तरुण भारत

नव्या उपकरणांचा योग्यप्रकारे वापर करा

जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची सूचना : स्मार्ट सिटीसंदर्भात कमांड ऍण्ड कंट्रोल सेंटरमध्ये अधिकाऱयांची बैठक

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील प्रत्येक घरामध्ये आरएफआयडी उपकरण बसविण्यात येणार आहे. त्याचे कामकाज सध्या सुरू आहे. या उपकरणाद्वारे कचऱयाची उचल योग्यप्रकारे केली जाते की नाही, याची माहिती मिळणार आहे. कर्मचाऱयांनी कचरा उचलल्यानंतर त्या ठिकाणी स्कॅन करणे बंधनकारक आहे. स्कॅन केल्यानंतर ती अचूक माहिती स्मार्ट सिटीच्या कंट्रोल ऍण्ड कमांड सेंटरमध्ये उपलब्ध होणार आहे. त्या ठिकाणी ही माहिती संग्रहित होणार आहे. तेव्हा योग्यप्रकारे या नव्या उपकरणाचा वापर करण्याची सक्त ताकीद जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी महापालिका अधिकाऱयांना दिली आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत विश्वेश्वरय्यानगर येथील आधुनिक कमांड ऍण्ड कंट्रोल सेंटर येथे मंगळवारी अधिकाऱयांची बैठक झाली. त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱयांनी समज दिली आहे. शहरामध्ये एकूण 1 लाख 12 हजार 669 घरे आहेत. त्या सर्व घरांवर हे उपकरण बसविले जाणार आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत ही योजना लागू करण्यात आली आहे. कचऱयाबाबत जनतेकडून यापूर्वी होणाऱया तक्रारी या नवीन उपकरणामुळे कमी होणार आहेत. अधिकारीच बेजबाबदार कर्मचाऱयांवर आता यापुढे थेट कारवाई करू शकतात. या नवीन सेवेचा प्रत्येकाने फायदा घ्यावा, असे जिल्हाधिकाऱयांनी जनतेला आवाहन केले आहे.

स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण बागेवाडी म्हणाले, स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात आलेली उद्याने, पूल, हॉस्पिटल इमारती व डिजिटल पॅनलसह बहुतेक सुविधा बुडाकडे सोपविण्यात आल्या आहेत. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत कमांड ऍण्ड कंट्रोल सेंटरमध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. शहरातील वाहतूक, पर्यावरण, आरोग्य व इतर सेवेवर त्याचा चांगला परिणाम होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत अत्यंत दर्जेदार सेवा त्वरित नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी गुन्हेगारी प्रकरणामध्येही या कमांड सेंटरचा उपयोग होणार आहे, असे सांगून  सीसीटीव्ही फुटेज, आरटीओ आणि पोलीस विभागाच्या विविध यंत्रणेशी हे कमांड सेंटर जोडणे आवश्यक असल्याचे सांगितले. या नवीन उपकरणामुळे गुन्हय़ांनादेखील आळा बसू शकतो. तेव्हा त्यादृष्टिने पाऊल उचलावे, असे त्यांनी
सांगितले.

मनपा आयुक्त डॉ. रुदेश घाळी म्हणाले, स्मार्ट सिटीअंतर्गत अत्याधुनिक अशा सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्याचा पुरेपूर उपयोग करणे गरजेचे आहे. त्यासाठी योग्यप्रकारे नियोजन करूनच उपाययोजना केल्या जातील, याचे नियोजन करावे, असे सांगितले.

सिटीस्कॅन ऍपद्वारे जीपीएस बसस्थानकदेखील सज्ज होणार

सिटीस्कॅन ऍपद्वारे शहरात जीपीएस बसस्थानकदेखील सज्ज होणार आहेत. त्या ठिकाणी प्रवाशांना अचूक माहिती मिळणार आहे. प्रत्येक ठिकाणी प्रवासासंदर्भात डिस्प्ले तसेच बसचे वेळापत्रकदेखील प्रवाशांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. बसमध्येदेखील वायफाय उपलब्ध होणार आहे, असे स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रवीण बागेवाडी यांनी सांगितले. शहरात 9 ठिकाणी पोल उभे केले जाणार आहेत. त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविले जाणार आहेत. वायूप्रदूषणाची माहिती तसेच आपत्कालीन परिस्थितीची माहिती कळविण्यासाठी पॅनिक बटनदेखील उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आपत्कालीन परिस्थितीसाठी ग्रीन कॉरिडॉरप्रणाली तयार करणार

स्मार्ट सिटीअंतर्गत वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी रहदारीबाबत आराखडा तयार करण्यात आला आहे. शहरातील अंतर्गत वाहतूक कशाप्रकारे असावी, याचे नियोजन केले जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन परिस्थितीसाठी ग्रीन कॉरिडॉरप्रणालीही तयार केली जाणार आहे. शहरात विविध ठिकाणी एलईडी बसविण्यात येणार आहेत. पाणीपुरवठा मंडळालाही स्मार्ट बनविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. क्लोरीनयुक्त पाणी पुरविण्यासाठी मीटर बसविणे व इतर सुविधांसाठी पाणीपुरवठा मंडळाला कमांड सेंटरद्वारे माहिती दिली जाणार आहे. कचऱयाची विल्हेवाट लावणे, घनकचरा व्यवस्थापन यावरही अधिक नजर ठेवली जाणार आहे. कचरा वाहनांवरही जीपीएसद्वारेच नजर ठेवली जाणार आहे. कचऱयाबाबत अधिक गांभीर्य घेतले असून कचऱयाचे योग्य नियोजन करण्यासाठी शहरात 20 ठिकाणी कॅमेरे बसविले जाणार आहेत.

या बैठकीला परिवहन विभागाचे एसपी शरण्णाप्पा, माहिती आणि जनसंपर्क विभागाचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

‘माझे बेळगाव’ नागरिकांसाठी मोबाईल ऍप

शासकीय सेवा, बस वाहतूक, बसस्थानक, हवामान, तक्रार आणि इतर सुविधांबाबत मोबाईल ऍप सुरू केले जाणार आहे. ‘माझे बेळगाव’ असे या मोबाईल ऍपचे नाव असेल. त्यावर दररोज माहिती उपलब्ध केली जाणार आहे. दरम्यान कोणत्याही विभागाची तक्रार दाखल करायची असल्यास त्या ऍपवर जाऊन संबंधित विभागाकडे थेट तक्रार करता येणार आहे. कोणतीही घटना घडल्यानंतर पोलिसांची गरज भासल्यास, आगीचा धोका, अपघात, वाहतूक समस्या निर्माण झाल्यास तसेच आपत्कालीन परिस्थितीची माहिती देण्यासाठी हे ऍप साऱयांनाच उपयुक्त ठरणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

Related Stories

मंथन सोसायटीतर्फे 2 रोजी ‘मधुरभेट’ कार्यक्रम

Patil_p

फॉर्म हाऊसवर झोपलेल्या वॉचमनचा खून

Rohan_P

भक्त प्रल्हाद केंद्राच्यावतीने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

Omkar B

कर्लेत गवत गंजीला आग लागून शेतकऱयाचे 75 हजाराचे नुकसान

Patil_p

महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले

Amit Kulkarni

ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य रामभरोसे

Patil_p
error: Content is protected !!