तरुण भारत

रेव्होल्युशनरी गोवन्स्च्या सात युवकांची जामिनावर सुटका सकाळी कोलवाळ तुरूंगाची सैर; सायंकाळी जामिनावर मुक्तता

मुख्यमंत्र्यांनी घेतला आरजीचा धसका,विनाकारण कमले लावून अडकविल्याचा आरोप : आरजी शिरोडा येथे बैठकीत मुख्यमंत्र्याना प्रश्न विचारणे प्रकरण

प्रतिनिधी /फोंडा

Advertisements

शिरोडा मतदारसंघाच्या मॅरथॉन दौऱयावर असलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना प्रश्न विचारून गोंधळ घातल्याप्रकरणी आरजीच्या सात सदस्यांना चौदा दिवसांच्या रिमांडवर रविवारी सकाळी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. नंतर सायंकाळी जेएमएफसी न्यायालयातर्फे त्यांना जामिनावर मुक्तता करण्यात आली. सदर घटना शनिवार 4 रोजी मुख्यमंत्र्याच्या शिरोडा मतदारसंघ दौऱयाच्या समारोपाच्या शिरोडा पंचायतसमोरील बैठकीत घडली होती.

मुख्यमंत्र्याच्या बैठकीत प्रश्न विचारल्याप्रकरणी सात आरजीच्या युवकांना फोंडा पोलिसांनी शनिवारी अटक केली होती. सचिन गावडे (बोरी), राहूल नाईक (बोरी), निकी आलेमांव (शिरोडा), शैलेश नाईक (शिरोडा), प्रज्योत गावकर (बेतोडा), योगेश नाईक (शिरोडा), ऐलियोट गुदिन्हो (शिरोडा) अशी त्यांची नावे आहेत. सातही संशयितांना भा.दं.सं. 143, 147, 149 186, 353, 509 कलमाखाली गुन्हा नोंदवून अटक  करण्यता आली होती.

जामिन अर्ज सादर करण्यास विलंब झाल्यामुळेच कोठडीची हवा

संशयितांना रविवारी सकाळी फेंडा येथील जेएमएफसी न्यायालयात हजर केल्यानंतर 14 दिवसांच्या रिमांडवर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. आरजीतर्फे जामीन अर्ज सादर करण्यास विलंब झाल्याने त्या सातही जणांना कोलवाळे तुरूंगाची हवा खावी लागली. मुख्यमंत्र्यांचा नागरिकांशी संवाद करण्याहेतूने आयोजित बैठकीत प्रश्न विचारल्याप्रकरणी सात युवकांना चतुर्थीपर्यंत तुरूंगावास भोगण्याची वेळ आली होती, मात्र न्यायलयाने जामिन मंजूर केल्याने त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. त्यामुळे काही कार्यकर्त्यानी गणपती बाप्पा आमच्यासमवेत असून अखेर सत्याचा विजय झाल्याची प्रतिक्रीया दिली. त्यानंतर आरजीच्या समर्थकांनी कोलवाळे जेल येथे मोर्चा वळविला व सातही जणांचे जंगी स्वागत केले. त्यानंतर पोलीस स्थानकमार्गे बोरी-फोंडा येथून शिरोडापर्यत ढोल ताश्याच्या गजरात रॅली काढून जल्लोष केला.

   रात्री अडीच वाजेपर्यत मुलांच्या जेवणाची काळजी करणारी माता

याप्रकरणी शैलेश नाईक यांच्या आईने फोंडा पोलीस स्थानकावर रात्री अडीच वाजेपर्यंत आपल्या मुलाच्या जेवणासंबंधी काळजी करीत होती. आपल्या मुलाने चोरी, खून केलेला नसून सामान्य जनतेला भेडसावणारे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. त्याचा काय दोष ? असा टाहो ती फोडत होती. मतदारांची गाऱहाणी ऐकून घेण्याचे धाडस नसल्यास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जनसंपर्क यात्रा, बैठका शिरोडा मतदारसंघात घेऊ नये असे ठणकावले आहे. मतदारांना आपल्याच मतदारसंघात प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य नसल्याचे या कृतीतून दिसून येत आहे, प्रथम आक्रोष करणाऱया जनतेचा प्रश्न ऐकून घेण्याची मानसिकता मुख्यमंत्र्यांनी आत्मसात करावी, असा सल्ला शैलेश नाईक यांच्या आईने सरकारला दिला आहे.

खून, चोऱयामाऱया करणारे बिनधास्त, प्रश्न विचारणारे अटकेत

आरजी सहकाऱयांना विनाकारण अटक केल्याचा आरोप आरजी संस्थापक मनोज परब यांनी केला आहे. ते शनिवारी रात्रभर आपल्या इतर सहकाऱयासमवेत फोंडा पोलीस स्थानकावर हजर होते. त्यांनी सरकारच्या या कृतीचा निषेध केलेला आहे. आरजी अहिंसावादी आहे. शिरोडय़ात आरजीची ताकद वाढत असल्यामुळे मुख्यमंत्री व विद्यमान आमदार शिरोडकर यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यामुळेच आरजीच्या कार्यकर्त्याना पोलिसांच्या आदेशानुसार सतावण्याचा प्रकार सुरू आहे. जे कृत्य आरजीच्या कार्यकर्त्याने केलेच  नाही ती कलमे पोलीसांनी लावून सतावणूक चालविलेली आहे. यासंबंधी पुरावे असल्यास ते न्यायालयात सादर करावे असे आव्हनही आरजीच्या कार्यकर्त्याने केले आहे. खून, चोऱयामाऱया, अपहरण करणारे बिनधास्त फिरत असून त्यांना फक्त नावापुरती चार ते पाच दिवसाचा तुरूंगवास, आणि आरजी कार्यकर्त्यावेळी मात्र त्यांना सरळ चौदा दिवसांचा तुरूंगावास सुनावण्यात आल्याचे आश्चर्य व्यक्त केले.

   निवडणूक विजयोत्सवापुर्वीच विजयी मिरवणूकीचे भाग्य

  शिरोडय़ात आरजी संभाव्य उमेदवार म्हणून शैलेश नाईक या उच्चशिक्षीत युवकाकडे पाहिले जाते. भाजपवाल्यांना याचा सुगावा लागल्यामुळेच त्याला अडकविण्याचा प्रयत्न दिवसेंदिवस होत आहे. मात्र शैलेश व इतरांच्या अटकेच्या या घडामोडीमुळे वेगळेच वळण मिळाले आहे. सातही जणांचा कोलवाळे तुरूंगातून मुक्तता झाल्यानंतर बोरी येथून एखाद्या विजयी मिरवणूकीप्रमाणे जल्लोष करण्यात आला. त्यामुळे निवडणूकीपुर्वीच आराजीने अर्धी लढाई जिंकल्याची सहानुभुती या युवकांना शिरोडय़ाच्या मिळू लागल्याची चिन्हे दिसत आहे.

Related Stories

मडगाव पालिका क्षेत्रात पाच वर्षांत विविध विकासकामे मार्गी

Patil_p

गिनियाचा स्ट्रायकर सिकोवू सिल्ला चर्चिल ब्रदर्स संघात सामिल

Amit Kulkarni

कंत्राट नकोच, कायमस्वरुपी नोकरी द्या !

Patil_p

वागातोरात छपराला आग लागून रेस्टॉरंटचे नुकसान

Patil_p

परतीच्या पावसाचा गोव्याला दणका

Patil_p

स्पेनचे झेवियर एफसी गोवाचे स्ट्रँग्थ आणि कंडीशनिंग प्रशिक्षक

Omkar B
error: Content is protected !!