तरुण भारत

‘क्राईम’चा विळखा

अंकुश गुन्हेगारांवर हवा की मानसिकतेवर?

मुंबईतील अंधेरी साकीनाका परिसरात एका टेम्पोचालकाने 32 वषीय ओळखीच्या महिलेवर बलात्कार करून तिच्या शरीरावर विकृत आणि अमानुष रीतीने हल्ला करून खून केल्याच्या घटनेने समाजमन हेलावले आहे. अशाच पद्धतीने घर सोडून बाहेर पडलेल्या पुण्यातील अल्पवयीन मुलीला रिक्षाचालकाने मदतीच्या बहाण्याने रेल्वेस्थानकाच्या बाहेर काढून अत्याचार केला. नंतर   डझनभर मित्रांना बोलावून त्यांनाही अत्याचार करायला लावल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन्ही प्रकरणातील आरोपींना भूमिका तपासून त्यांच्या मदतीने पकडण्यात पोलिसांना यश आले असले तरी त्यांना भररस्त्यात फासावर लटकवावे, समाजाच्या हवाली करावे किंवा एन्काउंटर करावे अशा प्रकारची मागणी होत आहे. देशात दररोज 77 बलात्काराच्या घटना घडतात असा राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवाल सांगतो आहे. समाजातून संतप्त भावना व्यक्त होणे ही समाज जागृत असल्याची लक्षणे आहेत. मात्र केवळ फासावर लटकून आणि एन्काउंटर करून हा प्रश्न सुटत नाही. हे यापूर्वीच्या घटनांनीही दाखवून दिले आहे. यावर केवळ कायदा कठोर करणे हा उपाय नाही. इतर बाबीही बदलायला हव्यात. या विषयावर समाजाने शांतपणे विचार करावा यासाठीचा हा प्रयत्न…..

Advertisements

गुन्हेगारांना धाक का नाही ?

हा प्रश्न देशात कुठेही दुर्घटना घडली की विचारला जातो. कारण बहुतांश घटनांमध्ये सरकारी उदासिनता, दबाव, राजकारण आणि तक्रारदार व्यक्तीवरच संशय व्यक्त केला जातो. तक्रार, वैद्यकीय तपासणी उशिरा झाल्यास गुन्हा सिद्ध करण्यात अडचणी येतात. पुढे न्यायालयातही तारखांवर तारखा पडत राहतात. तक्रारदार महिलेच्या चारित्र्यावर संशय घेणे, तिच्या पेहरावावर आक्षेप घेऊन टिप्पणी करणे असे प्रकार घडल्याने तक्रारदार नाउमेद आणि आरोपी शिरजोर होतात.

समाजातून तीव्र संताप

बलात्काराच्या घटनांकडे इतके निष्काळजी आणि बेफिकीर पणे पाहिले जात असल्याने आणि आरोपींना शासन होत नसल्याने समाजात तीव्र संताप निर्माण होतो. आपल्या मुलीबाळी असुरक्षित आहेत अशी भावना निर्माण होते. त्यातून फासावर लटकवण्याची, समाजाच्या हवाली करण्याची किंवा पोलीस चकमकीत ठार करण्याची मागणी होते. त्यामागे गुन्हेगारांवर धाक बसावी ही भूमिका असते. दिल्लीत 2012 साली झालेल्या निर्भया किंवा त्यानंतर महाराष्ट्रातील कोपर्डी किंवा या दोन्हीही घटनांपूर्वी घडलेली खैरलांजी येथील घटना लक्षात घेतली तर बलात्कारानंतर आरोपींनी पिडीतेच्या गुप्तांगाला गंभीर इजा पोहोचवली आणि त्यांची हत्या केली. महाराष्ट्रातील दोन्ही घटनांमध्ये पूर्ववैमनस्य आणि जातीय किनार होती. दोन्ही बाबत मोठी आंदोलने झाली. दिल्लीचे निर्भया प्रकरण याहून वेगळे होते. त्यातील क्रूरता आणि घटनाक्रम सांगण्यास पिडीतेचा मित्र जिवंत वाचल्यामुळे जगासमोर वास्तव आले आणि संतप्त तरुणाईने देशभर आंदोलन पेटवले. जगभरातून लोक आंदोलनासाठी दिल्लीत आले. केंद्रीय सत्तेला सुरुंग लागला. पण गाजलेल्या तीनही घटनांचा निकाल वेळेत लागला नाहीच. आरोपींना झालेली फाशी बलात्काराबद्दल नव्हे तर खून आणि त्यासाठीच्या क्रौर्याबद्दल झाली. उत्तर प्रदेशातील हाथरस आणि उन्नावमध्ये राज्य सरकार आरोपींच्या पाठिशी असल्याचे आरोप झाले. पिडीतेच्या पित्याचा मारहाणीत मृत्यू, पिडिता, तिचा वकील असलेल्या गाडीला अपघात करुन मारण्याचा प्रयत्न झाल्याने भारताची जगभर निंदा झाली. अशा घटनांमुळे समाजाचा यंत्रणांवर विश्वास नाही. त्यामुळे एन्काउंटरची मागणी पुढे आली.

