तरुण भारत

राजर्षी शाहू महाराज अन् सर विश्वेश्वरय्या !

संजीव खाडे/कोल्हापूर

लेखामध्ये शाहू महाराज, सर विश्वेश्वरय्या यांचे फोटो वापरणे

Advertisements

कोल्हापूर संस्थानला अखंड हिंदूस्थानातील सर्वोत्तम संस्थान म्हणून उभे करण्याचे स्वफ्न पाहणाऱया बहुजन उद्धारक लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक समतेचा आग्रह धरताना सर्वच क्षेत्रात केलेले कार्य केवळ महानच नव्हे तर दिशादर्शक ठरले आहे. आपल्या रयतेला शिक्षण मिळावे, शैक्षणिक, आर्थिकदृष्टय़ा आपली रयत समृद्ध व्हावी, यासाठी शाहू महाराजांनी ध्यास घेतला होता. शाहूंची जलनीती हा तर शाहू संशोधक आणि अभ्यासकांसाठी अभ्यासाचा, संशोधनाचा विषय. 1902 साली युरोप दौऱयावर विविध देश पाहून आल्यानंतर त्यांच्या मनात कोल्हापूर संस्थानमधील पाण्याचे दुर्भिक्ष कायमचे दूर करण्यासाठी विचार सुरू झाला. योजना राबविण्यासाठी त्यांनी आपल्या संस्थानच्या पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱयांना पडताळणी करण्याचे आदेश दिले. हे करत असताना त्यांची नजर होती ती त्या काळातील भारतातील पहिले इंजिनिअर सर मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या यांच्याकडे. महाराजांनी त्यांना रितसर आमंत्रण दिले. सर विश्वेश्वरय्या दोनवेळा कोल्हापूर संस्थानमध्ये आले. शाहूंच्या जलनीतीमध्ये, राधानगरी आणि नंतरच्या काळात उभारले गेलेल्या काळम्मावाडी धरणाच्या उभारणीतही त्यांचा सल्ला मोलाचा राहिला. शाहू महाराज, सर विश्वेश्वरय्या यांच्यातील ऋणानुबंधावर अभियंता दिनाच्या रूपाने टाकलेला प्रकाशझोत.

20 व्या शतकाच्या पहिल्या दशकातील तो काळ. शाहू महाराज त्यावेळी केवळ 28 वर्षांचे होते. युरोपच्या दौऱयावर ते अभ्यासासाठी गेले होते. या दौऱयात या धेय्यवादी राजाची नजर त्या त्या देशातील जनहिताच्या, जनविकासांच्या योजना, प्रकल्प आणि उपक्रमांवर होती. 1902 मध्ये ते युरोप दौऱयावर कोल्हापूर संस्थानात परतले. तेथे पाण्याची भरलेली धरणे महाराजांनी पाहिली होती. त्यातून आपल्या संस्थानातही धरण बांधावे, असा विचार त्यांच्या मनात सुरू झाला. विचाराबरोबर धरणे उभारणे हे त्यांचे स्वफ्नच बनले. त्यांनी आपल्या संस्थानातील पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱयांना धरण बांधण्यासाठी जागेची पडताळणी करण्याचे आदेश दिले. महाराज ऐवढय़ावर थांबले नाही तर त्यांनी थेट इंजिनिअरचा देव असणाऱया त्या काळातील सर्वोत्तम इंजिनिअर अर्थात अभियंते सर मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या यांना थेट पत्र पाठवून मानाने कोल्हापूर संस्थानला भेट देण्याचे निमंत्रण दिले. सर विश्वेश्वरय्या यांच्यासारखा त्या काळातील सर्वोत्तम, जागतिक कीर्तीच्या महान अभियंत्याने महाराजांच्या निमंत्रणाला मान देत कोल्हापूर संस्थानला एक वेळा नव्हे तर चक्क दोनवेळा भेट दिली.

सर विश्वेश्वरय्या यांची पहिली भेट
शाहू महाराजांच्या खास निमंत्रावरून 1903 साली सर विश्वेशरय्या कोल्हापूर संस्थानच्या भेटीसाठी आले. महाराजांनी त्यांना आपल्या रयतेसाठी धरण उभारण्याची संकल्पना सांगितली. आपण कोल्हापूर संस्थानचा दौरा करावा, धरणासाठी आवश्यक जागेचे सर्व्हेक्षण करावे, जागा निश्चित करावी आणि अहवाल द्यावा, अशी विनंती केली. सर विश्वेश्वरय्या यांनी कोल्हापूर संस्थानचा दौरा केला. जलस्त्राsत असणाऱया सर्व ठिकाणी भेट दिली. संपूर्ण अभ्यास करून त्यांनी अहवाल सादर केला. सध्या काळम्मावाडी धरण आहे, त्या ठिकाणच्या जागी धरण बांधावे, असा सल्ला त्यांनी दिला. काळम्मावाडीच्या जागेत प्रचंड पर्जन्यमान आहे, प्रचंड पाणीसाठा आहे, या ठिकाणी धरण उभारल्यास खर्चही कमी येईल, अशी निरीक्षणे विश्वेशरय्या यांनी अहवालात नमूद केली होती.

