तरुण भारत

‘डबल इंजिन’ सरकारचा उत्तरप्रदेशला लाभ

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा – अलीगढमध्ये विद्यापीठ अन् संरक्षण कॉरिडॉरच्या कार्याचा शुभारंभ

वृत्तसंस्था / अलीगढ

Advertisements

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी अलीगढमध्ये संरक्षण कॉरिडॉर आणि राजा महेंद्रप्रताप सिंह राज्य विद्यापीठाच्या कार्याचा शुभारंभ केला आहे. यादरम्यान बोलताना पंतप्रधानांनी उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारचे कौतुक केले आहे. मुख्यमंत्री योगींच्या नेतृत्वाखाली राज्याचा मोठा विकास झाला आहे. येथे देश तसेच जगभरातील गुंतवणूकदार येत आहेत. केंद्र आणि राज्यातील योगी सरकार मिळून लोकांना सुविधा देण्याचे काम करत आहे. डबल इंजिन सरकारच्या डबल लाभाचे अत्यंत मोठे उदाहरण उत्तरप्रदेश ठरल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.

अलीगढ आतापर्यंत लोकांच्या घरांची सुरक्षा करत होता, आज हाच अलीगढ देशाच्या सीमांचे रक्षण करणार आहे. येथे संरक्षण उत्पादनांची निर्मीत होणार आहे. अलीगढ नोडमध्ये छोटी शस्त्रास्त्रs, ड्रोन, एअरोस्पेस, मेटल कॉम्पोनेंट्स, डिफेन्स पॅकेजिंग यासारखी उत्पादने तयार होऊ शकतील. 100 कोटींहून अधिक गुंतवणूक हाणार आहे. हे बदल अलीगढ आणि नजीकच्या क्षेत्राला एक नवी ओळख मिळवून देतील. संरक्षण उद्योगाद्वारे येथील व्यापारी आणि लघू-मध्यम उद्योजकांना लाभ मिळेल. गरीबांसाठी ही अत्यंत उत्तम संधी असल्याचे मोदी म्हणाले.

भारताच्या स्वातंत्र्यांसाठी अनेकांनी सर्वस्व त्यागले, पण स्वातंत्र्याच्या अशा नायक आणि नायिकांच्या तपस्येबद्दल देशाच्या पुढील पिढय़ांना जाणीव करून देण्यात आली नव्हती. अनेक स्वातंत्र्यसेनानींच्या गाथा जाणून घेण्यापासून देशाच्या अनेक पिढय़ा वंचित राहिल्या. 20 व्या शतकातील अशा चुका आज 21 व्या शतकात सुधारत आहोत असे म्हणत मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे.

पश्चिम उत्तरप्रदेशातील भय संपले

उत्तरप्रदेशात एकेकाळी शासन-प्रशासन गुंड आणि माफियांकडून चालविले जायचे. तर आता खंडणी गोळा करणारे, माफिया राज चालविणारे गजाआड आहेत. पश्चिम उत्तरप्रदेशात 4-5 वर्षांपूर्वी कुटुंबं स्वतःच्या घरातच घाबरून जगत होती. भगिनी-मुलींना घरातून बाहेर पडण्यास, शाळा-महाविद्यालयांमध्ये जाण्यास भीती वाटायची. मुलगी घरी परतेपर्यंत आईवडिलांना चैन पडत नसायची. कितीतरी लोकांनी स्वतःचे पिढय़ानपिढय़ा असलेले घर सोडले. पण आज गुन्हेगारांना वचक बसला आहे. योगींच्या सरकारमध्ये गरीबांचे ऐकले जाते आणि त्यांचा आदरही केला जातो असे प्रतिपादन मोदींनी केले आहे.

शेतकऱयांना अनेक संधी

सरकार छोटय़ा शेतकऱयांना बळ देण्यासाठी काम करत आहे. दीडपट अधिक हमीभाव देण्यात येत आहे. शेतकरी क्रेडिट कार्डच्या सुविधा वाढविण्यात आल्या आहेत. शेतकऱयांच्या खात्यात 6 हजार रुपये जमा केले जात आहेत.  उत्तरप्रदेशात मागील 4 वर्षांमध्ये हमीभावच्या खरेदीवर नवे उच्चांक प्रस्थापित झाल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

बालपणीचा किस्सा

अलीगढमध्ये बालपणीचा किस्सा सांगण्याची इच्छा होतेय. सुमारे 55-60 वर्षांपूर्वी अलीगढचा एक कुलुपांचा मुस्लीम विक्रेता दर तीन महिन्यांनी आमच्या गावात यायचा. ते काळे जॅकेट घालायचे. ते विक्रेते असल्याने कुलूप व्यापाऱयांकडे ठेवून जायचे आणि तीन महिन्यांनी पैसे घेऊन जायचे. आजूबाजूच्या गावांमध्येही ते हेच करत होते. माझ्या वडिलांशी त्यांची चांगली मैत्री होती. दिवसभरात वसूल केलेले पैसे ते माझ्या वडिलांकडे ठेवायचे. 4-6 दिवसांनी माझे गाव सोडून जाताना ते वडिलांकडून पैसे घेऊन रेल्वेने रवाना व्हायचे असे मोदींनी किस्सा सांगत म्हटले आहे. या किस्स्याद्वारे पंतप्रधानांनी मुस्लीम आमच्यावर विश्वास ठेवू शकतात हे सांगण्याचा प्रयत्न केला असल्याचे मानले जात आहे.

Related Stories

चार वर्षांनंतर शशिकला नटराजन यांची कारागृहातून मुक्तता

Patil_p

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार; दोघांचा मृत्यू

Patil_p

देशात मृतांचा आकडा 1 लाखांच्या पार

Patil_p

अफगाणिस्तानवर लक्ष ठेवण्यासाठी उच्चाधिकार गट

Patil_p

पैशाचा खणखणाट…प्रेतामुळे घबराट

Patil_p

जगात कोरोनाबाधितांची संख्या 21 लाखाच्या वर 

prashant_c
error: Content is protected !!