तरुण भारत

खाद्यतेलाची आनंदवार्ता

रणरणत्या उन्हात घामाच्या धारा आणि तहान लहान होत असताना एखादी वाऱयाची हळूवार झुळूक यावी किंवा माठातील थंड पाण्याचा ग्लास समोर यावा, तसे वृत्त आले आहे. खाद्य तेलाच्या किंमती कमी होणार, असे सांगितले जाते आहे. शासनाने त्यासाठी पावले टाकली आहेत. आयात शुल्कात सुमारे दहा टक्के कपात केली आहे.  गणेशोत्सव, दसरा, दिवाळी या पार्श्वभूमिवर ही वार्ता आल्याने विशेष आनंद आहे. तेल मग ते इंधन म्हणजे पेट्रोल, डिझेल असो किंवा खाद्य म्हणजे शेंग, सोया, करडी, पाम असो अथवा औद्योगिक वापराचे क्रूड तेल असो गेल्या काही वर्षात रोज त्यांचे दर उंचावत आहेत आणि तेलाचे दर वाढले की, महागाई भडकते. महाविद्यालयीन मुले आणि घराबाहेर बराचकाळ थांबावे लागणारे नागरिक यांना वडापावची साथ असते. पण, महागलेले खाद्य तेल म्हणजे 70 ते 80 रु. किलोचे, सरकी तेल 160 ते 180 रु. किलो झाले व सर्वसामान्यांचे किचन अडचणीत आले. चढे दर पाहता व्यावसायिकांनी अनेक गंमती केल्या आहेत. मार्केटचा जमाना आहे. बिस्कीट कंपन्यांनी बिस्कीट आकार व वजन कमी करून दर कायम ठेवले. त्याप्रमाणे आता वडा-भजीचा आकारही आकसत गेला आहे. काहींनी दर वाढवले तर काहींना आकार छोटा केला. महागलेले तेल, पेट्रोल, डिझेल म्हणजे महागाईचे स्वार असतात. इंधन व खाद्यतेल महागले तर त्यांचा रिक्षा दरापासून पालेभाज्यापर्यंत आणि राईस प्लेटपासून सर्वच गोष्टींवर परिणाम होत असतो. लहान-मोठय़ा सर्वच गोष्टी महाग होतात. वाढलेले इंधन दर, गॅसचे दर, खाद्य तेल या विरोधात देशात लहान-मोठी आंदोलने झाली. महिलांनी रस्त्यावर चुली पेटवून भाकऱया थापल्या व तेल न घालता चटणी-भाकरी आंदोलन केले. हा सारा महागाईचा उद्रेक होता व आहे. कोरोनाचा कहर, लॉकडाऊन, स्थलांतर, नोकरीवर गंडांतर, धंदे-व्यवसाय अडचणीत आलेले, असे अवघड आयुष्य आणि कोरोनाचे बळी, कोरोनाची दहशत, कोरोना उपचारासाठीचा खर्च यामुळे जनसामान्यांचा खिसा अडचणीत आलेला, अनेकांनी शहरातील घरे विकून, कर्ज भागवून पुन्हा गावी जाणे पसंत केले. जगभर मंदीची लाट आहे. रोजगार ठप्प आहेत. अशावेळी जी जीवघेणी महागाई वाढत आहे तिच्या मुळावर घाव घालायचा तर इंधन व खाद्य तेल स्वस्त केले पाहिजे आणि घरबांधणी, कृषी सुधारणा, पायाभूत सुविधा यांना चालना देऊन मंदीवर मात केली पाहिजे. दुर्दैवाने हे प्रयत्न होताना दिसत नव्हते. या पार्श्वभूमिवर सर्व बाजूंनी चटके, तडाखे बसत असताना खाद्यतेलाचे दर कमी होणार हे हळूवार आलेली झुळूक समाधान देणारी ठरली आहे. अर्थात 70 रु. किलो असणारे सरकी किंवा सूर्यफूल तेल पुन्हा त्या दरावर येणार नाही. पण, 160 रु.चे हे तेल 150 रु. होण्याची शक्यता आहे. पण, यामुळे महागाईची दिशा बदलायला सुरुवात झाली, हा आनंद आहे. भजी-वडय़ाच्या टपऱया आणि फरसाण वगैरे विकणारी दुकाने या 10 रु.