तरुण भारत

प्रमोद भगतची उपांत्य फेरीत धडक

टोकियो पॅरालिम्पिक्स : सुहास, कृष्णा, तरुणची आगेकूच, पलक कोहलीसाठी संमिश्र दिवस

वृत्तसंस्था /टोकियो

Advertisements

जागतिक क्रमवारीतील अव्वलमानांकित बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने टोकियो पॅरालिम्पिक्स बॅडमिंटन एकेरीत (एसएल 3) उपांत्य फेरीत धडक मारली. त्याने युक्रेनच्या ओलेक्सांद्रचा 21-12, 21-9 अशा फरकाने धुव्वा उडवला. अवघ्या 26 मिनिटातच ही लढत निकाली झाली.

‘मला आज उत्तम सूर सापडला आणि फटके व्यवस्थित लागत राहिले. ओलेक्सांद्र हा उत्तम खेळाडू आहे आणि या लढतीत त्याचे अनेक फटके व्यवस्थित बसत होते. त्याला पराभूत करत उपांत्य फेरीत पोहोचू शकलो, याचा आनंद आहे’, असे भगत याप्रसंगी म्हणाला.

‘आता बाद फेरी सुरु झाल्यानंतर आव्हाने आणखी कठीण स्वरुपाची असतील. मी स्वतः एकावेळी एकाच लढतीवर लक्ष केंद्रित करणे पसंत करतो. मिश्र दुहेरीतील शेवटचा साखळी सामना देखील आमच्यासाठी करा वा मरा धर्तीवरील असेल’, असे त्याने पुढे नमूद केले. मिश्र दुहेरीतील शेवटच्या साखळी सामन्यात भगत व पलक कोहली ही जोडी सिरिपोंग व निपदा यांच्याविरुद्ध लढणार आहे.

अन्य भारतीय बॅडमिंटनपटू सुहास यतिराज, तरुण धिल्लाँ, कृष्णा नागर हे देखील पुरुष एकेरीत आपापले सामने जिंकण्यात यशस्वी ठरले. 38 वर्षीय सुहासने प्रतिस्पर्ध्यावर 21-9, 21-3 अशी मात केली. हा सामना केवळ 19 मिनिटे चालला. पुरुष गटात 27 वर्षीय तरुणने ब गटातील दुसऱया लढतीत सिरिपोंगविरुद्ध 21-7, 21-13 असा विजय संपादन केला. ब गटातील ही लढत 23 मिनिटात निकाली झाली. कृष्णाने दिदिनला 22-20, 21-10 अशा फरकाने मात दिली. आता पुढील फेरीत सुहासची लढत इंडोनेशियाच्या हॅरी सुसान्तोविरुद्ध व त्यानंतर फ्रान्सच्या ल्युकासविरुद्ध होईल. द्वितीय मानांकित तरुणच्या पुढील लढती कोरियाच्या शिन क्युआंग व इंडोनेशियाच्या प्रेडी सेतियावनविरुद्ध होणार आहेत.

महिला गटात पलक कोहलीने झेहराला 21-12, 21-18 अशा फरकाने 27 मिनिटात पराभूत केले. मात्र, त्यापूर्वी महिला दुहेरीत 19 वर्षीय पलक व तिची सहकारी पारुल परमार यांना चेंग हेफांग व मा हुईहुई या चायनीज जोडीने 7-21, 5-21 अशा फरकाने पराभव पत्करावा लागला.

एकेरीत परमारचा चीनच्या चेंग हेफांगविरुद्ध टिकाव लागला नाही. चेंगने 21-8, 21-2 असा एकतर्फी पराभव नोंदवला. पुढच्या सामन्यात पारुल परमारने जर्मनीच्या खेळाडूविरुद्ध चांगली लढत दिली. पण शेवटी तिला 21-23, 21-19, 15-21 असा पराभव स्वीकारावा लागल्याने तिचे आव्हान संपुष्टात आले.

