तरुण भारत

‘चवथ’ – गोव्याचा आगळा-वेगळा गणेशोत्सव

‘चवथ’ म्हणजे गणेशचतुर्थी हा गोव्याचा सर्वांत मोठा उत्सव. चौसष्ट कलांचा  अधिपती, छंदपती, गंधपती श्रीगणेश उद्यापासून पृथ्वीतलावर अवतरणार आहे. चला त्याचे स्वागत करुया, पुजन करुया, त्याच्या कृपेला पात्र होऊया.

कोणत्याही शुभकार्याचा प्रारंभ करण्यापूर्वी ज्या गणेशाची पूजा केली जाते त्या खुद्द श्रीगणेशाचा पावन जन्मोत्सव म्हणजेच गणेशचतुर्थीच्या मंगलमय पर्वाचा प्रारंभ उद्या भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला होत आहे. गोव्यातील हा सर्वांत मोठा उत्सव अत्यंत मंगलमय वातावरणात निर्विघ्नपणे पार पाडावा, सर्वांवर श्रीगणेशाची कृपा व्हावी. सर्वांना सुख, समृद्धी, वैभव प्राप्त व्हावे, यासाठी चला सारेजण मिळुनी श्रीगणेशाला पुजुया. त्याच्या चरणी लीन होऊया. अनंत चतुर्दशीपर्यंत चालणारी ही पर्वणी सर्वांसाठीच चैतन्यदायी ठरेल, यात कोणताच संदेह नाही. श्रीगणेशाची मनोभावे केलेली आराधना कधीच व्यर्थ जात नाही, ही आजवर संपूर्ण जगाची अनुभूती आहे.

Advertisements

 चौसष्ट कलांचा अधिपती

गणेशाला कुणीही निस्वार्थपणे, भक्तीभावाने भजल्यास तो त्या व्यक्तीवर कृपा करतोच. तो कुणाला निराश करत नाहीच. अवघ्या जीवमात्रांमध्ये सुखाचे व दुःखाचे संतुलन घडवून आणतो तो गणेशच! माणसाच्या जीवनामध्ये सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख हे असतेच. जीवनाचा हा भवसागर पार करण्यासाठी सर्वांच्या मदतीला पावतो तो हा मंगलमूर्ती मोरयाच! घरातील लहान, थोर सर्वच मंडळीला प्रिय असणारे दैवत म्हणजे सर्वांचा गणपती बाप्पा! तब्बल एक हजार एकशे एकवीस नावे धारण केलेल्या श्रीगणेशाला सिद्धिविनायक, गजानन, गणराय, वक्रतुंड नावांनी अधिक ओळखले झाले. मुलांमध्ये तर तो बाप्पा म्हणूनच अधिक प्रिय. मुलांना लंबोदर या नावामध्ये खूप नवल, कुतुहल वाटते. सुखकर्ता, दुःखहर्ता या दोन्ही नावांचे सर्वांना सुखाच्या, आनंदाच्या अणि दुःखाच्या क्षणीही स्मरण होतेच होते. असा हा चौसष्ट कलांचा अधिपती, छंदपती, गंधपती उद्यापासून पृथ्वीतलावर अवतरणार आहे. चला त्याचे स्वागत करुया, पुजन करुया, त्याच्या कृपेला पात्र होऊया.

तिसऱया शतकापासूनची परंपरा

गोव्यात साधारणपणे तिसऱया शतकापासून मातीच्या किंवा चिकणमातीच्या गणेशपूजनाची परंपरा असल्याच्या खाणाखुणा प्राचीन इतिहासात आढळतात. शेतीचे रक्षण करण्यासाठी शेतकऱयांनी, कष्टकऱयांनी, भूमिपुत्रांनी सुरु केलेली ही परंपरा नंतर घरोघरी पोहोचली. गोवा सुरुवातीपासून हिंदु प्रदेश. राजा आणि प्रजेसाठीही देवभूमी… पुण्यभूमी! जागतिक धर्मपीठे, तिर्थस्थाने येथे होती. मात्र नवव्या शतकापासून गोव्याच्या आध्यात्मिक वैभवाचा विध्वंस करण्याचा प्रयत्न मुसलमान आक्रमकांनी केला. पुढे 1510 मध्ये एका हाती क्रॉस व दुसऱया हाती तलवार घेऊन आलेल्या पोर्तुगीजांनी संपूर्णतः विध्वंस करण्याचा सपाटाच लावला. तरीही देव, देश अन् धर्मप्रीय गोमंतकीयांनी त्यांच्याशी मोठा संघर्ष करुन दैवते, संस्कृतीचे रक्षण केले. ट्रंकेच्या, पेटुलाच्या झाकणाच्या आतील बाजूस गणेशाचे चित्र लावून त्याची पूजा भक्तीभावाने केली. पोर्तुगीजांशी लढताना हजारो गोमंतकीयांनी प्राणांचे बलिदान दिले. 19 डिसेंबर 1961 म्हणजे 450 वर्षांनंतर गोवा पोर्तुगीजांच्या धर्मांध, जुलमी जोखडातून मुक्त झाला. खुल्या वातावरणात सर्व देवतांच्या मंदिरांची पुनर्स्थापना झाली. पुण्यभूमी, देवभूमी गोमंतकाला पुन्हा समृद्धी आली. गणेशोत्सवासह सर्व उत्सव, सण परंपरेप्रमाणे साजरे केले जाऊ लागले.

