तरुण भारत

राज्यातील पहिल्या बालस्नेही उपक्रमाचा गुहागरात श्रीगणेशा !

पायलट प्रोजेक्टसाठी तळवली आरोग्य केंद्राची निवडः

प्रतिनिधी/ रत्नागिरी

Advertisements

कोविडने सरकारी आरोग्यसेवेच्या क्षमता आणि कमतरता यांची जाणीव झाली. खासगी आरोग्यसेवेच्या मर्यादाही दिसल्या. या काळात सर्वसामान्यांना सरकारी आरोग्यव्यवस्थेनेच खरा आधार दिला असला तरी या यंत्रणेतील कमतरता दूर करणे गरजेचे आहे. त्यासाठी मुंबईतील संपर्क या संस्थेने माता बालस्नेहीची संकल्पना मांडली. यामध्ये युनिसेफ आणि प्रथम फाऊंडेशनने सहकार्याची भूमिका घेतली. या प्रकल्पाची सुरुवात गुहागर तालुक्यातील तळवळी येथून व्हावी यासाठी आमदार भास्कर जाधव यांनी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे राज्यातील पहिल्या प्रकल्पाची सुरुवात तळवली येथे होत आहे. याचा शुभारंभ गुरुवारी सकाळी 11 वाजता तळवली ग्रामपंचायत येथे आमदार भास्कर जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी दिली.

  आरोग्य यंत्रणेतल्या कमतरता दूर करण्यासाठी केवळ सरकारवर अवलंबून न राहता लोकसहभागातून गावागावातील आरोग्ययंत्रणा सक्षम केली पाहिजे.  विशेषतः गरोदर माता आणि लहान मुलांना तातडीची सेवा मिळावी यासाठी संपर्क संस्थेने माता बालस्नेही प्रकल्पाची संकल्पना एप्रिलमध्ये मांडली होती. यासाठी युनिसेफ आणि प्रथम फाउंडेशनचे सहकार्य लाभले. राज्यातील बहुतांश लोकप्रतिनिधींशी याविषयी चर्चा झाली होती, पत्रही पाठवण्यात आले. मात्र आमदार भास्कर जाधव यांनी ही संकल्पना उचलून धरली. त्यांनी संस्थेशी चर्चा केली व  शक्य ते सहकार्य देण्याचेही तक्षणी सांगितले होते. त्याची फलश्रुती म्हणून या उपक्रमाची मुहूर्तमेढ 16 सप्टेंबर रोजी रोवली जात आहे.

तळवली गावातील अंगणवाडी, आशासेविका, तरुणांना याविषयी प्रशिक्षण दिले जाणार आहे. गावांतील लोकसहभागातून माता बालस्नेही आरोग्यसेवा सक्षम करण्यात येणार आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आल्यानंतर त्वरित डॉक्टर उपलब्ध होणार आहेत. त्याशिवाय गरोदर मातांचे समुदेशन, आरोग्याची काळजी घेण्यासाठी काय करता येईल, आलेल्या रुग्णांना चांगली सेवा मिळतेय का हे पाहण्यासाठी एक टीम याठिकाणी कार्यान्वित असेल. या आरोग्य केंद्रात लहान मुलांसाठी खेळणी व इतर साहित्यही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तळवली प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रथम फाऊंडेशनकडून दोन ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर देण्यात येणार आहेत.

बालविकासाच्या मुद्याला अग्रक्रम द्यायला हवा, यासाठी पीएचसी सक्षम करण्यासाठी आमदार आणि स्थानिक प्रशासन गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील पायाभूत सुविधांची जबाबदारी पेलतील. सुविधांबरोबरच मनुष्यबळ गरजेचे आहे. त्यासाठी पीएचसी सेवा देते त्या प्रत्येक गावातील काही युवक-युवतींची निवड केली जाणार आहे. त्यांना आरोग्य आणि रुग्णसेवा याबरोबरच, बाळाच्या पहिल्या हजार दिवसांचं महत्व, कुपोषण, गरोदरपणात घ्यायची काळजी, स्तनपानाचं महत्व, मासिक पाळीच्या दिवसांतलं आरोग्य अशा मानवी जीवनचक्राशी निगडित विषयांवर संपर्क, युनिसेफ आणि प्रथम संस्था- प्रशिक्षण देणार आहे. यामुळे सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्राशी जोडलेली आरोग्यदूत मुलामुलींची एक टीम तयार होईल. ही टीम पीएचसीला मदत करेल आणि गावातल्या गावातही सेवा देऊ शकेल. यामुळे गावपतळीवरची आरोग्ययंत्रणा बळकट होईल. प्रशिक्षित मुलामुलींना स्वकमाईचे एक साधनही मिळेल, अशी संकल्पना आहे.

Related Stories

पंधरा लिपीमध्ये साकारले राष्ट्रगीत

NIKHIL_N

होमक्वारंटाईनचा शिक्का असलेल्या वृद्धाचा दापोलीत मृत्यू; यंत्रणा सतर्क

triratna

क्वारंटाईन तरुणाने शाळेतच साकारली गणेश मूर्ती

NIKHIL_N

आणखी 13 जण कोरोनाबाधित, जिल्हय़ाची संख्या 145 वर!

Patil_p

सिंधुदुर्गातील पूरग्रस्तांना मराठी पत्रकार परिषदेचा मदतीचा हात

Ganeshprasad Gogate

चिपळूण मार्कंडीतील गटार, मोरी कामास स्थगिती द्या!

Patil_p
error: Content is protected !!