च्या स्वस्ताईचा फायदा लगेच ग्राहकांना देतील, अशी सुतराम शक्यता नाही. कारण त्यांचीही कंबर बसली आहे. महागाई कमी करण्यासाठी आणि अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी जालीम उपाय आणि निर्धाराने पावले टाकली पाहिजेत. कोरोनानंतरचे जग साधे-सोपे नाही. आगामी काळ हा जसा अडचणीचा आहे, तसा तो संधीचा असणार आहे. वैयक्तिक जीवनात आणि देश म्हणून आम्ही कसे वागतो, निर्णय घेतो, पावले टाकतो याला विशेष महत्त्व आहे. कोरोना महामारीत जागतिक मंदी व महागाई या समस्येकडे अधिक जबाबदाराने आणि एकसंधपणे बघितले पाहिजे. राजकारण आणि मतपेटय़ांचा संकुचित स्वार्थ या पलीकडे जाऊन या प्रश्नांवर विचार, तोडगा व अंमल हवा. खाद्यतेल स्वस्त होणार या एका वार्तेने सोयाबिनचे दर क्विंटलला शंभर रु.नी कोसळलेले आहेत. बळीराजाचा मुळात फाटका असलेला खिसा कापून तेल 5-10 रु. स्वस्त होणार असेल तर भडका उडण्याचीच शक्यता आहे. केंद्राने आयात खाद्यतेलावरील कर कमी केला आहे. पूर्वी 10 टक्के आयात कर होता. आता तो अडीच टक्के करण्यात आला आहे. पायाभूत आयात करात कपात केल्याने सूर्यफूल, पाम, सोयाबिन तेलावरील एकूण कर 35.75 टक्क्यावरुन 24.75 टक्के इतका झाला आहे. सुमारे 11 टक्के कपात झाली आहे. राज्य व केंद्र शासन शेतकऱयांना ऊस नव्हे तेल बिया व डाळी लावा असे सातत्याने सांगते आहे. तेलबियांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात झाले तर खाद्यतेलाची आयात मंदावेल आणि विदेशी चलन वाचेल. पण, शेतकरी विशेषतः महाराष्ट्रातील नदीकाठचा शेतकरी ऊस, कापूस या नगदी पिकामागेच आहे. परिणामी खाद्य तेलासाठी भारत परावलंबी आहे. खाद्यतेल आयात करणारा जगातला सर्वात मोठा देश म्हणून भारताची ओळख आहे. आवश्यकतेच्या दोन तृतीयांश खाद्यतेल आपण आयात करतो. हे परावलंबित्व थांबवायचे तर शासन व शेतकरी यांनी हातात-हात घालून काम केले पाहिजे. एकाचा खिसा मारून दुसऱयाचा फायदा हा धंदा बंद केला पाहिजे. सोयाबिनला कोरोना महामारीच्या पार्श्वभूमिवर मोठी मागणी आहे. अतिवृष्टी, महापूर यामुळे सोयाबिन तेलबियाचे पीक कमी आहे. अमेरिका-चीनकडून सोयाबिनला मागणी आहे. ओघानेच यंदाही दर वाढणार आहेत. कृषी क्षेत्रात मूलभूत नेमके व उद्दिष्ट ठेवून परिणामकारक काम केले तर भारत तेलबिया व डाळी या संदर्भात स्वयंपूर्ण होऊ शकतो, चांगले अधिक उत्पादनाचे वाण, हवामानाचे नेमके अंदाज, आधारभूत किंमती आणि संशोधन व अंमलबजावणी हे काम चांगले झाले, कृषीसाठी पतपुरवठा झाला तर भारत खाद्यतेल, डाळी याबाबतीत स्वयंपूर्ण होईल. विदेशी चलन वाचेल आणि ग्राहक, शेतकरी आणि व्यापारी यांचाही फायदा होईल.

Related Stories

गुजरातमध्ये 24 नव्या मंत्र्यांचा शपथविधी

datta jadhav

आता इंडिया गेटवर नाही, तर ‘या’ ठिकाणी प्रज्ज्वलित होणार अमर जवान ज्योती

Abhijeet Shinde

…तर मोदी सरकार तुम्हाला देईल पाच हजारांचे बक्षीस

datta jadhav

11 पाकिस्तानी शरणार्थींचा जोधपूरमध्ये संशयास्पद मृत्यू

Patil_p

अरविंद केजरीवाल यांची भेट घेतल्यानंतर सोनू सूद म्हणाला ….

Abhijeet Shinde

भूसुरुंग स्फोटात 2 जवान शहीद, 3 जखमी

datta jadhav
error: Content is protected !!