवेळी खराब कामगिरीमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मात्र, 20 व्या प्रयत्नात त्याने ही कसर भरुन काढली. चीनने या गटात उत्तम वर्चस्व गाजवताना पहिली दोन्ही पदके जिंकली. विद्यमान विजेता चाओ यांगने 237.9 या पॅरालिम्पिक विक्रमासह सुवर्ण तर हुआंग क्झिंगने 237.5 अंकांसह रौप्य जिंकले. एसएच 1 कॅटेगरीतील नेमबाज केवळ एकाच हाताने नेम धरत असल्याने हा इव्हेंट कठीण मानला जातो.

रुबिना फ्रान्सिसला 7 वे स्थान

भारतीय महिला नेमबाज रुबिना फ्रान्सिसला महिलांच्या 10 मीटर्स एअर पिस्तोल एसएच 1 इव्हेंट फायनलमध्ये सातव्या स्थानी समाधान मानावे लागले. असाका शुटिंग रेंजवरील या इव्हेंटमध्ये रुबिनाला 128.5 गुणांवर थांबावे लागले. इराणच्या सारेहने 239.2 या विक्रमी अंकांसह सुवर्ण, तुर्कीच्या एसेगूल पेहलिव्हॅनलरने रौप्य तर हंगेरीच्या क्रिस्तिझिनाने कांस्यपदक मिळवले.

तिरंदाजीत राकेश कुमार उपांत्यपूर्व फेरीत पराभूत

भारतीय तिरंदाज राकेश कुमारला उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्यात अपयश आले. त्याला चीनच्या क्झिनलियांगकडून 143-145 अशा निसटत्या फरकाने पराभव पत्करावा लागला. राकेशने उपांत्यपूर्व फेरीतील पाचही फेऱयांमध्ये जोरदार झुंज दिली. पण, चायनिज प्रतिस्पर्धीने सातत्याने किंचीत आघाडी कायम राखली. राकेशने त्यापूर्वी 1/8 एलिमिनेशन लढतीत स्लोव्हाकियाच्या मॅरियन मॅरेसॅकला 140-137 अशा फरकाने मात दिली होती.

Related Stories

लिव्हिंगस्टोनच्या करारात वाढ

Patil_p

बंगालच्या विजयात विवेक सिंगचे शतक

Patil_p

सुबेदार मेजर जितू राय मणिपूरमध्ये सेवेसाठी सज्ज

Patil_p

हरियाणा संघाला महिला हॉकीचे जेतेपद

Patil_p

एनबीए स्टार कोबी ब्रायंटचे अपघाती निधन

Patil_p

हॉकीची कार्यशाळा ऑनलाईनवर

Patil_p
error: Content is protected !!