तरुण भारत

स्मार्ट बसथांबा बनला पार्किंगतळ

धर्मवीर संभाजी चौकातील बसथांब्यावर वाहनांचे पार्किंग; भटक्या जनावरांचाही आश्रय

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

शहरातील बसप्रवाशांसाठी ठिकठिकाणी स्मार्ट बसथांबे निर्माण करण्यात आले आहेत. मात्र आजपर्यंत या बसथांब्यांमध्ये भटकी जनावरे आश्रय घेत होती तर अलीकडे बसथांब्यांवर वाहने पार्क करण्यात येत असल्याने बसथांबे नेमके कोणासाठी? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.

शहर व उपनगरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत 25 हून अधिक ठिकाणी स्मार्ट बसथांब्यांची उभारणी करण्यात आली आहे. महत्त्वाच्या बसथांब्यांच्या ठिकाणी ई-टॉयलेट, प्रवाशांना बसण्यासाठी आसन सुविधा तसेच कॅफेटोरिया आदी विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मात्र बहुतांश ठिकाणी बसथांब्यावर भटकी जनावरे तसेच काही ठिकाणी बेघर नागरिक आसरा घेत आहेत.

धर्मवीर संभाजी चौकातील बसथांब्यावर जनावरे तसेच भटकी कुत्री सर्रास बसलेली असतात. परिणामी संपूर्ण बसथांब्यावर घाणीचे साम्राज्य निर्माण होते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. सातत्याने याबाबत पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करण्यात आले होते. अलीकडेच बसथांब्यावरील सर्व विकासकामे पूर्ण करून उपलब्ध करण्यात आले आहे. मात्र सध्या या बसथांब्यावर चारचाकी वाहने पार्क करण्यात येत आहेत. धर्मवीर संभाजी चौक ते संचयनी चौकापर्यंतच्या एका बाजूच्या रस्त्यावर बसथांबा तर दुसऱया बाजूला चारचाकी वाहनांचे पार्किंगतळ आहे. सदर ठिकाणी पार्क करण्यात येणाऱया वाहनधारकांकडून कॅन्टोन्मेंटच्यावतीने पार्किंग शुल्क आकारण्यात येते. याठिकाणी नेहमीच वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात.

त्यामुळे पार्किंगची समस्या भेडसावत असते. काही वाहनधारक चक्क बसथांब्यावर वाहने पार्क करीत आहेत. परिणामी बस रस्त्यावर थांबविण्यात येत आहेत. याचा फटका प्रवाशांना बसत आहे. बसथांब्याचा उपयोग वाहनतळासाठी केला जात असल्याने बसथांबा नेमका कशासाठी, असा मुद्दा प्रवासीवर्गांतून उपस्थित करण्यात येत आहे. या बसथांब्याचा होणारा दुरुपयोग थांबविण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना राबविण्यात येतील का? अशी विचारणा होत आहे.

Related Stories

घुग्रेनट्टी येथे एकाला जबर मारहाण

Patil_p

सीमा लाटकर यांची बदली अखेर रद्द

Patil_p

निपाणी पालिकेत लॉकडाऊनचा बट्टय़ाबोळ

Patil_p

देसूर ग्रा. पं. अध्यक्षपदी लक्ष्मी पिरनवाडी

Amit Kulkarni

कोरोनाच्या सावटाखाली प्रथमच घरात नमाज

Patil_p

कुडची येथील दोन महिला कोरोनामुक्त

Patil_p
error: Content is protected !!