तरुण भारत

राणे, मोन्सेरात कुटुंबातच दोन उमेदवारी

अन्य कोणत्याच कुटुंबात दोन उमेदवारी मिळणार नाही : उमेदवारांची कच्ची यादी तयार, बंडखोरांना रोखणार

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

आगामी विधानसभा निवडणुकीत एका घरात दोन उमेदवारी दिली जाणार नाही आणि भाजपच्या निर्णयात कोणताही बदल होणार नाही. तथापि, बाबुश मोन्सेरात आणि त्यांची पत्नी जेनिफर यांना उमेदवारी दिली जाईल. जर प्रतापसिंह राणे यांनी निवडणुकीतून माघार घेतली तरच विश्वजित राणे आणि त्यांच्या पत्नी दिव्या या दोघांनाही भाजप सत्तरीतील उमेदवारी देईल. या उलट अन्य कोणालाही हा नियम लागू होणार नाही, असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

भाजपने आगामी निवडणुकीसाठी जोरदार तयारी केलेली आहे. आता तिकिट वाटपाबाबत कोणतेही त्रांगडे होऊ नये याकरिता आत्तापासून धोरण निश्चित केले आहे. मोन्सेरात व राणे वगळता अन्य कोणत्याही नेत्याच्या घरात दोन उमेदवारी दिली जाणार नाही, अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्याने दैनिक तरुण भारतला दिली.

भाजप उमेदवारीची कच्ची यादी तयार

आगामी निवडणुकीसाठी भाजपने कच्ची यादी तयार केलेली आहे. निवडणुकीला अद्याप 4 महिने शिल्लक आहेत. त्यामुळे आयत्यावेळी होणारे बदल लक्षात घेऊन उमेदवारही आयत्यावेळी बदलण्यासाठीचे सुनियोजनही पक्षाने केलेले आहे.

नवी दिल्लीहून पक्षाचे वरिष्ठ नेते गोव्यात आले होते. त्यांच्याबरोबर सविस्तर आणि सखोल चर्चा झाली. त्यानुसार उमेदवारी कोणाला द्यावी व कोणाला द्यायची नाही, याबाबत निश्चित असे निकष तयार करण्यात आले आहेत.

बंडखोरांना रोखण्याचीही जय्यत तयारी

भाजप घराणेशाही विरोधात आहे. गोव्यात घराणेशाही राबविण्यास देणार नाही. तथापि, मोन्सेरात हा एक मुख्य पर्याय आहे आणि आता राणे कुटुंबीय हा देखील एक पर्याय ठेवलेला आहे. भाजपचे काही नेते बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत त्यांना रोखण्यासाठी भाजपने सविस्तर तयारी केलेली आहे.

राणे, मोन्सेरातमध्ये निवडून येण्याची क्षमता

भाजपमध्ये प्रवेश करतेवेळी बाबुश मोन्सेरात व त्यांची पत्नी जेनिफर मोन्सेरात हे दोन्ही पती-पत्नी आमदार होऊनच भाजपमध्ये आले होती. त्यामुळे आता त्यांना दोघांनाही स्वतंत्रपणे भाजपची उमेदवारी दिली जाईल. त्यानंतर सत्तरीत आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यासाठी जर काँग्रेसनेते आणि विद्यमान आमदार 
प्रतापसिंह राणे हे त्याग करीत असतील व निवडणूक लढविणार नसतील तर पर्येमधून विश्वजित राणे यांना व वाळपईमधून त्यांच्या पत्नी दिव्या राणे यांना उमेदवारी दिली जाईल. या दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा निवडून येण्याची क्षमता आहे.

कवळेकर, लोबोपैकी दोघांनाच उमेदवारी

तथापि उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांची पत्नी सावित्री कवळेकर आणि मंत्री मायकल लोबो व त्यांची पत्नी डिलायला लोबो अशा चार जणांना उमेदवारी मिळणार नाही. केवळ बाबू कवळेकर आणि मायकल लोबो या दोघांनाच उमेदवारी मिळेल. असे भाजपने निश्चित केल्याने भाजप आपल्या निर्णयाशी ठाम रहाणार आहे.

पांडुरंग मडकईकरांना विश्वासात घेणार भाजप

कुंभारजुवे मतदारसंघातील तिढा सोडविण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी कुंभारजुवेचे विद्यमान आमदार पांडुरंग मडकईकर यांच्याशी चर्चा करणार आहेत. मडकईकर हे आजारी असल्याने पर्यायी विचार केला जाईल. मडकईकर यांनी आपण आपल्या पसंतीचा उमेदवार सांगणार, असे म्हटले असून भाजप त्यालाच उमेदवारी देईल. श्रीपाद नाईक हे केंद्रीय मंत्री असले तरी त्यांचे चिरंजीव सिद्धेश नाईक यांना विधानसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते. हा प्रकार घराणेशाहीत मोडला जात नाही, असे पक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱयाने ‘तरुण भारत’ला सांगितले.

Related Stories

पाजीफोंड भागात राजू नाईक यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

Amit Kulkarni

डॉ. विशाल च्यारीची आत्महत्त्या नव्हे घातपात

Patil_p

रविवारी कोरोनाचे दोन बळी

Omkar B

लीगमधील अव्वल स्थानासाठी आज मुंबई-एटीके आमनेसामने

Amit Kulkarni

सत्ता मिळाली, आता रंगणार नगराध्यक्षपदासाठी चढाओढ

Amit Kulkarni

काजू खरेदी करण्यास डिचोली बागायतदारने दिला नकार

Omkar B
error: Content is protected !!