2004 साली महिलांकडून कोर्टाबाहेर ‘न्याय’

बलात्कारातील गुन्हेगार तारखा घेऊन राजरोस मोकाट फिरत असल्याचा संताप व्यक्त करत 13 ऑगस्ट 2004 रोजी नागपूर येथे न्यायालयाच्या आवारातच महिलांनी अक्कू यादव या गुंडाला लिंग ठेचून ठार केले. याप्रकरणी महिलांवर खुनाचा गुन्हा नोंद झाला. 2019 मध्ये हैदराबादेत डॉक्टर युवतीवर बलात्कार करून मृतदेह जाळणाऱया आरोपींना हैदराबाद पोलिसांनी एन्काउंटर केले. या प्रकरणात तीन पोलीस अधिकाऱयांवरही गंभीर करण्यात आली. अशा प्रकारच्या न्यायाचे समाजाकडून स्वागत झाले तरी त्यामुळे अशा घटना घडायच्या थांबलेल्या नाहीत. याचा अर्थ गुन्हेगारांवर अशा घटना नंतर वचक बसतो असे नाही. त्यासाठी अनेक मार्गांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.

…ही समाजविघातक व्यक्तिमत्त्व विकृती !

बलात्कार करुन खून करणारे केवळ गुन्हेगार नाही तर मनोविकृत असतात. या मनोविकृतीला समाज विघातक व्यक्तिमत्त्व विकृती किंवा इंग्रजीत ‘अँटीसोशल पर्सनॅलिटी डिसॉर्डर’ म्हणतात. असे सांगलीतील प्रसिद्ध डॉक्टर आणि अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील कार्यकर्ते प्रदीप पाटील सांगतात. त्यांच्या मते अशा व्यक्ती या खून करायला मागेपुढे पहात नाहीत. या व्यक्तींमध्ये हा दोष निर्माण होण्यास संस्कार आणि त्यांचा मेंदू दोन्ही कारणीभूत असतात. त्यांना रागावर नियंत्रण ठेवता येत नाही. एखाद्या गोष्टी करायच्या ठरवल्या आणि त्या विघातक आहेत हे लक्षात आले तरी त्याला थांबवता येत नाही. बहुसंख्य वेळा अशा व्यक्तींची कौटुंबिक परिस्थिती गंभीरपणे बिघडलेली असते. घरातील संस्कार करणाऱया व्यक्ती विकृत वागत असतात. सामाजिक परिसर हा विकृतींचे गुणगान करणारा असतो. कोणताही ताण आला तर त्याला तोंड देण्याची क्षमता अशा व्यक्तींमध्ये अतिशय कमी असते.

या गुन्हेगारीला रोखायचे की मानसिकतेला ?