तायक्वांदोपटू अरुणा तन्वरची माघार

भारताची महिला तायक्वांदोपटू अरुणा तन्वरने पॅरालिम्पिक्स के 44-49 किलोग्रॅम इव्हेंटमधील रिपेचेज फेरीमधून माघार घेतली. पेरुची चौथी मानांकित प्रतिस्पर्धी इस्पिनोझा कॅरन्झाविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीतील लढतीदरम्यान तिला काही दुखापतींचा सामना करावा लागला होता. त्या लढतीत अरुणा 26-2, 30-10, 28-9 अशा फरकाने पराभूत झाली होती.

उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झालेल्या सर्व प्रतिस्पर्ध्यांना रिपेचेज राऊंडमध्ये 3 सामने जिंकल्यास कांस्य मिळवता येते. मात्र, अरुणाची ही संधीही आता हुकली आहे. रिपेचेज क्वॉर्टर्समध्ये अरुणाची लढत अझरबैजानच्या 10 व्या मानांकित रॉयला फॅतालिएव्हाविरुद्ध होणे अपेक्षित होते. पहिल्या लढतीत तिने सर्बियाच्या जोवानोविकवर 29-9 असा विजय मिळविला होता आणि याच लढतीवेळी तिच्या उजव्या पायाला जोरदार धक्का बसला होता. वेदना होत असल्याने तिला प्रॅक्चर झाले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आणि त्यामुळेच तिने माघार घेतल्याचे सांगण्यात आले.

नेमबाज राहुल जाखड मिश्र 25 मीटर्स पिस्तोल गटात पाचवा

भारतीय नेमबाज राहुल जाखडला पी 3 मिश्र 25 मीटर्स पिस्तोल एसएच 1 इव्हेंटमध्ये पाचव्या स्थानी समाधान मानावे लागले. 35 वर्षीय जाखडला फायनल्समधील सातव्या सिरीजनंतर पदकाच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला. त्याने प्रीसिजनमध्ये 284 व रॅपिडमध्ये 292 असे एकूण 576 अंक मिळवले. त्याची ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. या इव्हेंटमध्ये एक हात किंवा पायाला कृत्रिम जोड असणारे पॅरा ऍथलिट सहभागी होऊ शकतात. चीनच्या क्झिंग हुआंगने अंतिम फेरीत 27 अंकाच्या नव्या पॅरालिम्पिक विक्रमासह सुवर्ण मिळवले. पोलंडची सोविन्स्की 21 गुणांसह रौप्य तर युक्रेनची ओलेक्सि डेनिसियूक 20 गुणांसह कांस्यपदकाची मानकरी ठरली. भारताने नेमबाजीत आतापर्यंत 2 पदके मिळवली आहेत.

प्राची यादव ,कॅनोई स्प्रिन्टच्या उपांत्य फेरीत

भारताची प्राची यादव गुरुवारी महिलांच्या वैयक्तिक 200 मीटर्स कॅनोई स्प्रिन्ट इव्हेंटच्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरली. मूळ भोपाळची 26 वर्षीय प्राची उपांत्यपूर्व फेरीत ब्रिटीश प्रतिस्पर्धी इम्मा विग्जविरुद्ध यशस्वी ठरली. तिने या लढतीत विग्जला 13.014 सेकंद अंतराने पिछाडीवर टाकले. व्हीएल 2 मधील हा हिट वनचा टप्पा सी फॉरेस्ट वॉटर वे येथे संपन्न झाला. कमरेखाली पॅरालिसिसचा झटका येऊन गेलेल्या प्राची यादवने सर्वप्रथम जलतरणावर लक्ष केंद्रित केले होते. मात्र, तिचे प्रशिक्षक विरेंदर कुमार यांच्या सुचनेनुसार तिने कॅनोईंगकडे मोर्चा वळवला.

Related Stories

प्रशिक्षक रोका बार्सिलोनात दाखल

Patil_p

न्यूझीलंडच्या ऑलिंपिक पथकामध्ये तृतीयपंथीय ऍथलीट

Patil_p

अवघ्या चेन्नई संघावर मुंबईचे सलामीवीर भारी!

Patil_p

महिला हॉकी संघाचे स्वप्नभंग; कांस्यपदक लढतीत ग्रेट ब्रिटनकडून पराभव

Rohan_P

भारतीय युवा संघाचा विजयी प्रारंभ

Patil_p

पीटर फुल्टॉनचा राजीनामा

Patil_p
error: Content is protected !!