तरुण भारत

टी-20 वर्ल्डकपसाठी संजू सॅमसन-इशान यांच्यात चुरस

अतिरिक्त फिरकीपटूसाठी वरुण चक्रवर्ती व राहुल चहर यांच्यामध्ये शर्यत अपेक्षित, संघनिवड लवकरच

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

पुढील महिन्यात खेळवल्या जाणाऱया आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी लवकरच भारतीय संघनिवड होणार असून गूढ फिरकीपटू वरुण चक्रवर्ती व जलद लेगब्रेक टाकू शकणारा राहुल चहर यांच्यात अतिरिक्त फिरकीपटूच्या निवडीसाठी चुरस असू शकेल. यष्टीरक्षक म्हणून संजू सॅमसन व इशान किशन यांच्यात जुगलबंदी असेल. चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीची मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात लवकरच बैठक होणार असून कर्णधार विराट कोहली मँचेस्टरमधून तर प्रशिक्षक रवी शास्त्री लंडनमधून व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे यात सहभागी होणार आहेत.

या महत्त्वाच्या निवड समिती बैठकीसाठी बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली व सचिव जय शाह (निवड समिती समन्वयक) हे देखील उपस्थित असतील, अशी अपेक्षा आहे. आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी बहुतांशी व्यवस्थापने 15 सदस्यीय संघ जाहीर करत आहेत. बीसीसीआय 18 ते 20 सदस्यांचा संघ निवडेल, अशी अपेक्षा आहे. कोव्हिड-19 मुळे अनेक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर, आयसीसीने सर्वच संघांना कमाल 30 सदस्यांचा संघ निवडण्याची मुभा दिली आहे. एरवी 23 सदस्य निवडले जातात आणि यात सपोर्ट स्टाफला देखील मोजले जाते.

उर्वरित जागांसाठी चुरस

एखादा संघ आवश्यकतेनुसार, 30 पेक्षा अधिक सदस्यांचे पथकही निवडू शकतो. पण, अशा परिस्थितीत अतिरिक्त खर्च त्या मंडळाला उचलावा लागतो. मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी भारताचे 13 ते 15 खेळाडू आपसूक निवडले जातात. मात्र, उर्वरित जागांसाठी बरीच स्पर्धा आहे आणि त्यासाठी सविस्तर चर्चा झडू शकते.

तूर्तास, मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी यजुवेंद्र चहल व रविंद्र जडेजा यांचे स्थान जवळपास निश्चित असेल. मात्र, अतिरिक्त फिरकीपटू या नात्याने वरुण चक्रवर्ती व राहुल चहर यांचा विचार होऊ शकेल. रिषभ पंत व केएल राहुल यष्टीरक्षणाची धुरा उत्तमरित्या हाताळू शकतात. राखीव यष्टीरक्षक म्हणून इशान किशन व संजू सॅमसन यांचा विचार होऊ शकतो. हार्दिक पंडय़ा 4 षटकांचा कोटा पूर्ण करत नसल्याने शार्दुल ठाकुरकडून फलंदाजीतही भरीव योगदानाची अपेक्षा असू शकते. सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर यांचे स्थान निश्चित मानले जाते.

पृथ्वी शॉला संधी मिळणार का?

सलामीसाठी रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवनचे पर्याय असतील. शिवाय, बहरातील पृथ्वी शॉ संघाचे दरवाजे ठोठावत असणार आहे. 20 सदस्यांचा संघ निवडला गेल्यास धवन, शॉचे स्थानही जवळपास निश्चित असेल.

जलद गोलंदाजीत बुमराह, भुवनेश्वर व तंदुरुस्त असल्यास शमी मुख्य आधारस्तंभ असू शकतात. दीपक चहर व सिराजही या शर्यतीत असतील. वॉशिंग्टन सुंदर आयपीएलमधून बाहेर फेकला गेला आहे. त्यामुळे, वर्ल्डकपसाठी निवडले गेले तर मॅच प्रॅक्टिसशिवाय, त्याला मैदानात उतरणे भाग असणार आहे. डावखुऱया पेसर्समध्ये चेतन साकरिया, टी. नटराजनचा विचार होऊ शकतो.

संभाव्य संघ

जवळपास निश्चित खेळाडू (14) ः विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, भुवनेश्वर कुमार, जसप्रित बुमराह, रविंद्र जडेजा, यजुवेंद्र चहल, दीपक चहर, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकुर.

जादा सलामीवीर ः शिखर धवन / पृथ्वी शॉ

राखीव यष्टीरक्षक ः इशान किशन / संजू सॅमसन

जादा फिरकीपटू ः वरुण चक्रवर्ती / राहुल चहर

डावखुरा पेसर ः चेतन साकरिया / टी. नटराजन

जडेजासाठी राखीव खेळाडू ः अक्षर पटेल / कृणाल पंडय़ा

तंदुरुस्तीवर अवलंबून ः वॉशिंग्टन सुंदर.

Related Stories

गांगुलीकडून दहा हजार लोकांच्या जेवणाची सोय

Patil_p

न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाच्या सुरक्षेत वाढ

Patil_p

फुटबॉलपटू झेव्हीला कोरोनाची लागण

Patil_p

नदाल, हॅलेपची आगेकूच, प्लिस्कोव्हा पराभूत

Patil_p

पंजाबविरुद्ध वर्चस्व गाजवण्याचे दिल्लीचे इरादे

Patil_p

कोरोनाला हरवले, सुवर्णही जिंकले!

Patil_p
error: Content is protected !!