तरुण भारत

प्रवासी वाहतुकीचा परवाना अखेर प्राप्त

चिपी विमानतळ : खासदार विनायक राऊत यांची माहिती : नऊ ऑक्टोबरपासून सुरू होणार सेवा : रोज येणार एक विमान

प्रतिनिधी / कुडाळ:

Advertisements

चिपी-परुळे येथे बांधण्यात आलेल्या सिंधुदुर्ग विमानतळावरून प्रवासी वाहतूक करण्यासाठी अखेर शुक्रवारी परवाना मिळाला, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी शनिवारी देत परवान्याची प्रतही दाखविली. त्यामुळे नऊ ऑक्टोबरपासून चिपी विमानतळावरून विमान प्रवासी सेवा सुरू होणार आहे. रोज 72 आसनी एक विमान मुंबईहून सिंधुदुर्ग (चिपी) येथे येईल व पुन्हा मुंबईला जाईल, असे त्यांनी सांगितले.

आपल्या निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. चिपी विमानतळाला येरोडम परवाना मिळाला असून पब्लिक यूज, आयआरबी सिंधुदुर्ग एअरपोर्ट लि. फॉर सिंधुदुर्ग एअरपोर्ट सिंधुदुर्ग, असा डीजीसीएचे चेअरमन अरुणकुमार यांच्या स्वाक्षरीने 17 सप्टेंबर रोजीच्या पत्राने हा परवाना मिळाला आहे. ए. आर. एफ. एफ. कॅटेगरीमध्ये डे (दिवसा) ऑपरेशनसाठी ही परवानगी मिळाल्याचे राऊत यांनी सांगितले.

     एअर अलाईन्सची विमान सेवा

चिपी विमानतळावरून विमान सेवा सुरू करण्याबाबत एअर अलाईन्स या विमान कंपनीने सर्व्हे केला होता. सुरुवातीला आठवडय़ातून तीन विमानांसाठी प्रवासी मिळतील, असे सर्व्हेत पुढे आले. मात्र, नव्याने केलेल्या सर्व्हेनुसार रोज एक विमान उड्डाण झाल्यास प्रवासी मिळतील, असे पुढे आल्याने आता रोज एक विमान उड्डाण कंपनी चालवू शकेल, असे राऊत म्हणाले.

     सिंधुदुर्ग-रत्नागिरीचा उडाण योजनेत समावेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमान प्रवासी वाढावे, यासाठी ‘उडान’ योजना जाहीर केली. या योजनेत सिंधुदुर्ग-रत्नागिरी विमानतळांचा समावेश करावा, अशी मागणी आपण केली होती. योगायोगाने सुरेश प्रभू यांच्याकडे उड्डाण खाते आले आणि दोन्ही विमानतळांचा त्यांनी उडान योजनेत समावेश केला. त्यामुळे एअर अलाईन्सच्या विमानांना सवलतीचा प्रति प्रवासी अडीच हजार रु. तिकीट दर राहणार, असे राऊत यांनी सांगितले. चिपी विमानतळाच्या कामासह परवानगीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सुरेश प्रभू, राजू प्रताप रुढी, प्रफुल्ल पटेल यांच्यासह अन्य मंत्री, अधिकाऱयांचे सहकार्य लाभल्याचे ते म्हणाले.

      रोज एका विमानाचे उड्डाण

मुंबई विमानतळावर मुंबई-सिंधुदुर्ग (चिपी) विमान सेवेसाठी 7 ऑक्टोबरपासून एक स्लॉट उपलब्ध झाला आहे. 9 ऑक्टोबर रोजी विमानसेवेचा शुभारंभ होणार असून रोज दुपारी 12 वाजता मुंबई येथून विमान सुटून दुपारी 1.10 वाजता चिपी येथे पोहोचेल. दुपारी 1.35 वाजता चिपी येथून सुटून 2.45 वाजता मुंबईला पोहोचेल, अशी माहिती राऊत यांनी दिली.