कोणत्याही गुन्हेगारीला रोखणे हे पूर्णतः शक्मय नसले तरी प्रतिबंध मात्र करता येतो. हा प्रतिबंध कायदा करण्याने केला जातो तसाच मानसिकता बदलल्याने किंवा विकृत मानसिकतेला आवर घालण्याचे प्रशिक्षण दिल्याने होऊ शकतो. समाजातील वाढती विकृती रोखायची असेल तर शालेय स्तरापासूनच त्यासाठी धोरण आखून काम केले तर किमान येत्या पिढीच्या काळात तरी हे प्रकार रोखले जाऊ शकतील.

मानसिक आरोग्य आणि लैंगिकता शिक्षण

डॉ. प्रदीप पाटील यांच्या मते स्वीडन, नॉर्वेसारख्या देशांनी मानसिक आरोग्य आणि लैंगिकता शिक्षण इयत्ता चौथी पासूनच अभ्यासक्रमात सक्तीचे केले. त्याचा परिणाम म्हणून तिथे बलात्कार, खून अशा प्रकारच्या हिंसक कृत्यांचे प्रमाण लोकसंख्येच्या प्रमाणात अत्यंत नगण्य झाले आहे. भारतात स्त्री पुरुष समानता किंवा लिंग समानता, दुसऱयाच्या मताचा आदर, एखादा वादाचा प्रसंग हाताळण्यासाठीची संवाद शैली आणि स्वतःच्या व्यक्तिमत्त्वातील वर्चस्व गाजवण्यापासून हिंसक दोषांची जाणीव करून देणाऱया शिक्षणाची आणि उपचार, समुपदेशन करून घेण्याच्या शिक्षणाची आवश्यकता आहे. त्यामुळे ती व्यक्ती असे गंभीर कृत्य करणार नाही किंवा स्त्री असे संकट आले तर ते कसे टाळता येईल किंवा त्याविरोधात खंबीरपणे उभे राहून स्वतःचा बचाव कसा करता येईल हे समजू शकतील. किमान ओळखीच्या व्यक्तींकडून होणाऱया गुह्यांचे प्रमाण यातून कमी होऊ शकते. विकृतीकडे वाटचाल करणारा व्यक्ती स्वतःतील दोष माहिती असल्याने उपचार किंवा स्वतःवर नियंत्रण ठेऊ शकेल. कायदे वगैरेची धडाडी दाखवणाऱया केंद्र किंवा राज्य सरकारांनी देशभर हा सुद्धा प्रमुख करण्याची आवश्यकता आहे. विविध कारणांनी या प्रयोगाची गरज अधोरेखित झालेली आहेच.

एनसीआरबी अहवाल सांगतो…

देशात दिवसाला 77 बलात्कार तर 80 हत्येच्या घटना

एनसीआरबी अर्थात राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालामध्ये देशातल्या गुन्हेगारीचा आलेख समोर आला आहे. लॉकडाऊनच्या वर्षात गुन्हेगारीच्या संख्येवर काय परिणाम झाला याचे उत्तर या अहवालातून मिळालेच, सोबत कुठल्या राज्यांत ही आकडेवारी कमी अधिक आहे याचंही चित्र समोर आले आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार, 2020 मध्ये देशभरात दररोज सरासरी 77 बलात्काराचे गुन्हे नोंदवले गेले. गेल्या वषी बलात्काराचे एकूण 28,046 गुन्हे नोंदवण्यात आले होते. देशात अशा प्रकारची जास्तीत जास्त प्रकरणे राजस्थानमध्ये आणि दुसरी उत्तर प्रदेशात नोंदली गेली. एनसीआरबीने म्हटले आहे की, गेल्या वषी देशभरात महिलांविरुद्ध एकूण 3,71,503 गुन्हे नोंदवले गेले. जे 2019 मध्ये 4,05,326 आणि 2018 मध्ये 3,78,236 होते. एनसीआरबीच्या नव्या आकडेवारीनुसार, 2020 मध्ये महिलांविरोधातील गुह्यांपैकी 28,046 बलात्कार झाले, ज्यात 28,153 पीडित आहेत. गेल्या वषी कोविड-19 मुळे लॉकडाऊन लागू करण्यात आले होते तरीही अशा घटना घडतच होत्या. सोबतच ऑनलाईन फ्रॉड, सायबर क्राईमसारख्या आधुनिक शैलीच्या गुह्यांमध्येही वाढ चिंताजनक आहे.