अहवाल पाहिल्यानंतर शाहू महाराजांनी त्यांच्याशी चर्चा केली. काळम्मावाडीची जागा चांगली आहे, पण या ठिकाणी धरण उभारल्यास त्याचा माझ्या संस्थानातील रयतेला आवश्यक तेवढा लाभ मिळणार नाही, असे सांगत महाराजांनी सर विश्वेश्वरय्या यांचा प्रस्ताव अमान्य केला. पुढे महाराजांनी राधानगरी तालुक्यातील फेजिवडे गावाजवळ भोगावती नदीवर राधानगरी धरण बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला. नोव्हेंबर 1909 मध्ये धरणाच्या पायाभरणीचा कार्यक्रम महाराणी लक्ष्मीबाई यांच्या हस्ते झाला. पुढे या धरण उभारणीत पहिल्या, दुसऱया महायुद्धाच्या काळाबरोबर अनेक अडथळे आले. 6 मे 1922 रोजी शाहू महाराज यांचे निधन झाले. नंतर त्यांचे सुपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी धरण पूर्ण करण्यासाठी जीवापाड प्रयत्न केले. प्रत्यक्षात धरण पूर्ण होण्यास 1954 चा काळ उजडला. शाहू महाराजांनी पाहिले स्वफ्न पूर्ण झाले.

विश्वेश्वरय्या यांची दुसरी भेट
राधानगरी धरण बांधण्याआधी सर विश्वेशरय्या यांनी दाखविलेली काळम्मावाडीची जागा शाहू महाराजांनी अमान्य केली होती. त्यानंतरही शाहू महाराज आणि सर विश्वेश्वरय्या यांच्यातील ऋणानुबंध कायम होता. महाराजांच्या कार्यावर, तळमळीवर सर विश्वेश्वरय्या यांचा विश्वास होता. तर सर विश्वेश्वरय्या यांच्या अभियंत्रिकी क्षेत्रातील उत्तुंग ज्ञानाचे महत्व लोकराजा शाहू महाराजांना माहीत होते. म्हणून त्यांनी 1907 मध्ये त्यांना पुन्हा कोल्हापूर संस्थानच्या भेटीसाठी निमंत्रण दिले. पहिल्या भेटीतील आपला सल्ला नाकारला असला तरी सर विश्वेश्वरय्या कोल्हापूरमध्ये आले. त्यांनी कळंबा तलाव आणि पाण्याचा खजिना (आताच्या नंगीवली तालमीजवळील पाण्याचा खजिना) यांची पाहणी करून सायपन पद्धतीचे कौतुकही केले. काही सूचनाही केल्या. पुढे महाराजांनी सूचनांची मोठय़ा मनाने आणि प्रामाणिकपणे अंमलबाजावणीही केली. या दोन महान व्यक्तीमत्वांच्या या दोन भेटींना आपल्या देशाच्या इतिहासात अतुलनीय असे स्थान आहे.

काळम्मावाडी अन् सर विश्वेश्वरय्या
1903 च्या सर विश्वेश्वरय्या यांनी काळम्मावाडीची जागा धरणासाठी सूचविली होती. त्यांच्या अहवालावर आधारीत पुढे स्वतंत्र भारतात काळम्मावाडीत मोठे धरण आकारास आले. राधानगरी धरण 8.35 टीएमसी तर काळम्मावाडी धरण 28 टीएमसी क्षमतेचे आहे. काळम्मावाडी धरणाच्या उभारणीचे बीज सर विश्वेश्वरय्या यांनी लावले होते, असे म्हटले तर ते योग्यच होईल.

Related Stories

मलकापूर येथे विनापरवाना दारू वाहतूक करणाऱ्या एकास अटक

triratna

प्राथमिक आरोग्य केंद्रे सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील

triratna

कोल्हापुरातील ‘त्या’ दोन्ही मृतांची कोरोना चाचणी निगेटिव्ह

triratna

कोल्हापूर महापालिका प्रशासक आणि कर्मचारी संघातील चर्चा फिस्कटली

triratna

एसटी बस थांबवली नाही म्हणून वाहकाला बेदम मारहाण

triratna

राहुल पाटील जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष

triratna
error: Content is protected !!