तरुण भारत

पर्यटन प्रकल्पांची कामे योग्यच

सावंतवाडीत पाहणीनंतर समितीचा निर्वाळा :  काही त्रुटी दूर करण्याच्या सूचना :  पुन्हा पाहणी करणार

वार्ताहर / सावंतवाडी:

Advertisements

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत चांदा ते बांदा योजनेंतर्गत जवळपास सव्वाचार कोटी रुपये खर्च करून सावंतवाडी शहरात चार प्रकल्पात विकासात्मक कामे करण्यात आली होती. शिवउद्यान व हेल्थ फार्म या दोन ठिकाणी काही कामे अद्यापही अपूर्णावस्थेत आहेत. ही कामे येत्या पाच दिवसात पूर्ण करा. जी काही किरकोळ कामे राहिली असतील ती पूर्ण करा. त्यानंतर 23 व 24 सप्टेंबरला सर्व कामांची तपासणी करण्यात येईल, असे चार सदस्यीय चौकशी समितीने पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱयांना सांगितले. निविदा प्रक्रियेनुसारच योग्य पद्धतीने कामे झाली आहेत. मात्र, दोन प्रकल्पात काही किरकोळ कामे राहिली आहेत, असे चौकशी समितीच्या निदर्शनास आले.

पालिकेच्या अखत्यारित असलेल्या पर्यटन विकास महामंडळाच्या चार प्रकल्पात कोटय़वधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. त्यातील फक्त एकच प्रकल्प शिल्पग्राम सध्या कार्यान्वित आहे. तीन प्रकल्प बंद आहेत. हे लवकरात लवकर सुरू होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा, असे चौकशी समितीचे अध्यक्ष राजाराम म्हात्रे यांनी महामंडळाच्या अधिकाऱयांना सांगितले. आणखी एकदा पाहणी केल्यानंतर अहवाल बनवला जाणार आहे. येत्या 15 दिवसात अहवाल जिल्हाधिकाऱयांना सादर करायचा असल्याचे समिती अध्यक्ष म्हात्रे यांनी स्पष्ट केले.

अध्यक्ष राजाराम म्हात्रे, सदस्य तथा बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत माने, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, अकाऊंट विभागाचे नितीन सावंत या समितीने शनिवारी सर्व प्रकल्पांचा पाहणी दौरा केला. सर्वप्रथम शिवउद्यानमधील खेळण्यांची पाहणी केली. मात्र, तेथे काही किरकोळ विजेची कामे अपूर्णावस्थेत आढळली. यावेळी चौकशी समितीचे अध्यक्ष म्हात्रे यांनी पर्यटन महामंडळाच्या अधिकाऱयांना चांगलेच सुनावले. ही कामे अपूर्णावस्थेत का? जी काही कामे किरकोळ स्वरुपाची आहेत, ती येत्या पाच दिवसात पूर्ण करा आणि सर्व खेळणी चालू स्थितीत ठेवा. गार्डनमधील खेळण्यांवर 83 लाख रुपये खर्च करण्यात आले. या सर्व कामांचीही त्यांनी पाहणी केली. त्यानंतर उभा बाजार येथील रघुनाथ मार्केटला भेट दिली. या दालनाचे उद्घाटन तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गेल्या दोन वर्षांपूर्वी केले होते. त्यानंतर हा प्रकल्प पालिकेच्या ताब्यात देण्यात आला. यासाठी जवळपास 23 लाख रुपये खर्च करण्यात आले. उद्घाटनानंतर रघुनाथ मार्केटचा दरवाजाही उघडला नव्हता. चौकशी समिती येणार म्हणून रघुनाथ मार्केट आज काही कालावधीसाठी उघडण्यात आले होते. तेथे अस्वच्छता आढळली. मात्र, प्रकल्प पाहून चौकशी समितीने समाधान व्यक्त केले. मात्र, एवढी मोठी वास्तू वापराविना पडून असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अनिल आवटी, पर्यटन महामंडळाचे अधिकारी कल्पे, ठेकेदार आर. के. सावंत उपस्थित होते.

