तरुण भारत

टी-20 नेतृत्वाचा ‘विराट’ राजीनामा

आगामी टी-20 विश्वचषकानंतर नेतृत्वावरुन पायउतार होण्याची घोषणा : नेतृत्वबदलाच्या चर्चेवर अखेर शिक्कामोर्तब, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये रंगणार यंदाचा विश्वचषक

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisements

संयुक्त अरब अमिरातमध्ये होणाऱया आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर आपण टी-20 संघाच्या कर्णधारपदावरुन पायउतार होत असल्याची घोषणा विराट कोहलीने गुरुवारी केली. टी-20 कर्णधारपद सोडणार असला तरी वनडे व कसोटी क्रिकेटमध्ये नेतृत्व करत राहीन, असे 32 वर्षीय विराटने स्पष्ट केले. आपल्या ट्वीटर हँडलवरुन त्याने ही घोषणा केली. आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धा दि. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत खेळवली जाणार आहे.

मागील काही दिवसांपासून विराट कोहलीच्या नेतृत्वाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. त्याचप्रमाणे, विश्वचषकानंतर भारतीय संघ नेतृत्वात बदल होणार असल्याचे चर्चिले जात होते, त्यावर येथे शिक्कामोर्तब झाले.

विराटने राजीनामा जाहीर केल्याने टी-20 विश्वचषकानंतर रोहित शर्माकडे ही जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. मुळात, आयपीएलमध्ये रोहितने मुंबईला पाचवेळा जेतेपद संपादन करुन दिले असल्याने रोहितच्या रुपाने सक्षम पर्याय उभा राहिल्याचे चित्र होते.

दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी कार्यकारिणीची विराटशी याबद्दल चर्चा सुरु असल्याचे स्पष्ट केले. ‘टीम इंडियासाठी आमची ध्येयधोरणे स्पष्ट आहेत. अतिरिक्त जबाबदारी, वर्कलोड मॅनेजमेंट या बाबी लक्षात घेत विराटने आगामी विश्वचषकानंतर नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला. मागील 6 महिन्यांपासून मी स्वतः विराट कोहली व अन्य संबंधित घटक, पदाधिकाऱयांशी चर्चा करत आलो आहे. विराट कोहली विश्वचषकानंतर खेळाडू व अनुभवी सदस्य या नात्यानेही योगदान देत राहील’, असे बीसीसीआय सचिव जय शाह यांनी नमूद केले.

विराटने यापूर्वी 2017 मध्ये महेंद्रसिंग धोनीकडून मर्यादित षटकाच्या क्रिकेटमधील नेतृत्वाची धुरा स्वीकारली होती. ‘टी-20 कर्णधार या नात्याने हरसंभव योगदान देण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला आणि विश्वचषकात देखील माझा तोच प्रयत्न असेल. फलंदाज या नात्याने टी-20 मध्ये सातत्यपूर्ण योगदान देणे हा यापुढेही प्राधान्यक्रम असेल’, असे विराट याप्रसंगी म्हणाला.

‘टी-20 नेतृत्वावरुन पायउतार होण्यापूर्वी मी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, संघसहकारी रोहित शर्मा यांच्याशी सर्वप्रथम चर्चा केली. शिवाय, बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली, सचिव जय शाह, निवड समितीचे सदस्य यांच्याशी देखील याबद्दल संवाद साधला’, असे या दिग्गज फलंदाजाने पुढे नमूद
केले.

विराट कोहलीने टी-20 क्रिकेटमध्ये 90 सामने खेळले असून त्यात 28 अर्धशतकांसह 3159 धावांचे योगदान दिले. त्याने भारतीय संघातर्फे 45 सामन्यात नेतृत्व भूषवले आणि यात कर्णधार या नात्याने 27 विजय व 14 पराभव अशी त्याची कामगिरी राहिली. त्याची विजयाची टक्केवारी 65.11 इतकी
राहिली.

कर्णधार या नात्याने विराटची कामगिरी

सामने : 45, विजय : 27, पराभव : 14,  टाय : 2, रद्द : 2.

मागील 8-9 वर्षांपासून मी सातत्याने तिन्ही क्रिकेट प्रकारात खेळत आलो आहे आणि 5-6 वर्षांपासून सातत्याने नेतृत्वही भूषवत आलो. पण, भारतीय संघाचे कसोटी व वनडेत नेतृत्व आणखी सक्षमपणे सांभाळण्यासाठी स्वतःला स्पेस देण्याची आवश्यकता मला भासते आहे, वर्कलोड मॅनेजमेंटही महत्त्वाचे आहे आणि त्या अनुषंगाने मी वर्ल्डकपनंतर टी-20 नेतृत्वाचा राजीनामा देत आहे.

-भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली

मागील 8 दिवसात नेमके काय बदलले?

टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी 8 दिवसांपूर्वीच भारतीय संघनिवडीसाठी ऑनलाईन बैठक झाली, त्यावेळी कर्णधार कोहली अर्थातच त्यात सहभागी होता. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये संयुक्त अरब अमिरातीत होणाऱया आगामी विश्वचषकासाठी संघनिवडीच्या दृष्टीने अनेक विषयावर त्यावेळी सविस्तर चर्चा झाली. मात्र, त्या बैठकीनंतर अवघ्या 8 दिवसाच्या आतच विराटने टी-20 कर्णधारपदाचा राजीनामा देणे आश्चर्याचे मानले जाते.

