तरुण भारत

स्वच्छतेचे काम व्यवस्थितपणे पार पाडा

महानगरपालिका आयुक्त रूदेश घाळी यांची सूचना : आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांची घेतली बैठक

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

शहराच्या स्वच्छतेसाठी सर्व कर्मचाऱयांनी वेळेवर आणि व्यवस्थित काम करण्याची आवश्यकता आहे, अशी सूचना महापालिका आयुक्त रूदेश घाळी यांनी स्वच्छता विभागाच्या अधिकाऱयांना केली. तसेच आपण स्वतः दररोज सकाळी या कामाची पाहणी करणार असल्याचे सांगितले. हॉटेलमधील कचऱयाची विल्हेवाट हॉटेल चालकांनीच करावी, अशी सूचना हॉटेल चालक व व्यवस्थापक मंडळाला केली. 

महापालिका निवडणुकीदरम्यान महापालिका आयुक्तपदी रूदेश घाळी यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे विविध विभागांची माहिती घेण्यासाठी आयुक्तांनी आढावा बैठका घेण्यास प्रारंभ केला आहे. मंगळवारी आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांची बैठक घेऊन स्वच्छता कामाची माहिती जाणून घेतली. तसेच आरोग्य विभागामार्फत केल्या जाणाऱया कामांचा आढावा घेऊन विविध सूचना केल्या. याच बैठकीत हॉटेल चालक व व्यवस्थापन मंडळांनादेखील आमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे आरोग्य विभागाचे अधिकारी व हॉटेल चालक व्यवस्थापन मंडळाची संयुक्त बैठक पार पडली.

यावेळी आरोग्य विभागामार्फत शहरातील कचऱयाची उचल कोणत्या पद्धतीने केली जाते, कामगारांची संख्या तसेच कंत्राटदार आणि स्वच्छता नियोजनाची माहिती महापालिकेचे पर्यावरण साहाय्यक कार्यकारी अभियंते एच. व्ही. कलादगी यांनी दिली. तसेच दिवसातून दोनवेळा कचऱयाची उचल केली जाते. सध्या 20 पॅकेजद्वारे स्वच्छता कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. पण शासनाच्या नव्या सूचनेनुसार 4 पॅकेज करून निविदा काढण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. अशी विविध माहिती सादर करण्यात आली.

शहराची स्वच्छता महत्त्वाची असून, कोणत्याही प्रकारची सबब चालणार नाही. सर्व स्वच्छता निरीक्षकांनी सकाळी वेळेवर उपस्थित राहून कामगारांवर कामाची जबाबदारी सोपवावी. त्याचप्रमाणे प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याची सूचना केली. संपर्कात राहण्यासाठी वॉकीटॉकी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या सुविधेचा वापर सर्वांनी करावा, अशी सूचना करून स्वच्छता कामाचा आढावा घेण्यासाठी स्वतः दररोज सकाळी शहरात फेरफटका मारणार असल्याचे अधिकाऱयांना महापालिका आयुक्त रूदेश घाळी यांनी सांगितले.

हॉटेलमधील कचरा रस्त्याशेजारी टाकला जातो. हॉटेलमधील कचऱयाची उचल करण्यासाठी दोन विशेष वाहनांची व्यवस्था केली आहे. तरीदेखील कचरा दिला जात नाही. त्यामुळे या कचऱयाची विल्हेवाट हॉटेल चालकांनीच लावावी, अशी सूचना हॉटेल चालक व्यवस्थापन मंडळाला केली. या कचऱयापासून गॅस निर्मितीचा प्रकल्प प्रत्येक हॉटेलमध्ये सुरू करावा. याकरिता लागणारे सहकार्य महापालिकेच्यावतीने करू, असे आयुक्त रूदेश घाळी यांनी सांगितले. लवकरच याकरिता आवश्यक कार्यवाही करावी, अशी सूचना हॉटेल चालक व मालकांना केली. यावेळी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

कासव तस्करी करणाऱया दोघांना अटक

Amit Kulkarni

निलजीत आज भास्कर पेरे पाटील यांचे व्याख्यान

Amit Kulkarni

फळांचे दर सामान्यांच्या आवाक्यात

Amit Kulkarni

खानापूर-लेंढा-रामनगर महामार्ग पावसाळय़ापूर्वी खुला करा

Patil_p

सहकारातून प्रगती साधणे शक्य

Patil_p

टीईटी 4 ऑक्टोबर रोजी होणार

Patil_p
error: Content is protected !!