तरुण भारत

उत्तर प्रदेशच्या रणभूमीवर

देशाच्या राजकारणावर प्रभाव पाडणाऱया उत्तर प्रदेशच्या निवडणुका अवघ्या सहा-सात महिन्यात होणार आहेत. त्यादृष्टीने सर्व प्रमुख पक्षांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. उत्तर प्रदेशात वर्चस्व निर्माण केले की देशात हवा होते, हे माहीत असल्याने सर्वच राजकीय पक्ष त्या भूमीला महत्त्व देत असतात. सध्याच्या सत्ताधारी भाजपनेही विविध जाती घटकांची जोडतोड करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केला आहे. अपेक्षेप्रमाणे यावेळीही मोदी हेच निवडणुकीचा चेहरा असतील असे सांगितले जात आहे. मात्र मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा सूर वेगळा आहे. याशिवाय इतर नेत्यांची नावेही नेतृत्वाच्या चर्चेत आहेत. राज्यपाल मौर्य यांनी पदाचा त्याग करणे हा उत्तर प्रदेशाच्या रणनीतीचा एक भाग आहे. वाराणसीतील सरकारी दवाखान्यात कोरोनाबाबतच्या सुविधा न मिळाल्याने पंतप्रधानांच्या मतदार संघात मुख्यमंत्र्यांकडून दिरंगाई केली जात असल्याची चर्चा सुरू झाली असून त्यामुळे राजकीय वातावरण गरम आहे. असे विसंवादी सूर असले तरी भारतीय जनता पक्षाची आजपर्यंतची ख्याती लक्षात घेता ऐन निवडणुकीच्या वेळी नेत्यांतील मतभेद दूर करून एकत्रितरीत्या निवडणुकीला सामोरे जाण्यास भाग पाडले जाते. या आतापर्यंतच्या इतिहासाला उत्तर प्रदेशात मोडता घातला जाईल अशी चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी 2022 ची विधानसभा निवडणूक त्यामुळेच भाजप महत्त्वाची मानून चाललेली आहे. सत्तेचा दुसरा प्रबळ दावेदार समाजवादी पक्ष यावेळी काँग्रेस सोडून इतर छोटय़ा राजकीय पक्षांना घेऊन आपली मतांची टक्केवारी वाढवण्याच्या नादाला लागला आहे. मायावती यांनी आपले यापूर्वी यशस्वी झालेले सोशल इंजिनिअरिंगचे प्रयोग यावेळीही चालतील का याची चाचपणी नव्या पध्दतीने सुरू केली आहे. शिवसेनेने भाजपला धडा शिकवण्यासाठी आधी सर्व जागा लढवण्याची आणि नंतर 100 जागा लढण्याची घोषणा केली आहे. संधीच्या शोधात हैदराबादहून ओवेसीही उत्तरप्रदेशात फेरा करून गेले आहेत. एकेकाळी ज्या पक्षाचे या राज्यावर प्राबल्य होते त्या काँग्रेसने पुन्हा एकदा आपल्या मतदारांना साद घालता येते का, याची चाचपणी सुरू केली आहे. राष्ट्रीय राजकारणात भाजपचा काँग्रेस होत आहे असा आरोप पाच राज्यातील मुख्यमंत्री बदलानंतर होऊ लागले आहेत. त्याचवेळी राहुल आणि प्रियांका गांधी यांनी उत्तर भारतातही मंदिर भेटीला सुरुवात केली आहे. राहुल गांधी सध्या वैष्णोदेवीच्या मंदिरात दर्शनाला गेले आहेत तर प्रियांका गांधी या रायबरेलीतील हनुमान मंदिरात. लोकसभेला जानवे दाखवणाऱया राहूलनी नुकतेच आपण काश्मिरी पंडित असल्याचाही दावा केला आहे. पण प्रियांका दोनच दिवसांपूर्वी लखनऊ येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत सामील झाल्या. यानिमित्ताने गोविंद वल्लभ पंत यांच्या स्मृती त्यानी जागवल्या. यादरम्यान पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष सलमान खुर्शीद यांनी पत्रकारांशी बोलताना प्रियांका गांधी याच आमच्या 2022 सालच्या निवडणुकीचा