तरुण भारत

काँग्रेसचा भांगडा!

पंजाबच्या मुख्यमंत्रिपदावरून कॅप्टन अमरिंदरसिंग यांना हटवण्यासाठी दोन वर्षांपासून काँग्रेस नेतृत्वाने चालवलेल्या प्रयत्नाला अखेर विधानसभा निवडणूक चार महिन्यावर आली असताना यश आले आहे. चरणजीत सिंग चेन्नी यांच्या रूपाने राज्याला सतरावा आणि पहिला दलित मुख्यमंत्री देण्याचे काम काँग्रेसने केले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत 31 टक्के दलित मतदार अकाली दल-बसपला सोडून काँग्रेसच्या मागे येणार का? दलित-शिख मुख्यमंत्री आणि हिंदू व जाट असे दोन उपमुख्यमंत्री नेमून काँग्रेसने राज्यातील जातीय समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या प्रयोगानंतर तरी पुढची पाच वर्षे काँग्रेसला कॅप्टनच्या गैरहजेरीत सत्ता राखता येणार का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. देशभरात पक्षाकडे नेते नाहीत,  तळागाळातील कार्यकर्त्यांपासून पक्ष दुरावला आहे. म्हणूनच गेल्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसची ससेहोलपट झाली आहे. अशा स्थितीत साडे नऊ वर्षे मोदींच्या लाटेतही पंजाबमध्ये काँग्रेसचे आव्हान कायम ठेवणाऱया लोकनेत्याला हटवणे काँग्रेसला महागात पडणार की निर्माण झालेल्या सत्ताविरोधी वातावरणापासून पक्षाचा बचाव होणार हे लवकरच समजेल. केंद्रीय पातळीवर काँग्रेस सक्षम असताना राज्याराज्यातील प्रभावी नेत्यांना बाजूला करून दरबारी नेत्यांना काँग्रेस मुख्यमंत्रीपदी बसवत. पक्षाच्या या धोरणाचा फटका हळूहळू काँग्रेसला बसला आणि ममता बॅनर्जी, शरद पवार यांच्यापासून सुरु झालेली काँग्रेसची गळती अरुणाचल प्रदेश मधल्या नेतृत्वानेही पक्षत्याग करून भाजपमध्ये प्रवेश करण्यापर्यंत पोहोचली. आजही भाजपशासित अनेक राज्यांमध्ये असलेले मुख्यमंत्री हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते आहेत. यावरून काँग्रेसने काय गमावले ते लक्षात येते. मात्र पंजाबमध्ये कॅप्टन काँग्रेसला फारच डोईजड झाले होते. मोदींविरोधात सुरू झालेले शेतकरी आंदोलन आणि त्याला शक्ती देणारे कॅप्टन आता काही केल्या बदलले जाणार नाहीत असे मध्यंतरी वातावरण होते. मात्र नवज्योत सिंग सिद्धू यांनी सलगपणे त्यांच्या विरोधात मोहीम चालू ठेवली. त्यामुळे सिद्धू हेच मुख्यमंत्री होतील असे वातावरण तयार झाले होते. त्यावेळी सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष करून तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र आमदारातील असंतोष काही कमी होण्याचे लक्षण दिसेना. सलग तीन वेळा आमदारांना दिल्लीत बोलावल्या नंतर कॅप्टनना राजीनामा देण्यास सांगण्यात आले. तसा त्यांनी दिला. मात्र नवज्योत सिंग सिद्धू यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारणे म्हणजे देशाच्या सुरक्षिततेशी खेळ करणे ठरेल. सिद्धू यांना मुख्यमंत्री केले तर आपण ते मान्य करणार नाही अशीच थेट भूमिका अमरिंदर सिंग यांनी घेतली. त्यामुळे दुसऱया सर्वमान्य नेत्याची चाचपणी करण्यात आली. दोन्ही गटांना मान्य होईल अशा चरणजीत सिंग चेन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने एकीकडे मुख्यमंत्री बदलाचा सपाटा लावून एका महिन्यात कोणताही गाजावाजा न होता पाच मुख्यमंत्री बदलले. तिथे पंजाबमध्ये