तरुण भारत

भारत-ऑस्ट्रेलिया महिलांची पहिली वनडे लढत आज

हरमनप्रीत कौरला दुखापत, यजमानांची विजयी घोडदौड रोखण्याचे भारतासमोर आव्हान

वृत्तसंस्था/ मॅके

Advertisements

भारत व ऑस्ट्रेलिया महिलांच्या वनडे मालिकेला मंगळवारी प्रारंभ होत असून भारताच्या मध्यफळीकडून सुधारित कामगिरी होण्याची अपेक्षा केली जात आहे. पुढील वर्षी महिलांची विश्वचषक स्पर्धा होणार असल्याने या मालिकेतील कामगिरीवरून या स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड होण्याची शक्यता आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 5.35 वाजल्यापासून सामन्याला प्रारंभ होणार आहे.

भारतीय महिलांनी अलीकडेच दक्षिण आफ्रिका व इंग्लंडविरुद्ध झालेल्या लागोपाठ दोन मालिका गमविल्या. सलामीवीरांचा अपवाद वगळता फलंदाजांची खराब कामगिरी आणि खराब स्ट्राईकरेट या कारणांमुळे या दोन्ही मालिका भारताला गमवाव्या लागल्या होत्या. यात सुधारणा करण्यासाठी त्यांना बलाढय़ ऑस्ट्रेलियाचे आव्हान पार करावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियन महिलांनी सलग 22 सामने जिंकले असल्याने भारतीयांचे काम सोपे असणार नाही. महत्त्वाची फलंदाज हरमनप्रीत कौर दुखापतीमुळे या सामन्यात खेळणार नसल्याने भारताच्या अडचणीत भरच पडली आहे. ‘काही दिवसांपूर्वी हरमनच्या हाताच्या अंगठय़ाला दुखापत झाली होती. त्यातून ती अद्याप बरी झालेली नसल्याने या सामन्यात ती खेळू शकणार नाही. उर्वरित सर्व खेळाडू पूर्ण तंदुरुस्त असल्याने निवडीसाठी ते उपलब्ध असतील,’ असे संघाचे प्रमुख प्रशिक्षक रमेश पोवार यांनी सांगितले.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपासून भारतीय फलंदाजांत आक्रमकतेचा अभाव असल्याचे दिसून आले असून हाच मोठा मुद्दा बनला आहे. त्यात बदल होण्याची अपेक्षाच पोवार यांनी व्यक्त केली आहे. फलंदाजांची कामगिरी पाहूनच मिताली राज तिसऱया की चौथ्या क्रमांकावर यायचे, याचा निर्णय घेणार आहे. हरमनप्रीत जखमी असल्याने मध्यफळीला मजबुती आणण्यासाठी मिताली या सामन्यात चौथ्या क्रमांकावरच खेळेल. शफाली वर्मा व स्मृती मानधना यांनी दमदार सुरुवात करून देण्यात सातत्य दाखविले आहे. पण तिसऱया क्रमांकावर लागणारी आक्रमकता आणि खेळाचा वेग वाढविण्याची क्षमता पूनम राऊतमध्ये नसल्याचे संघाच्या लक्षात आले आहे. इंग्लंडविरुद्ध खराब प्रदर्शन झाले असले तरी द हंड्रेडमध्ये चमकदार प्रदर्शन केल्याने जेमिमा रॉड्रिग्जचा पुन्हा एकदा तिसऱया क्रमांकासाठी विचार केला जाऊ शकतो.

सुमारे दोन दशकाचा अनुभव असणारी कर्णधार मितालीदेखील तिसऱया क्रमांकावर येऊ शकते आणि तिच्या उपस्थितीत डावाची बांधणी इतर फलंदाज करू शकतात. चौथ्या क्रमांकावर खेळताना इंग्लंडमध्ये तिने सलग तीन अर्धशतके नोंदवली. मध्यफळीत संथगतीने खेळणारी दीप्ती शर्मा ही आणखी एक खेळाडू आहे. तिच्या खेळीमुळे भारताला अनेकदा जोमदार सुरुवातीचा लाभ उठवता आलेला नाही. शनिवारी झालेल्या सराव सामन्यातही तिने नाबाद 49 धावा काढण्यासाठी 93 चेंडू घेतले होते. मात्र मधल्या षटकांत तिची अचूक ऑफब्रेक गोलंदाजी भारतासाठी फार उपयुक्त ठरणारी असल्याने तिचा समावेश अपरिहार्य आहे.

