तरुण भारत

नवी क्रांती

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला गटात ब्रिटनच्या एम्मा रॅडूकानूने, तर पुरुष गटात रशियाच्या डॅनिल मेदवेदेवने प्राप्त केलेले विजेतेपद म्हणजे टेनिसमधील नवी क्रांतीच म्हटली पाहिजे. मागच्या दीड दशकाचा आढावा घेतला, तर या खेळावर प्रामुख्याने नोवाक जोकोविच, रॉजर फेडरर, राफेल नदाल वा विल्यम्स भगिनी अशाच काही खेळाडूंचा वरचष्मा दिसून येतो. तथापि, या प्रस्थापितांना धक्के देण्यात नवीन टॅलेंट यशस्वी ठरल्याने टेनिस सध्या नव्या वळणावर आहे, असे नक्कीच म्हणता येईल. एम्मा रॅडूकानू हे नाव कालपरवापर्यंत कुणाला फारसे ठाऊक नव्हते. जागतिक क्रमवारीत तब्बल दीडशेव्या क्रमांकावर असलेली ही टेनिसपटू अचानक मुसंडी मारते काय नि अजिंक्यपदावर नाव कोरते काय, हे सारेच स्वप्नवत होय. मुख्य म्हणजे पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धा जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली आहे. शिवाय एकही सेट न गमावता 18 पैकी 18 सेट जिंकण्याची कामगिरीही तिच्या नावावर नोंदविली गेली आहे. 2014 मध्ये सेरेना विल्यम्सने हा पराक्रम केला होता. तिच्या पावलावर पाऊल टाकत एम्माने मिळविलेले हे यश अतुलनीयच म्हणावे लागेल. अनुभव महत्त्वाचा असतो, मात्र क्लास आणि जिद्द या दोन गोष्टी एकत्र आल्या, तर इतिहास घडविता येतो, हे या माध्यमातून एम्माने दाखवून दिले आहे. तसे तिचे वय अवघे 18 वर्षे इतके. इतक्या कमी वयात तिने ही भरारी घ्यावी, हे नक्कीच अचंबित करणारे आहे. याआधी मारिया शारोपोवा हिने 17 व्या वर्षी ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावत टेनिसविश्वाचे लक्ष वेधून घेतले होते. कमी वयात एम्माने मिळविलेला विजयही असाच ऐतिहासिक ठरतो. ब्रिटनकरिता तिचा हा खेळ अनेकार्थांनी ग्रेट.

