तरुण भारत

यंदा मुंबईला मान्सूनची समाधानकारक साथ

तसे पाहिल्यास मुंबईला पावसाची गरज तहान भागविण्याइतपत मर्यादित. पण तरीही मुंबईकरांना पावसाची ओढ असतेच. 17 जुलै रोजी दरडी कोसळण्याच्या घटनांचा अपवाद वगळता यंदाच्या मान्सूनने आजतागायत मुंबईला समाधानकारक साथ दिली. ही आल्हाददायी साथ सप्टेंबर अखेरपर्यंत सुरूच आहे.

मुंबईतील पाऊस म्हणजे लोकल खोळंबा, मुंबईतील पाऊस म्हणजे वाहतूक कोंडी, मुंबईतील पाऊस म्हणजे सखल भागात साचलेल्या पावसाचे फोटो अशा नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करून मुंबईकरांना पावसाची ओढ असतेच. गणपती बाप्पा सोबतच पावसालादेखील पुनरागमनायच म्हणायची वेळ आली असताना देखील मुंबईतील पाऊस यंदा आटोपते घेताना दिसत नाहीय. खरे तर यंदा अगदी मफग नक्षत्र म्हणजे 7 जूनपासूनच मुंबईत पावसाचे वातावरण तयार झाले. ऑगस्ट महिना वगळता उर्वरित महिन्यात रोज एक तरी सर मुंबईकरांनी अनुभवली. यंदाच्या मुंबईतील पावसाच्या कामगिरीवर कटाक्ष टाकल्यास त्रास कमी दिल्याचे दिसून येत आहे. कोरोना निर्बंध सैलसर असले तरी प्रवास करण्यावर मुंबईकरांना मर्यादित सूट असल्याने कदाचित तीव्र पावसाच्या दिवसांमध्ये त्रास झाला नाही. मात्र जून महिन्यापासून आजतागायत प्रत्येक महिन्यात पावसाने एक ते तीन दिवस चांगल्या सरींचा अनुभव नक्की दिला आहे. मुंबईतील सिजनल आणि वार्षिक सरासरी पाहिल्यास हल्ली पाऊस सरासरी ओलांडताना दिसून येतो.  म्हणजे पाऊस पॅटर्न बदलतो का असा सवाल पर्जन्य प्रेमी मुंबईकरांच्या मनात नक्की उपस्थित होतो. मात्र यावर अभ्यास करून बोलणे उचित ठरावे. दरम्यान कुलाबा येथील सिजनल मान्सून सरासरी 2021. 4 मिमी तर सांताक्रूझ येथील सिजनल सरासरी 2205.0 एवढी आहे. यंदा मात्र मुंबईने आता पर्यंत सिजनल सरासरी ओलांडली असल्याचे मुंबई वेध शाळेचे शास्त्रज्ञ सांगतात. तर कुलाबा येथील पावसाची वार्षिक सरासरी 2123.0 मिमी एवढी असून सांताक्रूझ येथील वार्षिक सरासरी  2317.1 मिमी एवढी आहे. यात अजून वर्ष सरायचं असून मुंबईतील पावसाची वार्षिक सरासरी प्राप्त व्हायची आहे. मुंबईची तीव्रता मोजताना मुसळधार, अति मुसळधार ते अति अतिमुसळधार पाऊस असा मोजला जातो. 65 ते 125 मिमी पाऊस झाल्यास मुसळधार झाल्याचे बोलले जाते. तर 125 ते 244 मिमी पाऊस झाल्यास अति मुसळधार म्हटले जाते. तर 244 मिमीहून अधिक झाल्यास अति अति मुसळधार प्रकारात पाऊस मोडतो. 15 जुलैच्या रात्री मुंबईत 253 मिमी एवढा पाऊस झाल्याने या एकाच दिवशी अति अति मुसळधार पाऊस झाल्याची नोंद आहे. तर नुकतेच 19 सप्टेंबर सोमवारी रोजी मुंबईत 71 मिमी पाऊस झाला. हा मुसळधार झाला असूनदेखील त्रास झाला नाही. कमी कालावधीत अधिक मिलीमीटर पाऊस झाल्यास मुंबईत पाणी तुंबण्याच्या घटना घडतात. यातून रस्ते वाहतूक किंवा लोकल वाहतुकीला त्रास होतो. मात्र थांबून थांबून अधिक मिलीमीटर पाऊस झाल्यास त्रास होत नाही. दरम्यान पावसाचा मुंबईला त्रास होण्याची इतर हि कारणे आहेतच. मागच्या वर्षी मलबार येथे पाऊस झाल्याने रस्ता खचला होता. सुदैवाने जीवित हानी झाली नव्हती. तर यावर्षी विक्रोळीला अति मुसळधार पाऊस होऊन दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. संतत धार दुर्घटना मागील कारणांमधील एक कारण असते.

