तरुण भारत

जिह्यात पुन्हा पावसाचा तडाखा

चिपळूण,दापोलीतरस्त्यांवरपाणी

रत्नागिरी/ प्रतिनिधी

Advertisements

जुलैमधील महाप्रलयाच्या खुणा धुसर होण्याआधीच वरुणरराजाने जिह्यात पुन्हा जोरदार बरसात सुरु केल्याने काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. सलग दोन दिवस पावसाने चिपळूण, गुहागर, दापोली, संगमेश्वर तालुक्यात जोरदार दणका दिला. मात्र मंगळवारी पावसाचा जोर ओसरल्याने भितीचे वातावरण निवळले आहे.  गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेला असताना व मोठय़ा संख्येने चाकरमानी जिह्यात डेरेदाखल होत असताना अनेकांचा या पावसाने खेळखंडोबा केला आहे. मंगळवारी रात्रीपर्यंत जिह्यात सर्वत्र संततधार सुरुच होती.

   सोमवार व मंगळवारी कोसळलेल्या जोरदार पर्जन्यसरींमुळे चिपळुणात काही भागात पाणी शिरले होते. जुलैमधील पुराच्या अनुभवामुळे प्रशासनासह नागरिकही अधिक सतर्क होते. मात्र पावसाने वेळीच उसंत घेतल्याने सद्यस्थितीत पुराचा धोका टळला आहे. चिपळूणमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफचे पथकही सज्ज ठेवण्यात आले आहे. गुहागरात आरे, पालशेत, आबलोली मार्गावर पुलावरून पाणी गेल्याने येथील वाहतूक ठप्प झाली होती. नवानगर-धोपावे  मार्गावर पुन्हा दरड कोसळल्याने वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. गुहागर, शृगारतळी, आरे येथे काही घरातही पाणी शिरण्याच्या घटना घडल्या.

  या पावसात प्रथमच दापोलीत मारूती मंदिर, बाजारपेठ, डॉ. आंबेडकर चौक भागात मोठय़ा प्रमाणात पाणी आल्याने आश्चर्यासह भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आसूदबाग येथे पुन्हा दरड कोसळून घरांना धोका वाढला आहे. जालगाव येथील 25 ते 30 घरे व दुकानांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. बुरोंडी येथे 5 घरांत पाणी शिरून 16 लाख 5 हजार रूपयांचे नुकसान झाले.

 खेड व मंडणगड तालुक्यातलाही या पावसाने झोडपून काढले आहे. जिह्यात काही ठिकाणी पडवी, बांध पडण्याच्या घटनांची नोद झाली आहे. मात्र मोठय़ा नुकसान अथवा जिवितहानीची नोंद झालेली नाही. प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपत्ती विभागही सज्ज ठेवण्यात आला आहे.    संगमेश्वर तालुक्यात नदीकाठच्या रामपेठ, फुणगुस, कसबा भागात काही बाजारपेठा व घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. नजीकच्या अनुभवाने सावध असलेल्या व्यापाऱयांनी आपला माल आधीच सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवल्याने फारशी हानी झालेली नाही.

   लांजा व रत्नागिरी तालुक्यातील जनजीवनही जोरदार पावसामुळे प्रभावित झाले आहे. राजापुरात अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने काळजीचे वातावरण तयार झाले होते. मात्र दोन्ही नद्यांनी मंगळवारी सायंकाळपर्यंत धोक्याची पातळी ओलांडली नव्हती. दक्षिण भागात पडझडीचे किरकोळ प्रकार वगळता मोठय़ा हानिची नोंद झालेली नाही.

  जिल्हाभर गेल्या दोन दिवसात अभावानेच सूर्यदर्शन झाले आहे. हवामानातील गारवाही वाढला आहे. सर्वत्र काळ्या नभांची गर्दी दिसत आहे. यामुळे विशेषत्वाने गणेशोत्सवाची पूर्वतयारी अडचणीत आल्याने ग्राहकांसह व्यापाऱयांचीही निराशा झाली आहे. पाऊस आरखी काही काळ असाच सुरु राहिल्यास भातशेतीवरही त्याचा विपरित परिणाम होण्याची भिती व्यक्त होत आहे.

Related Stories

दापोली नगर पंचायतीचा देशात व्दितीय क्रमांक

Patil_p

अभियंता असलेल्या कलाकाराने बांबूपासून बनवल्या शोभिवंत वस्तू !

Patil_p

सेल्फी काढताना पर्यटक पती, पत्नीचा हेदवी येथील बामणघळीत पडून मृत्यू

Abhijeet Shinde

रत्नागिरी जिल्ह्यात 1,24000 हून अधिक नागरिकांची तपासणी

Abhijeet Shinde

वरवडे भंडारवाडीत बेकायदेशीर रस्त्यांसाठी कांदळवनाची तोड

Amit Kulkarni

नगरपंचायत निवडणुकीसाठीचे ३६ अर्ज वैध तर ४ अवैध

Ganeshprasad Gogate
error: Content is protected !!