हरमनच्या जागी यास्तिकाला संधी

सराव सामन्यात भारताला 36 धावांनी पराभव स्वीकारावा लागला तरी डावखुरी फलंदाज यास्तिका भाटियाने 42 चेंडूत 41 धावा फटकावत हरमनची जागा भरून काढण्याची क्षमता असल्याचे दाखवून दिले आहे. तिला या सामन्यात संधी मिळण्याची जास्त शक्यता आहे. ती एक हार्डहिटर फलंदाज असून ऑफसाईडला ती जोरदार फटकेबाजी करू शकते. तानिया भाटियाच्या फटक्यातही ताकद नसते. त्यामुळे याबाबतीत सरस असलेल्या रिचा घोषला वनडेमध्ये संधी मिळण्याची अपेक्षा आहे.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाने वर्कलोड कमी करण्याच्या उद्देशाने या मालिकेत अनुभवी गोलंदाजांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला असल्याने अननुभवी गोलंदाजीचा भारताला फायदा उठवता येईल. वेगवान गोलंदाज मेगन स्कट व स्पिनर जेस जोनासन यांच्या जागी एलीस पेरीसला ऍनाबेल सुदरलँड, डार्सी ब्राऊन, निकोला कॅरे, स्टेला कँपबेल यांची साथ मिळेल. भारतीय फलंदाजांवर बाऊन्सर्सचा अधिक मारा करणे, हेच उद्दिष्ट ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे असेल. सराव सामन्यातही त्यांनी हाच डावपेच वापरला होता.

त्यांची फलंदाजी भक्कम असल्याने भारतापुढे त्यांना रोखण्याचे मोठे आव्हान असेल. सराव सामन्यात पूनम यादव व अनुभवी झुलन गोस्वामी वगळता भारताच्या अन्य गोलंदाज फारशा प्रभाव पाडू शकल्या नाहीत. त्यात सुधारणा न झाल्यास यजमान संघ मोठी धावसंख्या उभारू शकतो. नवोदित वेगवान गोलंदाज मेघना सिंगला संधी देत अष्टपैलू पूजा वस्त्रकारसमवेत तिला खेळविले जाण्याची शक्यता आहे.

संभाव्य संघ ः भारत ः मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, शफाली वर्मा, पूनम राऊत, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, यास्तिका भाटिया, तानिया भाटिया, शिखा पांडे, झुलन गोस्वामी, मेघना सिंग, पूजा वस्त्रकार, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, रिचा घोष, एकता बिश्त.

ऑस्ट्रेलिया ः मेग लॅनिंग (कर्णधार), रॅशेल हेन्स, डार्सी ब्राऊन, स्टेला कॅम्पबेल, निकोला कॅरे, हन्नाह डार्लिंग्टन, ऍश्ले गार्डनर, ऍलीसा हीली, तहलिया मॅकग्रा, सोफी मोलिनॉ, बेथ मुनी, एलीस पेरी, जॉर्जिया रेडमाईन, मोली स्ट्रनो, ऍनाबेल सुदरलँड, टायला व्लाएमिन्क, जॉर्जिया वेअरहॅम.

सामन्याची वेळ ः पहाटे 5.35 पासून.

Related Stories

अडथळा आणल्याने लंकेचा गुणतिलके बाद, विंडीज विजयी

Amit Kulkarni

मानांकन यादीत बेलारूसची साबालेन्का सातव्या स्थानी

Patil_p

भारतीय पुरूष हॉकी संघ युरोप दौऱयावर

Patil_p

ऍथलेटिक्स फेडरेशनची निवडणूक 31 ऑक्टोबरला

Patil_p

ऑलिम्पिक क्रीडाज्योतीच्या जगप्रवासाला प्रारंभ

Amit Kulkarni

स्पोर्टिंग प्लॅनेट संघाकडे फँको चषक

Omkar B
error: Content is protected !!