Advertisements

यावर्षी 2914 मिमी एवढा आतापर्यंत पाऊस झाला असल्याची सांताक्रूझ येथे नोंद आहे. मागच्या वर्षी सुमारे 3 हजार मिमीहून अधिक पाऊस झाला होता. गेले दोन तीन वर्षे 3 हजार मिमी हून अधिक पाऊस होत असल्याचे हवामान शास्त्रज्ञांचे मत आहे. यावर्षी मुंबईत 7 जूनपासून मान्सून पूरक वातावरण तयार झाले होते. राज्यात 101 टक्के मान्सून होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्याप्रमाणे पाऊस झालादेखील. यात मुंबईला पावसाची गरज तहान मिटविण्या इतपत मर्यादित असते. अन्यथा मुसळधार, अति मुसळधार पाऊस झाल्यास मुंबईची तुंबई होते हा दर वर्षीचा अनुभव आहे. या वर्षी मुंबईला पावसामुळे त्रास झाला असे फारच कमी दिवस आहेत. तरीही जून ते सुरु असलेल्या सप्टेंबर महिन्यापर्यंत 13 वेळा मुंबईत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाल्याची नोंद आहे. यात जून महिन्यातच चार वेळा मुसळधार तर एक वेळा अति मुसळधार पाऊस झाला. तर जुलै महिन्यात तीन वेळा मुसळधार, एक वेळ अति मुसळधार आणि एक वेळ अति अति मुसळधार पाऊस झाला. तर ऑगस्ट महिन्यात एक वेळ मुसळधार पावसाची नोंद आहे. एरवी ऑगस्ट महिन्यात मुंबईत पावसाने ओढ खाल्ली होती. त्यामुळे लगेचच मुंबईला होणाऱया पिण्याच्या पाण्याच्या जलाशयांची पातळी खालावल्याचे वफत्त प्रसारित होऊ लागले होते. मात्र सप्टेंबर महिन्यात सोमवार पर्यंत हि उणीव पावसाने भरून काढली. 7 सप्टेंबर आणि 19 सप्टेंबर या दोन दिवशी मुंबईत मुसळधार पावसाची नोंद मुंबई वेध शाळेने घेतली आहे.

मुंबई सात बेटांवर वसलेले शहर आहे. या शहरात 22 टेकडय़ा होत्या. दोन बाजूनी खाडय़ा, टेकडय़ांच्या रांगा, दलदलीचा भाग, तीन बाजूंनी वेढलेला समुद्र, खारफुटीचे जंगल अशा पर्यावरणपूरक आणि शहराला वाचविणारे घटक होते. मात्र हेच घटक नष्ट होत आहेत. या घटकांमुळेच  समुद्राच्या पाण्याचा वेग कमी होऊन जमिनीवर पाणी पसरू देत नव्हते. मात्र गेल्या काही वर्षात अवैध बांधकामाच्या विळख्यामुळे आपणच मुंबई पाण्याखाली नेत आहोत. मुंबई पाण्याखाली गेल्यास नाव मात्र पावसाचे सांगितले जाणार आहे. मग यंदा प्रमाणे आल्हाददायी पावसाचे रूप कसे पाहायला मिळेल यावर विचार होणे आवश्यक आहे.

-रेश्मा खेमराज भाईप

Related Stories

बिरबल आणि ओ हेन्री

Patil_p

काँग्रेसची डुबती नैय्या चिदंबरम सावरणार काय?

Patil_p

स्पायवेअरची ऐशीतैशी

Patil_p

माणसाला किती बचत लागते

Patil_p

अंकुश हवाच!

Patil_p

अवगुण सांडिता जाती।उत्तम गुण अंगीकारिता येता।।

Patil_p
error: Content is protected !!