तरुण भारत

लंकेचा मलिंगा सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त

कसोटी, वनडेनंतर आता टी-20 क्रिकेटलाही अलविदा

वृत्तसंस्था/ कोलंबो

Advertisements

लंकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने मंगळवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. किंचित आडवा हात करीत टाकलेल्या त्याच्या यॉर्कर्सनी अनेक फलंदाजांत दहशत निर्माण झाली होती.

38 वर्षीय मलिंगा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील महान गोलंदाज असून 2014 टी-20 विश्वचषक स्पर्धा त्याच्या नेतृत्वाखाली लंका संघाने जिंकली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. त्याने याआधीच कसोटी व वनडेतून निवृत्ती जाहीर केल्यानंतर तो फक्त टी-20 मध्ये खेळत होता. ‘टी-20 मधूनही मी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांनी मला आजवर पाठिंबा दिला, त्या सर्वांचा मी आभारी आहे. आगामी काळात युवा खेळाडूंना आपल्या अनुभवाचा लाभ देण्याचा मी प्रयत्न करणार आहे,’ असे मलिंगाने ट्विट केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे. ‘गोलंदाजी करणाऱया पायांना आता पूर्ण विश्रांती मिळणार असली तरी या खेळावरील प्रेमाला मी कधीही विश्रांती देणार नाही,’ असे तो हसत म्हणाला.

मागील वर्षी मार्चमध्ये पल्लेकेले येथे विंडीजविरुद्ध त्याने लंकेतर्फे शेवटचा टी-20 सामना खेळला होता. सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याने एकूण 546 बळी मिळविले असून 2011 मध्ये त्याने कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर वनडेमधूनही तो नंतर निवृत्त झाला होता. मात्र टी-20 मध्ये त्यापुढेही खेळत राहिला होता. यावर्षी होणाऱया टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी त्याचा लंका संघात समावेश करण्यात आलेला नाही. गेल्या वर्षी त्याने टी-20 विश्वचषक स्पर्धेत नेतृत्व करण्याची इच्छा बोलून दाखविली होती. ही स्पर्धा मागील वर्षी ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार होती. पण कोरोनामुळे ती लांबणीवर टाकण्यात आली होती. आता ही स्पर्धा पुढील महिन्यात संयुक्त अरब अमिरातमध्ये भारताच्या यजमानपदाखाली होणार आहे. ‘आगामी काळात युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचा माझा मानस आहे,’ असे सांगताना त्याने सर्व संघसहकारी आणि सर्व प्रँचायझींचे आभार मानले. आयपीएलमध्ये त्याने मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते.

आयपीएलमध्ये त्याने 122 सामन्यांत 170 बळी मिळविले असून 13 धावांत 5 बळी ही त्याने नोंदवलेली सर्वोत्तम कामगिरी आहे. लंकेतर्फे 84 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने 107 आणि 338 वनडे सामन्यांत 226 बळी मिळविले. याशिवाय 30 कसोटीत लंकेचे प्रतिनिधित्व करताना 101 बळीही टिपले आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बळींचे शतक पूर्ण करणारा तो पहिला गोलंदाज असून सर्वाधिक बळी मिळविणाऱयांमध्ये तो आता ड्वेन ब्रॅव्हो, इम्रान ताहिर, सुनील नरेन यांच्यानंतर चौथ्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सने त्याला मुक्त केल्यानंतर गेल्या जानेवारीत त्याने प्रँचायझी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

टी-20 क्रिकेटमधील सर्वकालीन सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक, अशी त्याने ओळख निर्माण केली असून आयपीएल, बिग बॅश लीग, कॅरेबियन प्रिमियर लीग व अन्य प्रँचायझी स्पर्धांत खेळलेल्या प्रत्येक संघाचा तो अत्यंत महत्त्वाचा सदस्य बनला होता. बारा वर्षे मुंबई इंडियन्सतर्फे खेळताना पाचपैकी चार आयपीएल जेतेपदात त्याने मोलाची भूमिका बजावली होती. 2020 मध्ये मात्र त्याने वैयक्तिक कारणास्तव आयपीएलमधून माघार घेतली होती. त्याचे वडील आजारी असल्याने त्याने हा निर्णय घेतला होता.

अनेक प्रतिस्पर्धी फलंदाजांत त्याने आपल्या भेदक यॉर्कर्सनी व विचित्र ऍक्शनने दहशत निर्माण केली होती. त्याने टी-20 मध्ये दोन तर वनडेमध्ये तीन हॅट्ट्रिक्स नोंदवल्या आहेत. 2007 मध्ये वेस्ट इंडीजमध्ये झालेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने केलेली कामगिरी लक्षवेधी ठरली. त्याने लंकन मंडळ, मुंबई इंडियन्सचे सहकारी, मालक, स्टाफ तसेच ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, यूएई, विंडीज, इंग्लंड येथील प्रँचायझींचेही आजवर पाठबळ दिल्याबद्दल आभार मानले.

Related Stories

आयपीएलवर कोरोनाचे सावट- डॅनिएल सॅम्सही पॉझिटिव्ह

Patil_p

आयसीसी कसोटी मानांकनात कोहली, पंत, रोहित पहिल्या दहा खेळाडूत

Amit Kulkarni

इस्त्रायलच्या ऍथलिटविरुद्ध लढण्यास नकार, ज्युडोका नौरिन निलंबित

Patil_p

बर्लीन स्पर्धेतून ओसाकाची माघार

Patil_p

Tokyo Olympics 2020 : बॉक्सर लवलीना सेमीफायनलमध्ये पराभूत, कांस्य पदकावर मानावे लागणार समाधान

triratna

चितळे, घोष यांचे दुहेरीतील पदक निश्चित

Patil_p
error: Content is protected !!