तरुण भारत

कोलकाता नाईट रायडर्सचा दणदणीत विजय

आरसीबीवर 9 गडय़ांनी एकतर्फी मात, सामनावीर वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेलचा भेदक मारा

वृत्तसंस्था/ अबु धाबी

Advertisements

कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल दुसऱया टप्प्याची दिमाखात सुरुवात करताना सोमवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा 9 गडय़ांनी एकतर्फी धुव्वा उडविला. आंद्रे रसेल व सामनावीर वरुण चक्रवर्ती यांनी भेदक मारा करीत आरसीबीचा केवळ 92 धावांत खुर्दा केल्यानंतर केकेआरने एक गडी गमवित 10 षटकांतच विजयी लक्ष्य गाठले.

आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात केकेआरने खूपच निराशाजनक कामगिरी केली होती. पण सोमवारच्या सामन्यात आरसीबीवर प्रारंभापासूनच त्यांनी पूर्ण वर्चस्व राखत मोठा विजय साकार केल्याने त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे त्यांचा नेटरनरेटही वाढणार आहे. आरसीबीने प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर दुसऱयाच षटकांपासून त्यांच्या डावाला गळती लागली आणि 19 षटकांत त्यांचा डाव 92 धावांतच आटोपला. त्यांच्या केवळ चारच फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. त्यानंतर शुभमन गिल व पदार्पणवीर वेंकटेश अय्यर यांनी 82 धावांची सलामी देत विजयाकडे घोडदौड केली असताना गिल बाद झाला. वेंकटेशने नंतर रसेलच्या साथीने विजयाचे सोपस्कार दहाव्या षटकांत पूर्ण केले. गिलने 34 चेंडूत 48 तर वेंकटेशने 27 चेंडूत नाबाद 41 धावा केल्या.

आर्टिटेक्ट असणारा गूढ स्पिनर वरुण चक्रवर्तीने प्रथम गोलंदाजीला सुरुवात केली आणि आपल्या जादुई फिरकीवर 13 धावांत 3 बळी मिळवित आरसीबीला बॅकफूटवर आणले. स्टार अष्टपैलू आंद्रे रसेलने केवळ 3 षटकांत 9 धावा देत 3 बळी मिळवित त्याला उत्तम साथ दिली. त्यात एबी डीव्हिलियर्सचाही समावेश आहे. डीव्हिलियर्सला त्याने शून्यावर बाद केले. याशिवाय लॉकी फर्ग्युसननेही 2 बळी मिळविले. देवदत्त पडिक्कलने आरसीबीतर्फे सर्वाधिक 22 धावा जमविल्या. आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीचा हा 200 वा सामना होता, त्यामुळे त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पण प्रसिद्ध कृष्णाने त्याला  दुसऱया षटकातील चौथ्या चेंडूवर पायचीत करीत आरसीबीला मोठा धक्का दिला. त्याला केवळ 5 धावा जमविता आल्या. कोहलीने त्यावर रिव्हय़ू घेतला, पण त्यातही चेंडू यष्टीवर जात असल्याचे स्पष्ट झाले. आधीच्या चेंडूवर त्याने ऑफसाईडला शानदार चौकार मारला होता.

वरुणच्या जागी न्यूझीलंडच्या फर्ग्युसनला गोलंदाजीस आणल्यावर पडिक्कलने त्याच्या डोक्यावरून फटका मारत चौकार वसूल केला. पदार्पणवीर श्रीकर भरतलाही कोंडी फोडणे जड जात होते. पण पडिक्कलने नंतर कृष्णाला आणखी एक चौकार मारला. केकेआर कर्णधार मॉर्गनने गोलंदाजीत आणखी एक बदल करीत सुनील नरेनला आणले. त्याला पहिल्या षटकात यश मिळाले नसले तरी फर्ग्युसनने आपल्या दुसऱया षटकात पडिक्कलला यष्टिरक्षकाकरवी झेलबाद केले. दुसरीकडे रसेलने दबावाखाली खेळणाऱया भरतची खेळी 16 धावांवर संपुष्टात आणली. याच षटकातील चौथ्या चेंडूवर रसेलने आरसीबीला जबरदस्त धक्का देताना डीव्हिलियर्सला अप्रतिम यॉर्करवर शून्यावर त्रिफळाचीत केले. यावेळी आरसीबीने 9 षटकांत 4 बाद 52 धावा जमविल्या होत्या. ग्लेन मॅक्सवेलही फारवेळ टिकला नाही. 10 धावांवर वरुण चक्रवर्तीने त्याला बाद केल्यानंतर आरसीबीच्या मोठी धावसंख्या गाठण्याच्या आशा संपुष्टात आल्या. आणखी एक पदार्पणवीर वनिंदू हसरंगाही वरुणच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. मॅक्सवेल व हसरंगा लागोपाठच्या चेंडूवर बाद झाले. पण वरुण हॅट्ट्रिक साधण्यात यश आले नाही. हर्षल पटेलने 10 चेंडूत 12 धावा केल्यानंतर फर्ग्युसनने त्याचा त्रिफळा उडविला तर रसेलने सिराजला वरुणकरवी झेलबाद करीत आरसीबीचा डाव 92 धावांवर संपुष्टात आणले. 

या विजयानंतर केकेआरने गुणतक्त्यात सातवरून पाचव्या स्थानावर झेप घेतली असून 8 सामन्यांत त्यांचे 6 गुण झाले आहेत. आरसीबी 10 गुणांसह तिसऱया स्थानावर कायम आहे.

संक्षिप्त धावफलक ः आरसीबी 19 षटकांत सर्व बाद 92 ः कोहली 5, पडिक्कल 20 चेंडूत 3 चौकारांसह 22, श्रीकर भरत 19 चेंडूत 16, मॅक्सवेल 17 चेंडूत 10, डीव्हिलियर्स 0, सचिन बेबी 7, हसरंगा 0, जेमिसन 4, हर्षल पटेल 10 चेंडूत 12, सिराज 8, यजुवेंद्र चहल नाबाद 2, अवांतर 6. गोलंदाजी ः वरुण चक्रवर्ती 3-13, आंद्रे रसेल 3-9, फर्ग्युसन 2-24, प्रसिद्ध कृष्णा 1-24, सुनील नरेन 0-20.

केकेआर 10 षटकांत 1 बाद 94 ः शुभमन गिल 34 चेंडूत 6 चौकार, 1 षटकारासह 48, वेंकटेश अय्यर 27 चेंडूत 7 चौकार, 1 षटकारासह नाबाद 41,  रसेल नाबाद 0, अवांतर 5. गोलंदाजी ः चहल 1-23, सिराज 0-12, जेमिसन 0-26, हसरंगा 0-20, हर्षल पटेल 0-13.

Related Stories

अजय जयरामला डेन्मार्क स्पर्धा हुकणार?

Patil_p

जेतेपदाच्या दुष्काळाला ‘क्लीन बोल्ड’ करणार का?

Patil_p

आरएसपी समादेशक साताऱयात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱयांवर लक्ष ठेवताहेत

Patil_p

बोरुसिया डॉर्टमंडचा एकतर्फी विजय

Patil_p

आकाश चोप्रावरही इंग्लंडमध्ये वर्णद्वेषी टिपणी

Patil_p

पी. व्ही. सिंधूने चीनच्या ही बिंग जिआओला नमवत जिंकले कांस्य पदक

triratna
error: Content is protected !!