      पाईस जेटनेही केला सर्व्हे

मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू करण्यासाठी पाईस जेट विमान कंपनीने सर्व्हे केला असून अन्य काही विमान कंपन्याही सेवा सुरू करण्यास इच्छुक आहेत. भविष्यात त्याही सर्व्हे करतील, असे राऊत यांनी सांगितले. मात्र, या कंपन्यांचे तिकीट दर थोडे जादा असतील, असे ते म्हणाले.

      पुढील आठवडय़ात बुकिंग सुरू

एअर अलाईन्स कंपनीने विमान सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली असून आवश्यक काऊंटर व अन्य सेवेचे काम सुरू केले आहे. पुढील आठवडय़ात विमान तिकिट बूकिंग सुरू करण्यात येणार आहे. चिपी विमानतळावरही सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

      कार्गो सेवा सुरू करण्याचा प्रयत्न

प्रवासी विमान सेवा सुरू करण्यास डीजीसीएने परवाना दिल्याने बराच काळ रेंगाळलेले काम झाले. आता कार्गो सेवा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील माशांना परदेशात मागणी आहे. त्या अनुषंगाने कार्गो सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून आंब्याची निर्यातही करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आल्याचे ते म्हणाले.

      प्रोटोकॉलप्रमाणे सर्वांना निमंत्रण

विमानतळ प्रवासी सेवा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र एविएशन कंपनी व एमआयडीसी यांच्यावतीने आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील. त्याचप्रमाणे हवाई मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हेही उपस्थित राहणार आहेत. नारायण राणे, सुभाष देसाईंसह प्रोटोकॉलप्रमाणे सर्वांना निमंत्रित करण्यात येईल. विमानतळाच्या परवानग्या व अन्य कामात सहकार्य करणारे खासदार सुरेश प्रभू, राजू प्रताप रुढी, प्रफुल्ल पटेल यांनाही निमंत्रित करणार, असे राऊत म्हणाले.

        राज्य सरकार-डीपीडीसीने मदत केल्याने प्रकल्प पूर्ण

विमानतळ विकासकाला राज्य सरकार व जिल्हा नियोजन मंडळाने मदत केल्याने प्रकल्प पूर्ण झाला. विद्यमान पालकमंत्री उदय सामंत, तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांचे सहकार्य लाभले, असे त्यांनी सांगितले.

           एअर स्पोर्टचा प्रयत्न करणार

चिपी विमानतळावर एअर स्पोर्ट सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. विमानतळ खासगी असल्याने विमानसेवेचा स्लॉट वगळून इतर वेळेत एअर स्पोर्ट सेवा सुरू करण्याबाबत विचार सुरू असून विकासक तसा प्रयत्न करेल, असे राऊत म्हणाले.

            बॅ. नाथ पै सिंधुदुर्ग (चिपी) असे नामकरण

सिंधुदुर्ग विमानतळाचे ‘बॅ. नाथ पै सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळ’, असे नामकरण होणार आहे. बॅ. नाथ पै तसेच प्रा. मधु दंडवते यांच्या नावांना विरोध करणे हास्यास्पद आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उपकेंद्राला प्रा. मधु दंडवते यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आहे. यामागे आमचा स्वार्थ नाही. चांगल्या माणसांची नावे सुचविली, असे राऊत म्हणाले.

               मेडिकल कॉलेज मान्यता अंतिम टप्प्यात

शासकीय मेडिकल कॉलेजच्या मान्यतेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. काही कागदपत्रांचे काम शिल्लक असून ते पूर्ण करण्यासाठी सर्व पातळय़ांवरून प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.

Related Stories

कोरोनामुळे खेड येथील वृद्धाचा मृत्यू

Patil_p

चाचण्या वाढल्याने जिल्हय़ात 849 गावे ‘कोरोनामुक्त’

Patil_p

रत्नागिरीहून चुनवरेत आलेला युवक ‘क्वारंटाईन’

NIKHIL_N

क्षणभरच जाणवली भीती अन् चोख बजावली डय़ुटी!

NIKHIL_N

“…पण आयत्या बिळातला नागोबा असता कामा नये”; विनायक राऊतांची राणेंवर टीका

triratna

आमदार राणेंकडून मिळालेल्या पीपीई किटस्चे डॉक्टरांना वाटप

NIKHIL_N
error: Content is protected !!