तरुण भारत

प्रतिष्ठित माणसामुळे सुसंस्कृत समाज घडतो

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे उद्गार, साहित्यिक रमेश वंसकर यांच्या गौरवग्रंथाचे प्रकाशन

सांस्कृतिक प्रतिनिधी/ फोंडा

Advertisements

स्थिर, सक्षम आणि देशाभिमानी समाज घडविण्यासाठी साहित्यिक, शिक्षण आणि विचारवंताबरोबरच तत्सम घटकांनी पुढाकार घ्यायला हवा. राष्ट्र जोडायचे असेल तर माणूस जोडला गेला पाहिजे. समाजाचे अखंडत्व आणि सदाचरण यामध्येच राष्ट्राला बळकटी येत असते. प्रतिष्ठीत माणसामुळे सुसंस्कृत समाज घडत असतो. त्यामुळे समाजात चांगुलपणाचे आणि संस्काराचे बीजारोपण करण्याची जबाबदारी कर्तव्य भावनेने स्वीकारयला हवी, असे उद्गार केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी काढले. ताळगाव येथील प्रियांका प्रकाशनने आयोजित केलेल्या पत्रकार तथा समाजसेवक रमेश वंसकर यांच्या गौरवग्रंथाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.

पणजी येथील इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर श्रीपाद नाईक यांच्यासमवेत गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत, ‘तरुण भारत’चे संपादकीय विभाग प्रमुख राजू भिकारो नाईक, गौरवमूर्ती रमेश वंसकर, सौ. भारती वंसकर, गौरवग्रंथाचे संपादक प्रकाश तळवडेकर व प्रकाशक सौ. प्रियांका तळवडेकर उपस्थित होत्या.

सामाजिक सुखदुखाशी जोडल्या माणसाकडूनच अर्थपूर्ण साहित्य निर्मिती- सामंत

व्रतस्थपणे कविता जगणारा माणूस उध्वस्त जगण्यामधून तसेच नैराश्यामधून निर्माण झालेली पोकळी संवेदनशिल आणि भावपूर्ण साहित्यामधून भरुन काढत असतो. नवसृजन निर्मितीची क्षमता आणि कुवत त्याच्या लेखणीमध्ये असते. कसदार साहित्य मानवी जीवनाला दृष्टी प्राप्त करुन देत असते आणि सामाजिक सुखदुखाशी जोडलेला माणूसच अर्थपूर्ण साहित्य तयार करु शकतो, असे यावेळी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना प्रा. अनिल सामंत म्हणाले.

‘मास्तर’ हा फळ्य़ावरील खडू सारखा झिजून जाता कामा नये तर एका वातीने शेकडो वाती पेटविण्याची आणि सगळीकडे प्रकाशमान कसे होईल याचा सातत्याने विचार करण्याची कुवत असलेला द्रष्टा शिक्षक हा गुरु असतो जो सामान्याना ज्ञान मार्गाचेच नव्हे तर ताठ मानेने जगण्याच्या सन्मार्गाचे दर्शन घडवित असतो, असे सामंत पुढे म्हणाले.

यावेळी बोलताना विशेष अतिथी राजू नाईक म्हणाले की, संकल्प सिद्धीस नेल्याशिवाय स्वस्थ न बसणारे रमेश वंसकर यांच्याकडे नेतृत्व गुण आहेत. माणसे जोडण्याची कला त्यांना अवगत आहे. ते कार्यसक्त तर आहेतच पण सार्वजनिक क्षेत्रात वावरताना लोकवशता आणि हितचिंतक हिच त्यांची उर्जा आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे श्रीपाद नाईक यांच्याहस्ते शाल, श्रीफळ तसेच पारंपरिक समई प्रदान करुन रमेश वंसकर यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. सौ. भारती वंसकर यांची सौ. दीपा मिरिंगकर यांनी खणा नारळाने ओटी भरली.

सत्काराला उत्तर देताना रमेश वसंकर यांनी सर्व हितचिंतकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. आपण आजपर्यंत प्रामाणिकपणे जगलो असून पत्रकारिता, साहित्य किंवा शिक्षणाच्या क्षेत्रात कसल्याही गैरमार्गाचा अवलंब न केल्याचे त्यांनी नमूद केले.

मान्यवरांना स्मृतिचिन्हे देऊन गौरविण्यात आले तर एकूण पंचावन्न लेखकाना गौरवग्रंथ वितरित करण्यात आले. प्रकाश तळवडेकर यांनी स्वागत केले. डॉ. अनिता तिळवे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन कोरगावकर यांनी केले तर राजमोहन शेटये यांनी आभार मानले. ‘तरुण भारत’चे संपादक सागर जावडेकर, इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष दशरथ परब, उद्योजक जयंत मिरिंगकर तसेच साहित्यिक व साहित्यप्रेमी या कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related Stories

वास्को यशवंतपूर प्रवासी रेल्वेसेवा सुरू

Patil_p

कोरोना संशयिताच्या घराचे निर्जंतुकीकरण

Omkar B

गवाणे येथील पुलाचा कठडा कोसळल्याने वाळपई-मोले दरम्यानच्या वाहतुकीला अडथळा

Amit Kulkarni

वास्कोतील कदंब स्थानकाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी निषेध मोर्चा व निदर्शने

Amit Kulkarni

जीम, क्रीडा, धार्मिक स्थळांना अल्प ढिलाई

Amit Kulkarni

गृहनिर्माण मंडळाच्या निवासी गाळेधारकांना कायदेशीर हक्क मिळणार- मंत्री माविन गुदिन्हो

Amit Kulkarni
error: Content is protected !!