प्रत्यक्ष संघनिवडीत मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सातत्याने खेळत आलेल्या व विराटच्या प्रथम पसंतीच्या यजुवेंद्र चहलला वगळले गेले होते आणि आपली मते रोखठोक मांडणाऱया अश्विनचा संघात समावेश केला गेला होता. त्या बैठकीत अश्विनच्या निवडीचा मुद्दा आला, त्यावेळी वॉशिंग्टन सुंदर खेळू शकत नसेल तरच अश्विनला संधी द्यावी, अशी अट विराटने घातली होती, अशी चर्चा आहे.

राजीनामा देण्यापूर्वी विराटची ‘त्या’ दोघांशी चर्चा!

विराटने टी-20 क्रिकेट संघाच्या नेतृत्वाचा राजीनामा देण्यापूर्वी दोघांशी चर्चा केली असल्याचे यावेळी स्पष्ट केले आणि यात मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री, संघसहकारी रोहित शर्मा यांचा समावेश राहिला. रवी भाई व रोहित हे नेहमीच महत्त्वाचा घटक राहिले आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच मी हा निर्णय घेतला, असे विराट याप्रसंगी म्हणाला.

वर्ल्डकपनंतर टी-20 नेतृत्वासाठी रोहित शर्मा आघाडीवर

आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर विराट टी-20 नेतृत्वावरुन पायउतार होईल, त्यावेळी रोहित शर्मा नवा कर्णधार असू शकेल, असे सध्याचे संकेत आहेत. रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला आजवर पाचवेळा जेतेपद मिळवून दिले असल्याने हा अनुभव त्याच्यासाठी जमेची बाजू असणार आहे. विश्वचषकानंतर न्यूझीलंडचा संघ भारत दौऱयावर येणार असून त्यावेळी यजमान संघ नव्या कर्णधारासह मैदानात उतरेल.

विराटच्या टी-20 नेतृत्व कारकिर्दीतील ठळक वैशिष्टय़े

  • 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिला टी-20 मालिकाविजय
  • 2018 मध्ये द. आफ्रिकेविरुद्ध पहिला मालिकाविजय
  • याच वर्षात इंग्लंडविरुद्ध मायभूमीत 2-1 फरकाने विजय
  • 2019-20 मध्ये न्यूझीलंडला 5-0 फरकाने नमवले
  • 2020 मध्ये वनडे मालिकापराभवानंतर टी-20 मालिका जिंकली
  • अगदी अलीकडे इंग्लंडविरुद्ध 3-2 ने विजय, विराट मालिकावीर
  • टी-20 मध्ये विराट 52.65 च्या सरासरीने 3159 धावांसह आघाडीवर

मंडळाचा शास्त्री-कोहलीपेक्षाही धोनीवर अधिक भरवसा? धोनी मात्र तूर्तास राजी नाही!

भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळताना विराट कोहलीला 2017 चॅम्पियन्स चषक, 2019 वनडे विश्वचषक व 2021 डब्ल्यूटीसी कसोटी चॅम्पियनशिप जिंकून देण्यात यश आलेले नाही. त्यामुळे, भारतीय संघव्यवस्थापन विराटला आयसीसी स्पर्धांमध्ये यापुढे तरी आणखी संधी देण्याच्या मानसिकतेत नाही. मंडळाचा शास्त्री-विराट यांच्यापेक्षाही धोनीच्या ‘क्रिकेटिंग ब्रेन’वर अधिक विश्वास आहे, असे धोनीला टी-20 वर्ल्डकपसाठी मेंटर म्हणून नियुक्त केले, त्यावरुन दिसून आले आहे. मात्र, लोढा कमिटीच्या सुधारणा पाहता, स्वतः धोनीही आताच मुख्य प्रशिक्षकपदासाठी फारसा इच्छुक नसल्याचे स्पष्ट संकेत आहेत.

धोनी तूर्तास आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सचे नेतृत्व भूषवत आहे आणि ही जबाबदारी इतक्यात सोडण्याची त्याची तयारी नाही. त्यामुळे, आयपीएल खेळत असेतोवर तो मुख्य प्रशिक्षकपदासाठी इच्छुक नसेल, असे सध्याचे चित्र आहे. धोनीला टी-20 वर्ल्डकपसाठी मेंटर केले, हा त्याला मुख्य प्रशिक्षकपदासाठी नेमण्याच्या मोहिमेचा एक भाग समजला जातो.

Related Stories

पॅट्रीअट्स उपांत्य फेरीत, गयाना, सेंट लुसिया किंग्ज विजयी

Patil_p

वावरिंका सलामी लढतीत गारद

Patil_p

पोर्तुगालच्या रोनाल्डोचा 750 वा गोल

Patil_p

बुमराह म्हणतो, मी फक्त माझी जबाबदारी पार पाडतो!

Patil_p

देशभरात ऑनलाईन क्लासेसची चलती : माजी क्रिकेटपटू शिवरामकृष्णन

Patil_p

राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी साताऱ्यातील तिघांची निवड

datta jadhav
error: Content is protected !!