चेहरा असतील आणि तशी घोषणा कधीही होऊ शकेल अशी शक्मयता वर्तवली आहे. लोकसभा निवडणुकी दरम्यान निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी गांधी परिवाराला संपूर्ण देशात एक दीर्घ यात्रा काढण्याचा सल्ला दिला होता. मात्र काँग्रेसने त्यांचा तो सल्ला मानला नाही आणि यात्रा मध्येच बारगळली आणि पक्षाला जोराचा झटका बसला. आता मात्र उत्तर प्रदेशात प्रियंका गांधी आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांनी काँग्रेस प्रतिज्ञा यात्रा काढण्याचा निर्धार केला आहे. शहर आणि ग्रामीण भागात घराघरात जाऊन 12 हजार किलोमीटर अंतर ही यात्रा कापेल अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे. 2017 साली काँग्रेसने अवघ्या 7 जागा मिळवल्या होत्या. आता किमान शंभर जागा जिंकण्याचा त्यांचा इरादा आहे. मोठ्ठे टार्गेट ठेवण्याचा भाजपा प्रमाणे त्यांनीही प्रयत्न केला असला तरी हा आकडा काँग्रेसला स्वबळावर सत्ता मिळवून देणारा होऊ शकत नाही. कारण तळाशी कार्यकर्ते शोधण्यापासून त्यांची सुरुवात आहे. महाराष्ट्राप्रमाणे उत्तर प्रदेशात दोन किंवा तीन आकडी जागा मिळवून सत्तेत सामील होण्याचा त्यांचा प्रयत्न असेल अशीच त्यांची रणनीती दिसत आहे. एका अर्थाने राज्याराज्यांमध्ये प्रबळ राजकीय शक्तींना थेट विरोध न करता अंडरस्टँडिंगचे राजकारण करायचे आणि पक्षाची स्थिती बळकट होईपर्यंत त्यांच्या साथीने निवडणुकीनंतरची आघाडी करायचे काँग्रेसचे राजीव गांधी कालीन धोरण पुन्हा एकदा  उपयोगात आणल्याचेच हे लक्षण आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशात कोणाची गट्टी कोणाशी असेल याबाबत अंदाज व्यक्त करणे मुश्कील असले तरी भाजप ओबीसी आणि मायावती यांची रणनीती जशी असेल त्याच्याविरोधात बहुजन समाजवादी पार्टी आणि काँग्रेस व राज्यातील इतर छोटे प्रभावी पक्ष रणनीती आखतील अशी चिन्हे आहेत. उत्तर प्रदेश समोर असणारी आव्हाने खूप मोठी आहेत. मात्र सर्वाधिक लोकसंख्या ज्या पक्षाच्या पाठीशी जाईल त्यांचे नशीब असल्याने उत्तर भारतातील सर्वसामान्य जनतेला प्रभावित करणारी धोरणे असतील का हे नजीकच्या काळात पाहणे रंजक ठरणार आहे. उत्तर प्रदेशच्या विकासाचे दावे सर्वच राजकीय पक्ष करत असतात. मात्र तिथल्या दैन्य आणि दारिद्र्याचे आव्हान सहजासहजी संपुष्टात येणार नाही. भारतातील सगळय़ात क्रियाशील युवाशक्ती या राज्यात असली तरीही त्यांना रोजगारासाठी देशभर भटकावे लागते. कोरोना कालावधीमध्ये सर्वाधिक लोक येथूनच स्थलांतरित झाले होते आणि जेव्हा त्यांनी नोकरीचे ठिकाण सोडले. तेव्हा या राज्यात प्रवेश करणेही मुश्कीलीचे बनले होते. जिथल्या मतांच्या जोरावर राजकीय पक्ष आपले राजकारण मोठे करण्याचा प्रयत्न करतात तिथल्या जनतेला मात्र केवळ आश्वासनेच मिळत आली आहेत. हे सर्वात दुर्दैवी असे भारतीय लोकशाहीचे चित्र आहे.

Related Stories

देशहित धाब्यावर

Patil_p

जनतेस आवडला नसला तरी दिलासा देणारा

Patil_p

कूटश्लोक

Patil_p

रामाचा एक गुण तरी अंगीकारुया!

Patil_p

शिक्षणातले डकवर्थ लुईस!

Patil_p

एका संशोधनाचा अपमृत्यू (1)

Patil_p
error: Content is protected !!