शिल्पग्रामच्या कामावर समाधान

समितीने शिल्पग्राम येथेही पाहणी केली. शिल्पग्राम येथे सध्या सावंतवाडी नगरपालिकेच्या माध्यमातून हॉटेल उभारण्यात आले आहे. तेथे चौकशी समितीने जाऊन संपूर्ण परिसर पाहणी केली. येथे असलेले स्विमिंग पूल तसेच पर्यटन रिसॉर्ट आदी कामांची चौकशी केली. येथे चांगले काम झाल्याचेही चौकशी समितीच्या निदर्शनास आले. त्यानंतर हेल्थ फार्मचीही पाहणी केली. तेथे काही कामे अपूर्णावस्थेत आढळली. तेथे एसी बसवले नव्हते. तसेच काही किरकोळ विजेची कामे शिल्लक होती. ती पूर्ण करण्याचे निर्देश चौकशी समितीने दिले.

किरकोळ कामे अपूर्ण!

एकंदरीत पाहणी केल्यानंतर दोन प्रकल्पात किरकोळ कामे अपूर्ण आहेत. मात्र, निविदा प्रक्रियेनुसार कामे झाली आहेत. जी कामे अपूर्णावस्थेत आहेत ती पूर्ण करून घेतली जातील आणि त्यानंतर पुन्हा 23 व 24 सप्टेंबरला पाहणी केली जाईल. त्यानंतर अहवाल तयार करणार आहोत, असे चौकशी समितीचे अध्यक्ष म्हात्रे यांनी स्पष्ट केले.

त्रुटी, आक्षेप नाहीत!

जिल्हा नियोजन अधिकारी बुधावले म्हणाले, जवळपास 4 कोटी 15 लाख रुपये या चार प्रकल्पातील कामासाठी खर्च करण्यात आले. गार्डन व हेल्थ फार्म येथे सव्वादोन कोटी रुपये खर्च करण्यात आले. निविदा प्रक्रियेनुसार कामे झाली आहेत. त्यात कोणत्याही त्रुटी अथवा काही आक्षेप नाहीत. मात्र, संपूर्ण चौकशी व तपासणी केल्यानंतरच आम्ही अहवालात ते नमूद करू. या दौऱयातील ठेकेदार सावंत हे नाशिक येथील आहेत, तेही उपस्थित होते. ते म्हणाले, किरकोळ विजेची कामे आहेत ती पूर्ण करून दिली जातील. पर्यटन महामंडळाचे अधिकारी कल्पे यांनी गार्डन व हेल्थ फार्ममध्ये काही कामे अपूर्ण आहेत, ती आम्ही येत्या चार-पाच दिवसात पूर्ण करणार असल्याचे स्पष्ट केले. सदर चौकशी समितीने कामांची तब्बल तीन ते साडेतीन तास चौकशी केली. त्यानंतर सर्व निविदा व कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतरच पुढील आठवडय़ात अहवाल तयार केला जाणार आहे. मात्र, प्रथमदर्शनी चौकशी समितीने या प्रकल्पांच्या कामात कोणताही घोळ दिसत नसल्याचे स्पष्ट केले.

Related Stories

दोडामार्गातील जनआशीर्वाद यात्रा यशस्वी

NIKHIL_N

कणकवली तहसीलदारांकडून माणुसकीचे दर्शन

NIKHIL_N

कोकण किनारपट्टीवर ‘गुलाब’ चे पडसाद, जिल्हय़ात अलर्ट

Patil_p

चाकरमान्यांना घेऊन टॅव्हल्स, मिनी बसेसची अवैध ‘एन्ट्री’!

Patil_p

कोंढेतडवासियांचा पाण्यासाठी नगराध्यक्षांना घेराव

Patil_p

सांगेली प्रभारी सरपंचपदी रमाकांत राऊळ

Ganeshprasad Gogate
error: Content is protected !!