1977 मध्ये ब्रिटनच्या व्हर्जिनिया वेड हिने विम्बल्डनमध्ये बाजी मारली. परंतु, नंतरच्या चार दशकांत कोणत्याही महिला खेळाडूस या स्पर्धेवर वर्चस्व गाजविता आले नाही. किंबहुना, अमेरिकेन ओपनमध्ये एम्माने साधलेली सरशी पाहता राखेतून भरारी कशी घ्यायची, याचा शब्दशः प्रत्यय यावा. कमालीची एकाग्रस्ता, मोक्याच्या क्षणी खेळ उंचावण्यासह चिकाटी, मनोबलाच्या बळावर तिने हा मैलाचा दगड पार केला आहे, हे लक्षात घ्यायला हवे. ‘मी लहानपणापासून ग्रँड स्लॅम जिंकण्याचे स्वप्न पाहिले होते नि आज ते माझ्या हातात आहे,’ या तिच्या विजयानंतरच्या प्रतिक्रियेतून एकूणच टेनिसशी एम्मा किती घट्टपणे जोडली गेली आहे, हे ध्यानात यावे. अर्थात यापुढील तिचे आव्हान अधिक मोठे असेल. हे जेतेपद हा केवळ अपवाद नाही, हे तिला आगामी काळात सिद्ध करावे लागेल. वयाचा विचार करता अजून तिला बरेच टेनिस तिला खेळायचे आहे. या काळात सातत्य, तंदुरुस्तीचा मेळ साधत टेनिस सम्राज्ञी म्हणून स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याची संधी तिच्यापुढे राहील. विल्यम्स भगिनींनी अनेक वर्षे या खेळावर निर्विवाद प्रभुत्व गाजविले. परंतु, अलीकडच्या चार ते पाच वर्षांत नाओमी ओसाका, बार्टी यांच्यासह अनेक महिला खेळाडूंनी आपल्या कौशल्यातून स्वतःचे स्थान पक्के केले आहे. एम्माच्या रूपाने महिला टेनिसची रॅकेट आता खऱया अर्थाने तरुणाईच्या हातात गेल्याचे दिसत आहे. हे वळण सुखद आहे. यंदाची पुरुषांची स्पर्धाही अशीच महत्त्वपूर्ण व लक्षवेधक. वय व दुखापतीमुळे फेडरर, नदाल मागे पडत असताना एकामागोमाग एक विक्रम रचणाऱया जोकोविचचा अश्वमेध रोखण्याचा डॅनिल मेदवेदेव याने केलेला पराक्रम ही दुसरी रशियन क्रांतीच ठरावी. पेंच, ऑस्ट्रेलियन व विंबल्डन जिंकणाऱया जोकोविचला कॅलेंडर स्लॅम जिंकण्याची सुवर्णसंधी होती. तथापि 1962 व 1969 असा तब्बल दोनदा हा विक्रम प्रस्थापित करणाऱया रॉड लेव्हर यांच्या उपस्थितीतच हा टप्पा गाठण्याचे त्याचे स्वप्न भंगावे, यासारखे दुर्दैव नाही. तत्पूर्वी 1938 मध्ये डॉन बज यांनीही ‘कॅलेंडर स्लॅम’ वर नाव कोरले होते. नोवाकला याची पुनरावृत्ती करण्यात अपयश येण्याचे कारण काय असेल, तर मेदवेदेवचा उच्च दर्जाचा खेळ होय. यापूर्वी हे दोघे आठ वेळा आमनेसामने आले होते, त्यात पाच वेळा जोकोविचने, तर तीनदा मेदवेदेवने बाजी मारली होती. हे बघता सर्बियाच्या बादशहाचेच पारडे जड होते. किंबहुना, या कसलेल्या खेळाडूवर दबाव टाकत त्यालाही पराभूत करता येऊ शकते, हे रशियाच्या या नव्या दमाच्या टेनिसपटूने दाखवून दिले. वास्तविक, ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात त्याला जोकोविचकडूनच पराभव पत्करावा लागला होता. त्याची परतफेड करताना त्याने जो संयम दाखविला, तोही तितकाच महत्त्वाचा मानावा लागेल. जोकोविच आज विक्रमी 21 व्या विजेतेपदाच्या उंबरठय़ावर आहे. तरीही खेळावरचे नियंत्रण सुटले, की त्याचा राग अनावर होतो. रॅकेटवर त्याने काढलेला राग असाच. ऑलिंपिकनंतरचा त्याचा हा सलग दुसरा पराभव. गोल्डन ग्रँड स्लॅमची संधी हुकणे, दुःखदायीच. मात्र, खेळताना खिलाडूवृत्ती उठून दिसणे, अधिक महत्त्वाचे असते. हे प्रत्येक खेळाडूने लक्षात ठेवले पाहिजे. मेदवेदेव आज उणापुरा 25 वर्षांचा आहे. त्याला अजून भरपूर टेनिस खेळायचे आहे. हुलकावणी देणाऱया विजयाशी गाठ पडल्यामुळे भविष्यात नक्कीच त्याचा आत्मविश्वास दुणावू शकेल. प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत काढली जाते, तेव्हा नवा इतिहास रचला जात असतो. मेदवेदेवने आज असाच इतिहास निर्माण करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले आहे. मात्र, भविष्यातही त्याला सातत्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन करावे लागणार आहे. तंत्रशुद्धता आणि वेग या दोहोंचा टेनिससारख्या खेळात समतोल साधावा लागतो. या दोन्ही आयुधांसोबतच चापल्य, तुंदुरुस्ती, मानसिक कणखरता तसेच बदलता काळ, संदर्भांसह ताणतणावांवर मात करीत खेळ उंचावत राहणे, हेदेखील तितकचे गरजेचे होय. नव्या शिलेदारांना याचे भान ठेवत नवनवीन आव्हाने पेलावे लागतील. त्यातूनच टेनिस कोर्ट खऱया अर्थाने दणाणत राहील.

Advertisements

Related Stories

स्क्रिझोफेनिया नंतरही जीवन आहे…

Patil_p

भजती मूर्खा मंदमती

Patil_p

ठाकरे सरकार तरी वास्तवाला भिडणार?

Patil_p

तस्मै श्रीगुरवे नमः।

Patil_p

लॉकडाऊनचा सदुपयोग शिकवणारा बळीराजा!

Omkar B

सावधान…आपली ऑनलाईन आर्थिक फसवणूक होईल

Patil_p
error: Content is protected !!