कुटुंबातील/ओळखीच्या व्यक्तींकडूनच....

गुन्हेगारी संबंधी रेकॉर्ड सांगते ज्या स्त्रीवर बलात्कार होतो त्या स्त्रीला ओळखणारे जवळपास 94 टक्के असतात ! बाहेरचे अनोळखी यांच्याकडून दुष्कृत्ये तुलनेने खूपच कमी. उपलब्ध आकडेवारीनुसार दर सोळा मिनिटाला एक बलात्कार होत असतो आणि… चारपैकी एकाला शिक्षा होते.

बलात्काराचा सर्वाधिक धोका

प्रिय व्यक्तींकडून 46 टक्के

खास मित्रांकडून 22 टक्के

तोंड ओळखीच्या 19 टक्के

जोडीदाराकडून     9 टक्के

अनोळखी व्यक्ती   4 टक्के

मेट्रो शहरांतील गुन्हेगारीत मुंबईचा देशात दुसरा क्रमांक

मुंबई ही देशात महिलांसाठी सर्वात सुरक्षित असे शहर म्हणून समजले जाते, पण नुकत्याच गुन्हेगारीशी संबंधित समोर आलेल्या आकडेवारीनुसार मुंबई शहराचा गुन्हेगारीत दुसरा क्रमांक आढळला आहे. मुंबईत गेल्या वर्षात 4583 गुन्हय़ाच्या घटनांची आकडेवारी समोर आली आहे. तसेच महिलांना अपमानास्पद वागणूक देण्याची एकूण 455 प्रकरणे मुंबईत 2020 या सालात नोंदवली गेली. तर 769 प्रकरणे ही महिलांच्या अपहरणाशी संबंधित होती. मुंबई शहर हे गुन्हेगारीच्या बाबतीत दुसरे मेट्रोपॉलिटन शहर ठरले आहे. लॉकडाऊनमुळे मुंबईतील गुन्हेगारीच्या दरात 30 टक्के घट झाली आहे. गेल्या दोन वर्षांच्या आकडेवारी मुंबईतील गुन्हेगारीचा दर घसरलेला आहे. पण मेट्रो शहरांच्या तुलनेत मुंबई शहराचा क्रमांक हा गुन्हेगारीत दुसरा आहे.

मेट्रो शहरांच्या यादीत दिल्लीत सर्वाधिक गुन्हे

देशातल्या 19 मोठय़ा शहरांची मेट्रो शहर म्हणून गणना केली जाते. या सर्व शहरात होणाऱया बलात्कारांपैकी 40 टक्के बलात्कार हे एकटय़ा दिल्लीत तर एकूण हत्येच्या गुह्यांपैकी 25 टक्के हे दिल्लीतील आहेत. 2019 आणि 2020 या दोन वर्षांची तुलना केली तर बलात्कार, हत्येच्या गुह्यांचे प्रमाण कमीही झाले. पण हा बदल केवळ लॉकडाऊनमुळे झालेला आहे का हादेखील प्रश्न आहे.

Related Stories

चला पंढरीसी जाऊ ।

Patil_p

‘स्मार्ट केन’ ची ‘स्मार्ट गोष्ट’

Patil_p

बदलाची फक्त गुगली, दादांची विकेट वाचली!

Patil_p

कर्नाटकात कोरोना नियंत्रणात मात्र हिवाळा धोक्याचा!

Patil_p

कोरोनाविरुद्धची रणनीतीः प्रश्नचिन्हेच प्रश्नचिन्हे

Patil_p

संस्मरणीय…

Patil_p
error: Content is protected !!