काँग्रेसने मुख्यमंत्री बदलाचा प्रयत्न सुरू करताच भांगडा सुरू झाला. काँग्रेसअंतर्गत माजलेल्या या गोंधळामुळे आता पुन्हा काही पक्ष सत्तेत येत नाही, काँग्रेसवाल्यांनी स्वतःच्याच पायावर दगड मारून घेतला आहे, असे वातावरण निर्माण झाले. मात्र पहिला दलित मुख्यमंत्री करून काँग्रेसने एक नवी खेळी खेळली आहे. भाजपच्या राजकारणाला डोळय़ासमोर ठेवून केलेले काऊंटर राजकारण कितपत यशस्वी होणार हे काळच ठरवेल. पण चेन्नी यांचा शपथविधीला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी स्वतः  उपस्थित राहिले.  गांधी कुटुंब आता बदलू लागले आहे याची आणखी एक चुणूक दिसली. हा बदल दरबारी राजकारण करणाऱया काँग्रेसच्या अनेक नेत्यांना मानवणारा नाही. गांधी घराण्याने दूर दिल्लीत बसून कळसूत्री बाहुल्या नाचवाव्यात आणि आपल्या भोवती पक्षाचे वलय कायम फिरते ठेवावे असेच राजकारण आजपर्यंत होत आले आहे. त्यामुळेच जशी केंद्रात घराणेशाही तशीच राज्यात जिह्यात आणि गावागावातही काँग्रेसची घराणेशाही निर्माण झाली, नव्या नेतृत्वाला स्थान उरले नाही. परिणामी नवयुवकांनी काँग्रेस सोडून इतर पक्षांमध्ये नशीब आजमावले. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर बहुजन समाजातील युवकांना नेतृत्वाची संधी प्राप्त होत गेली आणि त्यामुळे एकीकडे प्रादेशिक शक्तींचा उदय झाला तर दुसरीकडे मोठय़ा जातींच्या नेत्यांच्या ओंजळीने पाणी पिणाऱया काँग्रेसला आपल्याच पक्षातील नेत्यांकडून ठिकठिकाणी आव्हान मिळत गेले. स्थानिक प्रभावी बहुजन गटांशी हात मिळवणी करून त्यांनी स्वतःची सत्ता निर्माण केली. प्रसंगी भाजप आणि डाव्या पक्षांशी हातमिळवणी केली. काही ठिकाणी पुन्हा काँग्रेसशीच आघाडीद्वारे जुळवून घेतले. मात्र दरबारी नेते या बदलांना समजून न घेता आपलाच टेंभा मिरवत राहिले. 2004 साली भाजपच्या ‘फिलगुड अहंकाराने’ काँग्रेसला मिळालेले अनपेक्षित यश, डावे आणि प्रादेशिक पक्षाने दिलेली साथ यामुळे 2009 मध्येही ते सत्तेवर आले. मात्र काँग्रेसी अहंकाराने पुन्हा उचल खाल्ली आणि व्यक्तिपूजेत अडकलेल्या नेत्यांनी 2014मध्ये हतबलपणे सत्ता जाताना पाहत बसणे पसंत केले. पक्षाच्या विरोधातील उठलेले वादळही ते समजू शकले नाहीत. दोन लोकसभा निवडणुकात काँग्रेस हलाखीच्या स्थितीत आहे. खुद्द राहुल गांधी पराभूत झाले. परिणामी पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेशमध्ये त्यांना जुन्याच नेत्यांना नाइलाजाने सत्ता सोपवावी लागली. तरुण नेते गमवावे लागले. मध्यंतरी 23 नेत्यांचे बंडही गाजले. आता काँग्रेसने चाल बदलली आहे. या निमित्ताने राहुल गांधी पंजाबमध्ये पोहोचले. पण केवळ एका दलित नेत्याला मुख्यमंत्री केले यावर आत्मसंतुष्ट न रहाता ठीकठिकाणी नवे नेतृत्व निर्माण करणे आणि व्यक्ती पूजेला स्थान न देता पक्ष सांभाळतील असे प्रादेशिक नेते उभे करणे हे काम काँग्रेसला करावे लागेल.

Related Stories

कृषी शिक्षण देऊ-घेऊ

Patil_p

चीन – तैवान संघर्षाची जपानला डोकेदुखी

Patil_p

शेतकरी आत्महत्या रोखण्याचे ठाकरे सरकारपुढे आव्हान

Patil_p

इराण-अमेरिका संघर्ष जागतिक मंदीकडे नेणारा

Patil_p

कोरोनाला हरवण्यासाठी व्हिटॅमिन्सची मोठी भूमिका

Patil_p

रामदेवायण!

Patil_p
error: Content is protected !!