गोव्यातील 95 टक्के हिंदु घरांमध्ये गणेशोत्सव साजरा केला जातोच, त्याचबरोबर अनेक ख्रिश्चन धर्मीयांच्याही घरात गणेशाची स्थापना करुन दीड, पाच, सात, नऊ, अकरा दिवस मनोभावे उत्सव साजरा केला जातो. गोव्यात या उत्सवाची जी वैशिष्टय़े आहेत, ती देशात अन्य कुठे दिसत नाहीत, अपवाद केवळ कोकणचा! गोवा, कोकणच्या गणेशोत्सवात बरेच साम्य आहे. गणपती पुजनाबरोबरच गौरी-महादेव पुजनही होते. गणपतीच्या डोक्यावर बांधली जाणारी वैशिष्टय़पूर्ण ‘माटोळी’ एक नैसर्गिक आकर्षण असते. पाने, फुले, फळे, वेली, तृण असा अवघा निसर्ग माटोळीत सामावलेला असतो. श्रीगणेश ही निसर्गाची देवता असल्याने माटोळीद्वारे त्यानेच निर्मिलेला निसर्ग त्याला अर्पण करुन त्याच्या कृपेस पात्र होण्याचा हा प्रयत्न, अशी पारंपरिक भावना आहे. घुमटांवरील आरत्यांबरोबरच तबला-पेटीसह साग्रसंगीतपणे म्हटल्या जाणाऱया श्रीगणपती, श्रीगौरी, श्रीमहादेव, श्री दत्तात्रय, श्रीपांडुरंगाच्या आरत्या चैतन्यदायी असतात. महाप्रसादामध्ये नेवऱया, पातोळय़ा, पाच खाजे, पायस, अळवाची भाजी, अन्य स्थानिक भाज्यांचे पदार्थही गोव्याच्या या चवथीचे वैशिष्टय़ जपून आहेत. दुपारी, संध्याकाळी गावातील सर्वांनी जमून घरोघरी जाऊन केलेल्या आरत्या म्हणजे बालगोपाळांसह ज्येष्ठांच्या आनंदाला पारावार राहिलेला नसतो. गणपतीच्या समोर फुगडय़ा, भजन नंतर विसर्जनाच्यावेळी भजन, फुगडय़ा, दिंडी हे सारे मंगलमय वातावरण अन्य कुठे पहायला मिळत नाही.

कौटुंबिक चतुर्थीबरोबरच गोव्यातील सार्वजनिक गणेशोत्सवही वेगळेपण जपून आहे. महाराष्ट्र, कर्नाटकातील सार्वजनिक गणेशोत्सवात मोठमोठय़ा गणेशमूतीं आणि अतिभव्य देखाव्यांना प्राधान्य दिले जाते, तर गोव्यातील सार्वजनिक गणेशोत्सव गणेशमूर्ती पाच-सात फुटांचीच असते, देखावेही लहानच असतात पण सामाजिक प्रबोधन, राष्ट्रभक्ती, लोकसंस्कृतीचे कार्यक्रम, वैशिष्ठय़पूर्ण योगदान देणाऱयांचे-गुणवंतांचे सन्मान, शैक्षणिक शिष्यवृत्त्यांचे वितरण, ज्येष्ठांना मदतीच्या साधनांचे वितरण अशा पायाभूत उपक्रमांवर भर दिला जातो. शंभराहून अधिक सार्वजनिक गणपती आहेत.

बहुतेक मूर्तीचे विसर्जन अनंत चतुर्दशीला मोठय़ा उत्साहात केले जाते. कौटुंबिक असो वा सार्वजनिक गोव्यातील गणेशोत्सव हा देशभरात स्वतःचे वैशिष्टय़ जपूनच आहे. गेल्या पंचवीस-तीस वर्षांत याचा आनंद घेण्यासाठी देशी तसेच विदेशी पर्यटकही मोठय़ा प्रमाणात येतात. खरंच एकदा तरी अनुभवावा, असाच हा गोव्याचा आगळा-वेगळा गणेशोत्सव!

राजू भिकारो नाईक

Related Stories

महागाईचा चटका

Patil_p

नवी कहाणी

Patil_p

मुलांच्या भवितव्याशी खेळ

Patil_p

तिसऱया लाटेसाठी सतर्कता हवीच

Patil_p

बिहारमधील निवडणुकीत चमत्कार होणार काय?

Patil_p

साधुलक्षणे-साम्यदृष्टी आणि परोपकार

Patil_p
error: Content is protected !!