तरुण भारत

आडपई गावात, उत्साहाला उधाण ..!

पाच दिवसांची विसर्जन मिरवणूक जल्लोषात : चित्ररथ देखावे, दिंडी, फुगडय़ा, गणरायांचा अखंड गजर

प्रतिनिधी /फोंडा

Advertisements

 आडपई ग्रामस्थांकडून लाडक्या गणपती बाप्पाला भव्य मिरवणुकीसह वाजत गाजत व मोठय़ा जल्लोषात निरोप देण्यात आला. संपूर्ण गोव्यात प्रसिद्ध असलेली आडपई गावातील पाच दिवसांची ही गणपती विसर्जनाची मिरवणूक काल मंगळवारी सायंकाळी उत्साहात पार पडली. गेल्या वर्षी कोरोना महामारीच्या तिव्रतेमुळे आवरता घ्यावा लागलेला उत्साह, यंदा मात्र आडपई ग्रामस्थांना आवरता घेता आला नाही.

 देवदेवतांच्या प्रतिकृती व सामाजिक संदेश देणारे चित्ररथ देखावे…. फुगडय़ा, दिंडी आणि गणपती बाप्पांचा अखंड जयघोष….अशा उत्साहपूर्ण वातावरणात लाडक्या गणरायाला पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी निरोप देण्यात आला. दुपारी 4 वा. मिरवणुकीला सुरुवात झाली व तासाभराच्या अखंड जल्लोषानंतर ती आवरती घेण्यात आली. गावातील प्रत्येक कुटुंबातील गणपतीची उत्तरारती आटोपल्यानंतर सर्व गणपती आपल्या ठरलेल्या क्रमानुसार मिरवणुकीत सहभागी झाले. पावसाच्या एक दोन  हलक्या सरी कोसळल्या, मात्र वरुणराजाने दाखविलेल्या कृपादृष्टीमुळे मिरवणुकीत फारसा व्यत्यय आला नाही. दत्त मंडपाजवळ सर्व गणपती एकत्र आल्यानंतर सामूहिक आरती झाली व नंतर जुवारी नदीत श्रींचे विसर्जन करण्यात आले.

 आडपई गावातील पाच दिवसांच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक म्हणजे फोंडा तालुक्यातील गणपती उत्सवाचे खास वैशिष्टय़ मानले जाते. अनेक वर्षांपासून चालत आलेली ही आगळी वेळगी परंपरा गावातील लोकांनी अखंडपणे सुरु ठेवली आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत एकंदरीत गणपती उत्सवावर मर्यादा आल्याने या मिरवणुकीतही खंड पडला. यंदा मात्र ग्रामस्थांना आपला उत्साह आवरता आला नाही. गणपतीच्या दीड दिवशी ग्रामस्थांची बैठक होऊन विसर्जन मिरवणूक काढण्याचा निर्णय झाला. अल्पकाळात चित्ररथ देखावे उभारुन जय्यत तयारीसह मिरवणूक काढण्यात आली.

 प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही गावातील सर्व पंधरा-सोळा कुटुंबियांनी आकर्षक असे देखावे तयार करुन त्यात आपल्या गणरायाला विराजमान करीत वाजत गाजत मिरवणूक काढली. आकर्षक अशा देखाव्यातून गावातील कलाकारांच्या कलेचे दर्शन घडले. तरुणवर्गाचा उत्साह तर ओसंडून वाहताना दिसला. विविध दैवदैवते तसेच ऐतिहासिक पुरुषांच्या प्रतिकृतींवर आधारीत देखाव्यांसह सामाजिक संदेश देणारे काही देखावेही या मिरवणुकीत पाहायला मिळाले.

आडपई गावात पाच दिवसांच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला अनेक वर्षांची परंपरा आहे. नवीन पिढीनेही ती कायम राखली आहे. याची प्रचिती मिरवणुकीच्या उत्साहपूर्ण वातावरणातून दिसून आली. या गावात घरोघरी गणपती पुजले जात नाहीत. सर्व कुटुंबियांकडून एकत्रित गणपती पुजण्याची प्रथा आहे. त्यात खुमणेभाटकर, कुर्डीकर, म्हार्दोळकर, वस्त, सकले मुळे, मधले मुळे, वयले मुळे, बोरकर, सोसेभाटकर, लोटलीकर, खांडेकर, महालक्ष्मी, पोकळे, श्री शिवंबा निवास आदी कुटुंबाचा समावेश आहे. यंदा या सर्व कुटुंबीयांनी चित्ररथ देखावे तयार करुन दिंडी मिरवणुकीसह मोठय़ा थाटात गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.

Related Stories

लसीकरणाचा दावा म्हणजे सरकारचा खोटारडेपणाच विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचा दावा

Amit Kulkarni

आयडियल हायस्कूलमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप

Amit Kulkarni

गणेशोत्सव मंडळांनी कोरोनासंबंधी जनजागृती करावी

Patil_p

रेशन दुकानांवरील डय़ुटीचा मुख्यमंत्र्यांनी विचार करावा

Omkar B

मुस्लीमवाडा, नागझर डिचोली येथे बेकायदा गोमांस जप्त

Omkar B

मुरगावच्या भावी नगराध्यक्ष उपनगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार

Amit Kulkarni
error: Content is protected !!