तरुण भारत

सातारकरांवर मोकाट कुत्र्यांच्या टोळक्यांची दहशत

शहरासह उपनगरात वाढली संख्या : अनेकांचे घेतलेत चावे : मुले, महिलांच्या अंगावरही धावून जातात

प्रतिनिधी /सातारा

Advertisements

सातारा शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढू नये म्हणून दर वर्षी हजारो भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले जात असल्याचा दावा सातारा पालिका करत असली तरी दुसरीकडे दिवसागणिक मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत असल्याचा विरोधाभास समोर येत आहे. सध्या देखील शहरातील अनेक भागांसह उपनगरात देखील भटक्या कुत्र्यांची संख्या मोठया प्रमाणावर वाढली आहे. कुत्र्यांनी अनेकांचे चावे घेतले असून मुले, महिला रस्त्याने कुत्री अंगावर धावून जात असल्याने शहरात मोकाट कुत्र्यांच्या टोळय़ांची मोठी दहशत आहे.

शहरातील अनेक भागांत अधूनमधून पिसाळलेल्या कुत्र्याकडून हल्ल्याचे प्रकार घडत असतात. आजवर त्यात कित्येक बालके व नागरिक जखमी झाले आहेत. पालिकेने मोकाट कुत्री या विषयाकडे डोळेझाक केली. मोकाट कुत्र्यांची संख्या आटोक्यात ठेवण्यात पालिका अपयशी ठरल्याचे दिसून येते. गेल्या काही वर्षांपासून कुत्र्यांवर निर्बिजीकरण केले जाते; परंतु त्यांची वाढती संख्या नियंत्रणात आली नसल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया आहे.

गल्लीबोळात मोकाट फिरणाऱया कुत्र्यांमुळे शहरवासियांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते. रात्रीच्या सुमारास त्यांचा उपद्रव अधिकच वाढतो. भटक्या कुत्र्यांनी लहान मुले, महिला, युवतीच नव्हे तर, सगळय़ा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. रात्री भटक्या कुत्र्यांची टोळकी राजवाडा, मोती चौक, जुना मोटार स्टँड, पोवईनाका, बसस्थानक परिसरासह सर्व पेठांमध्ये ही टोळकी वाहनांच्या मागे धावल्याने अपघात होऊन वाहनधारकही जखमी झाले आहेत.

रात्री विचित्र आवाजात ओरडणे, वाहनांच्या सीट फाडणे, मागे धावणे, पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुडगूस याबाबत पालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रारी येतात. पिसाळलेल्या कुत्र्याची तक्रार आल्यास या विभागाचे पथक त्या कुत्र्याला केवळ पकडून देखरेखीखाली ठेवू शकते. ज्या परिसरात अस्वच्छता आहे, उकिरडय़ावर अन्न टाकले जाते, तिथे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढते. यामुळे नागरिकांनी खराब झालेले अन्नपदार्थ बाहेर न टाकल्यास त्यांना अटकाव घालता येऊ शकतो. स्वच्छ कॉलनीत भटका कुत्रा अपवादाने आढळतो, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

मॉर्निंग वॉकला जातानाही भिती

सातारा शहरातील नागरिक अनलॉक झाल्यानंतर मॉर्निंग वॉकला जावू लागले आहेत. मात्र सकाळच्या वेळीत शहरातील रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांची टोळकी मस्तीत हिंडत असतात. कुत्र्यांची टोळके पहिल्यावर नागरिकांच्या अंगावर भीतीने काटा उभा राहतो. एकटा, दुकटा नागरिक असेल तर मग ही कुत्री थेट अंगावर येण्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांवर या मोकाट कुत्र्यांची मोठी दहशत निर्माण झाली आहे.

पालिकेच्या उपाय योजना कागदावरच

या प्रक्रियेत भटक्या कुत्र्यांपासून असणारा धोका कमी करण्यासाठी लसीकरण करण्यात येते. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला दाखवला जातो. तर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया केल्यात की नाहीत हे पालिका पदाधिकाऱयांना माहितीच नसावे. कारण तसे केले असते मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली नसती. हद्दवाढीनंतर पालिकेत आलेल्या शाहूपुरी, मोळाचा ओढा, तामजाईनगरसह खेड, संगमनगर, कृष्णानगर, बाँबे रेस्टारंट परिसरातही भटक्या कुत्र्यांनी नागरिकांना जेरीस आणले आहे.

तातडीने उपाय योजनांची गरज

भटके कुत्रे चावल्यामुळे होणाऱया आजाराचे गंभीर परिणाम असतात. निर्बिजीकरण शस्त्रक्रियेवेळी श्वानांचे लसीकरण केले जाते. याद्वारे त्यांच्यापासूनचा धोका कमी केला जातो. भटक्या कुत्र्यांवर निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया करण्याबरोबर पालिका क्षेत्रातील पाळीव श्वानांची नोंद आरोग्य विभाग करतो. मात्र, तशी काहीही माहिती उपलब्ध करण्यात आलेली नाही. शहरात उघडय़ावर अन्न, चिकन, मटण दुकानांसह हॉटेल, स्नॅक्स गाडय़ावरील वेस्टेज टाकले जाते. त्यावर पोसलेल्या कुत्र्यांनी नागरिकांवर चांगलीच दहशत निर्माण केली असून पालिकेने तातडीने उपाय योजना करण्याची गरज नागरिक व्यक्त करत आहेत.

Related Stories

जिल्ह्यात सरासरी 9.2 मि.मी. पाऊस

datta jadhav

मेडिकल कॉलेजच्या जागेचा प्रश्न सुटला

Patil_p

दिलासादायक : बाधितवाढ चारशेच्या खाली

datta jadhav

सातारा : शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या पुढाऱ्यांना जेलमध्ये टाका

datta jadhav

एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण

datta jadhav

शासन विरोधात खेड रिपाइंचे 15 रोजी ठिय्या आंदोलन

Amit Kulkarni
error: Content is protected !!